
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केला आहे. आता आयपीएलचे उर्वरित सामने कधी खेळवले जातील यावर चर्चा सुरू आहे.याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्हा माहितीनुसार, भारत-पाकिस्तान यांच्यातल्या तणावजन्य परस्थितीचा आधी आढावा घेतला जाईल. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआय ऑगस्ट महिन्याचा विचार करू शकते. या कालावधीत भारतीय संघ तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणे अपेक्षित आहे. पण, सदस्यस्थिती पाहता हा दौरा होणार नसल्याचेच संकेत आहेत. बीसीसीआय या विंडोचा आयपीएलसाठी विचार करू शकेल. पण, भारतात तेव्हा पावसाळा असल्याने दुसऱ्या देशात हे सामने होतील.
हा पर्याय काही कारणास्तव यशस्वी न झाल्यास बीसीसीआय आशिया चषक स्पर्धेच्या विंडोचा वापर करू शकते. भारत-पाकिस्तान तणावात हा स्पर्धेवरही संकट आहेच. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि तेव्हा आयपीएलचे उर्वरित सामने होऊ शकतात. भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यानंतरच्या विंडोचा आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी विचार केला जाऊ शकतो.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या सीमाभागांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे धर्मशाला येथे खेळवण्यात आलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना मध्येच थांबवण्यात आला होता आणि नंतर तो रद्द केला गेला.पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना, सहाय्यक स्टाफ आणि ब्रॉडकास्टर्सना बीसीसीआयने विशेष ट्रेनने दिल्लीला आणण्याची तयारी केली आहे. कारण धर्मशाला येथील विमानतळ १० मे पर्यंत बंद ठेवल्यामुळे ट्रेनची सुविधा करावी लागली आहे. शुक्रवारी सकाळी सर्व खेळाडू या ट्रेनने दिल्लीसाठी रवाना झाले.तेव्हाच आयपीएलच्या पुढील सामन्यांबाबत चिंता व्यक्त केली गेली होती. आज अखेर बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी आयपीएलचे पुढचे सामने स्थगित केल्याचे जाहीर केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तानातील दहशतावद्यांची ९ तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या सीमाभागांवर ड्रोन हल्ले केले. भारतीय जवानांनी त्यांचे हे हर्व हल्ले परतवून लावताना पाकिस्तानचे तीन लढाऊ विमानं पाडली. पाकिस्तानकडून यापुढेही कुरापती सुरू राहणार असल्याची संकेत आहेत आणि भारतीय लष्कर त्यासाठी सज्ज आहे.