
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट
मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून (९ मे) बस भाड्यात वाढ जाहीर केली आहे. बेस्टने यापूर्वीच लवकरच बस भाडे वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात, महापालिका प्रमुख भूषण गगराणी यांनी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार आजपासून बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडे सुधारणेनुसार, जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.
बेस्ट बसचे सुधारित भाडे किती?
मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (MMRTA) मंजूर केलेल्या भाडे सुधारणेनुसार, नॉन-एसी बससाठी किमान बस भाडे १० रुपये आणि एसी बससाठी १२ रुपये असेल. यापूर्वी नॉन-एसी बससाठी ५ रुपये आणि एसी बससाठी ६ रुपये असे भाडे होते. ज्यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
नॉन एसी बससाठी शुल्क
आजपासून लागू झालेल्या नवीन रचनेनुसार, नॉन-एसी बसेसच्या प्रवाशांना ५ किमी, १० किमी, १५ किमी, २० किमी, २५ किमी, ३० किमी, ३५ किमी, ४० किमी, ४५ किमी आणि ५० किमी अंतरासाठी अनुक्रमे १०, २०, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५ आणि ६० रुपये शुल्क आकारावे लागेल.
एसी बससाठी शुल्क
एसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५ किमी, १० किमी, १५ किमी, २० किमी, २५ किमी, ३० किमी, ३५ किमी, ४० किमी, ४५ किमी आणि ५० किमी अंतरासाठी अनुक्रमे १२, २०, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० आणि ६५ रुपये शुल्क आकारावे लागेल. ५० किमी अंतराच्या पलीकडे, प्रत्येक अतिरिक्त ५ किमीसाठी ५ रुपये अतिरिक्त भाडे आकारले जाईल.