
प्रा. विजयकुमार पोटे
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करून काश्मीर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला ठेच पोहोचवण्याबरोबरच भारतात हिंदू-मुस्लीम दंगे घडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता; परंतु शत्रूविरुद्ध लढताना आम्ही १०५ ही भारताची परंपरा पाकिस्तानच्या लक्षात आली नाही. गेल्या १५ दिवसांत भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबरोबरच आता दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकला धडा शिकवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. दहशतवाद्यांची उरलेली जमीन जमीनदोस्त केली जाईल, असा इशारा देताना त्यांनी त्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. एकीकडे जगाला विश्वासात घेत असताना जनतेचा युद्ध सराव होण्याअगोदरच पाकिस्तानला बेसावध ठेवून भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानचे कंबरडे मोडून काढले आहे. ‘मॉक ड्रिल’ केल्यानंतर चार-पाच दिवसांत भारत हल्ला करील, असा पाकिस्तानचा अंदाज होता; परंतु गनिमीकाव्यात असा चकवा द्यावा लागतो. तो भारताने दाखवून दिले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजता सुरक्षा दलांनी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मुरिदकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले. इतर छावण्यांमध्येही अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानात लपलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले. हा हल्ला ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’च्या लपण्याच्या ठिकाणांवर करण्यात आला आहे. याशिवाय, भारतीय लष्कराने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करणारे एक पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत,‘ऑपरेशन सिंदूर’ची योजना कशी आखण्यात आली हे समजावून घेणे आवश्यक आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ‘ऑपरेशन सिंदूर’चे नियोजन सुरू करण्यात आले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व होते. ते सतत हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या संपर्कात होते. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी यांनी गुप्तचर संस्था आणि ‘एनटीआरओ’सह पाकिस्तानमधील उच्च दर्जाच्या दहशतवादी तळांची ओळख पटवण्याची जबाबदारी डोवाल यांना दिली होती. पाकिस्तानमधील अशा दहशतवादी छावण्या निवडण्याची जबाबदारी डोवाल यांच्यावर सोपवण्यात आली होती. डोवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’साठी एक छोटी टीम तयार केली होती. त्यात तिन्ही सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि त्यांच्या समन्वयाने ऑपरेशन सुरू करण्यात आले. पाकिस्तानमध्ये अशा ठिकाणी कारवाई करण्याची योजना होती, जिथे दहशतवादाला फटका बसेल. यानंतर, जेव्हा डोवाल यांनी पंतप्रधान मोदींसमोर या नियोजनाचा आराखडा सादर केला, तेव्हा त्यांनी या योजनेला मान्यता दिली. या काळात मोदी आणि अजित डोवाल यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. हल्ल्यादरम्यानही हे दोघेही ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते.
पाकिस्तानी भूमीवर मध्यरात्री घुसून भारताच्या बलाढ्य सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये राफेलने आकाशातून हॅमर आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशन अंतर्गत, सैन्याने प्रथमच राफेलसारख्या लढाऊ विमानासह आत्मघाती ड्रोन आणि लोटेरिंग दारूगोळा वापरला. या कारवाईत भारतीय सैन्याने अत्याधुनिक शस्त्रे वापरली. त्यामुळे ही कारवाई धोरणात्मक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली. फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानांचे हे पहिले प्रत्यक्ष ऑपरेशन होते. या विमानांचा अतिवेग, लांब पल्ल्यावरील अचूक लक्षभेद करण्याची क्षमता आणि प्रगत एव्हियोनिक्समुळे दहशतवादी लक्ष्यांवर अचूक हल्ला करणे शक्य झाले. राफेल विमानातून डागण्यात आलेले स्कॅल्प क्षेपणास्त्र २५० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर अचूकपणे मारा करू शकते. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. ‘लश्कर’चा बालेकिल्ला असलेल्या ‘मरकज-ए-तोयबा’लाही उडवून देण्यात आले. मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी २६/११ च्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते, तिथे हॅमर बॉम्ब टाकण्यात आला. त्यासाठी राफेलचा वापर करण्यात आला. ‘हायली अॅजाइल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज’ हा एक स्मार्ट बॉम्ब आहे. तो कठीण प्रदेशात असलेल्या लक्ष्यांना अचूकतेने नष्ट करण्यास सक्षम आहे. हे बॉम्ब दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर टाकण्यात आले. भारतीय सैन्याने प्रथमच ‘लोइटरिंग म्युनिशन्स’चा वापर केला. ते आत्मघाती ड्रोन आहेत. हे ड्रोन लक्ष्यावर घिरट्या घालतात आणि योग्य वेळी हल्ला करतात. त्यामुळे अचूकता वाढते आणि संपार्श्विक नुकसान कमी होते. भारतीय हवाई दलाने ‘स्टँड-ऑफ’ शस्त्रे वापरली. त्यामुळे शत्रूच्या हद्दीत प्रवेश न करताही विमानांना दूरवरून हल्ले करण्याची क्षमता मिळाली. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानमधील पाच आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या चार अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमधील बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, चक अमरू, भिंबर, सियालकोट,बाग आणि मुरिदके येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय मुरिदके येथील ‘लश्कर-ए-तोयबा’चे प्रशिक्षण शिबीर, ‘मरकज-ए-तोयबा’ आणि बहावलपूरमधील ‘जैश-ए-मोहम्मद’चा बालेकिल्ला ‘जैश-ए-सुभानल्ला’लाही लक्ष्य करण्यात आले. ‘मरकज-ए-तोयबा’ त २६/११ च्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे हे लपण्याचे ठिकाण पूर्णपणे नष्ट झाले आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे. भारताने ही कारवाई अमेरिका, रशियासह जगातील अन्य प्रमुख देशांना विश्वासात घेऊन केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून ध्वनित होते. भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याचा कट जिथून आखला, तिथेच हा हल्ला केला. सामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता भारताने घेतली. भारताच्या या कृतीची पाकिस्तानला काहीच कल्पना नव्हती. पाकिस्तान कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच भारताने काम पूर्ण केले. भारताची कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य केले नाही. लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे. असे करून भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे पडसाद अमेरिकेत पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने केवळ पाकिस्तानलाच आश्चर्यचकित केले नाही, तर जगालाही आश्चर्याचा धक्का दिला.
सीमा न ओलांडताही भारत कारवाई करू शकतो, हे पाकिस्तानला दाखवून दिले; शिवाय पाकिस्तानच्या संभाव्य कृतीलाही हाणून पाडले. पाकिस्तानचे जेएफ-१७ पाडण्यात आले. भारताच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने हे विमान पाडले. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अत्यंत अचूकतेने पार पाडले. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. लष्कराने कामिकाझे ड्रोनचाही वापर केला. कामिकाझे ड्रोनला ‘लोइटरिंग म्युनिशन’असेही म्हणतात, ही अशी शस्त्रे आहेत, जी त्यांच्या लक्ष्यांशी थेट टक्कर देऊन त्यांचा नाश करतात. त्यात वॉरहेड असते. त्यामुळे त्याचा स्फोट होतो.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये अंधार पसरला. स्फोटांनंतर शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केला. भारताने यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानची दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ला मोठा धक्का दिला आहे. भारतीय विमानांच्या गर्जनेत, ‘जैश-ए-मोहम्मद’चा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यामध्ये नियंत्रण रेषेवरील आणि जम्मू आणि काश्मीरच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवरून तोफांचा मारा करण्यात आला. या अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानच्या या कारवाईला योग्य प्रत्युत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे.