
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
बैठकीला गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या ऑपरेशनमध्ये सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.
/>
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी खुलासा केला की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; पाकिस्तानविरोधातील कारवाई सुरूच आहे. यावेळी सर्व पक्षांनी सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत एकात्मता दर्शवली.
राहुल गांधी यांनी बैठकीत विशेष संसदीय अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. यावर सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, केंद्राने स्पष्ट केले की, भारताला युद्ध नको, पण जर पाकिस्तानकडून काही अतिक्रमण झाले, तर त्याला “दहापट उत्तर” दिले जाईल.