Thursday, May 8, 2025

श्रध्दा-संस्कृती

कालबाह्य झालेल्या लोककला

कालबाह्य झालेल्या लोककला

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे


संस्कृतीच्या पाऊलखुणांमध्ये आपण लोककला जोपासणारे लोक कलावंत पाहिले. आज कालबाह्य झालेल्या लोककला पाहुयात. लोककला ही लोकसमुहातून किंवा लोकांच्या एकत्रीकरणातून निर्माण होते.तसेच प्रगत/अप्रगत समाजाचा सुद्धा लोककलेवर प्रभाव पडत असतो. जो  समाज सुधारलेल्या अवस्थेत असतो तिथे लोककला प्रगत अवस्थेत असते. पूर्वी लोककलेला राज्यश्रय मिळत असल्याने त्या काळात लोककलेला भरभराटीचे दिवस आलेले होते. लोककला ही करमणूक व प्रबोधन करण्याचे उत्तम साधन आहे. लोककलेच्या माध्यमातून लोकांमध्ये देशप्रेम जागृत करून स्वातंत्र्याच्या चळवळींमध्ये या लोककलांचा चपखल उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसतो. पूर्वी लोककलांच्या माध्यमातूनच जनजागृती केली जात असे.


गावागावांत जेव्हा जत्रा, उरुस भरायचे त्यावेळी दशावतार, कळसुत्री बाहुल्या, डोंबारी, तमाशा इत्यादी लोककला त्या ठिकाणी सादर केल्या जात असत; परंतु काळाचे बदलते स्वरूप आणि सुधारित समाज यामुळे लोककलांमधली रुची कमी होत चालली आहे. समाजात लोककलेसाठी रसिकता न राहिल्याने हळूहळू लोककला लोप पावत आहे. त्यातून गोंधळ, भारुड या लोककला अजूनतरी तग धरून आहेत; परंतु काही लोककला मात्र कालबाह्य होत चालल्या आहेत. काही कालबाह्य लोककलांची उदाहरणेच बघुयात.


डोंबारी :  ‘डोंबारी’ हा खेळ कोल्हाटी समाजाचा आहे. वेड्यावाकड्या उड्या मारणे, रस्त्यावर कोलांट्या मारणे, मध्येच ढोलकीच्या तालावर ठेका धरत दोन बांबूना बांधलेल्या दोरीवर एखादी कसरत दाखवणे अशी ही लोककला गावोगावी करून हा समाज पोट भरायचा. नाच व खेळ या दोन्ही कला आलटून पालटून दाखवणारी, ही भटकी जमात. दोरीवरून चालणं, नाचणं, उड्या मारणं वगैरे खेळ करणं आणि भिक्षा मागणं हा कोल्हाटी जमातीचा पारंपरिक व्यवसाय. डोंबारी हे गावाबाहेर झोपड्या बांधून राहत. जिथं-जिथं जत्रा होतात, त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम असे जत्रा झाली की यांचा प्रवास दुसऱ्या गावाकडे सुरू होत असे. परंतु डोंबाऱ्यांच्या कसरती बघण्यापेक्षा, आता मनोरंजनासाठी, इतर साधनं उपलब्ध झाल्याने ह्यांच्या पोटावर मात्र पाय आला आहे.


बहुरूपी : महाराष्ट्रातील लोक कलांकारांपैकी एक. पूर्वीच्या काळी जेव्हा गाव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फिरत. ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत; परंतु आता चित्रपटगृह आणि सोशल मीडिया इत्यादी करमणुकीची साधने वाढल्याने आणि नवीन पिढीला या गोष्टींची माहिती नसल्याने, तसेच या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यत्वे हे करून पोलिसांच्या वेषात येतात. यामुळे यांना फसवेगीरी किंवा भामटे समजून लोकांच्या रोशाला समोरे जावे लागते.


कडकलक्ष्मी :  ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरी आईला आवाहन करत भिक्षा मागते. हातातल्या चाबकाने स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरणाऱ्या या कडकलक्ष्मीच्या मोकळ्या सोडलेल्या केसांच्या जटा झालेल्या असतात. कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार केलेला घागरा  नेसलेला, गळ्यात मण्यांची माळ. मंगळवारी वा शुक्रवारी डफडे वाजवत ती गावात येते व गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो. मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून कडकलक्ष्मी अंगाला डावी-उजवीकडे वाकून नाचता नाचताच कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभोवती मारते.


तमाशा : तमाशाचे खेळ गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, लावणी आणि वग असे प्रकार असतात. गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. गण संपल्यावर गौळण असते. गोपी, मावशी, श्रीकृष्ण व पेंद्या, ह्यांच्यातील संवाद भरपूर हसवतात. त्यानंतर लावणी होते आणि मग वग सुरू होतो. वग म्हणजे नाट्यस्वरूप कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वतःच्या बुद्धीने म्हणायचे असतात. परंतु आता यांचेही स्वरुप बदलले आहे. आधुनिकतेच्या भपक्यामागे तमाशाचे पारंपरिक रुप हरवून गेले आहे. महाराष्ट्राच्या ह्या लोककला, ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन. पण कायम उपेक्षित राहिल्या. प्रतिष्ठा ह्यांच्या वाट्याला आलीच नाही. प्रसिद्धी तर दुरच. बहुतांश कलावंत पाठीवर बिऱ्हाड घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात आपली गुजराण करतात. असे जीवन जगणाऱ्या या कलाकारांचे वृद्धापकाळात फार हाल होतात. फार कमी जणांना सरकारी अनुदान मिळते. शिक्षण नाही, पैसा नाही, म्हातारपणात काम ही करता येत नाही. मग पडेल ते काम करून पोट भरायची वेळ येते. बहुतेक कलाकारांच्या जेवणाच्या वेळा अनियमित, अपुरी झोप व त्यामुळे आजार होतात. बऱ्याचदा पैशाअभावी दुखणे अंगावर काढले जाते. माणसाची जीवनशैलीच बदलली असल्या कारणाने जनजीवन घड्याळाच्या काट्यानुसार पळत आहे. त्यातच इंटरनेटच्या वापरामुळे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादींमध्ये माणूस जास्त रमू लागला आहे. सद्य परिस्थिती पाहता, मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी मल्टिप्लेक्स, दूरचित्रवाणी त्याचबरोबर कम्प्युटर, मोबाईल आदी साधने उपलब्ध आहेत. आणि यामुळेच रस्त्यावरच्या किंवा देवळात होणाऱ्या लोककला पाहणं हे आजच्या पिढीला पटत नाही. या सोशल मीडियाच्या वापरामुळे लोककला मात्र दम तोडू लागली आहे. याचीच कमी म्हणून की काय आज पाश्चिमात्य संस्कृतीचे तरुणाईच्या मनावर अतिक्रमण झाल्यामुळे आपल्या संस्कृतीचे दमन होत चालले आहे. सध्याच्या काळात समाजातील प्रत्येकजण फक्त आपले मनोरंजन होतंय ना एवढंच बघतो आहे.आपली संस्कृती जोपासण्याची कोणालाही गरज वाटत नाही. त्यामुळे लोककला सुद्धा जोपासली जात नाही आणि याच कारणाने लोक कलावंतांना मिळेल ते काम करून पोट भराव लागतं आहे. वृद्धापकाळात लोक कलावंतांचे खूप हाल होतात. कारण सरकारकडून कसलीही पेन्शन व्यवस्था उपलब्ध नसल्याने आणि उतारवयात कुठं कामही करणे शक्य नसल्यामुळे लोककलावंत आता संपत चालले आहेत. लोककला जिवंत ठेवायची असेल तर लोककलावंतांना आधी जगवायला हवं, त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण यासाठी वेळीच पावले उचलायला हवीत. त्यांच्या कलांना व्यासपीठ नक्कीच मिळायला हवं. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्या कागदोपत्री न राहता त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. कारण लोककला ही अद्याप आर्थिक रेषेखाली आहे. लोककला समाजापर्यंत कशी पोहोचेल, यासाठी शासनाने व लोक कलावंतांच्या पुढील पिढीने प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Comments
Add Comment