
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला.
पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी नागरिकांवर हल्ला केला. अतिरेक्यांनी २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या कारवाईत पाकिस्तानचा थेट हात असल्याचे पुरावे भारताच्या हाती आले आहेत. पाकिस्तानच्या कृत्यामुळेच २२ एप्रिल पासून भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. पाकिस्तानच्या अतिरेकी कृत्याला उत्तर देण्यासाठी भारताने बुधवार सात मे रोजी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' केले. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये अशा एकूण नऊ अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करताना पाकिस्तानच्या सैन्य तळांना तसेच पाकिस्तानच्या नागरी वस्तीला धक्का बसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. पण पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा केला. तसेच भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने समर्थपणे हा हल्ला परतवून लावला. यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला होऊ नये यासाठी खबरदारीचा आणि स्वसंरक्षणाचा उपाय म्हणून भारताने गुरुवार आठ मे रोजी भर दिवसा निवडक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. यातील एका कारवाईत लाहोरमध्ये पाकिस्तानची एक हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट झाली आहे, ही माहिती भारताने दिली.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालिंदर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौद, उत्तर लायी, भूज येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांच्याद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएफ ग्रीड आणि वायू रक्षा प्रणालीद्वारे निष्क्रीय करण्यात आले.पाकिस्तानच्या या हल्ल्याचे पुरावे भारताने संकलित केले आहेत. ही माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाकिस्तानच्या कारवाई नंतर स्वसंरक्षणाचा उपाय म्हणून भारताने गुरुवार आठ मे रोजी भर दिवसा निवडक ठिकाणी ड्रोन हल्ले केले.पाकिस्तानमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. यातील एका कारवाईत लाहोरमध्ये पाकिस्तानची एक हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट झाली, असेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. कुपवाडा, बारामुला, उरी, पूँछ, राजौरी येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा होत आहे. पाकिस्तानच्या या कारवाईत १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच शाळकरी मुलं आणि तीन महिला यांचा समावेश आहे.
https://www.youtube.com/live/28Zbfv9W82o?feature=shared
काय म्हणाले भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी ?
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यापासून भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघांची सुरक्षा समिती जेव्हा पहलगाम हल्ल्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढण्याचा विचार करत होती त्यावेळी पाकिस्तानने टीआरएफचा उल्लेख करण्यास विरोध केला.टीआरएफ या अतिरेकी संघटनेने दोन वेळा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण टीआरएफ या अतिरेकी संघटनेला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या मागणीला पाकिस्तानने विरोध केला; असेही परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले. भारताने फक्त अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. पण पाकिस्तानचे अतिरेक्यांशी थेट लागेबांधे आहेत. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या अतिरेक्यांच्या जनाजावेळी अर्थात अंत्ययात्रेवेळी पाकिस्तानच्या सैन्यातील आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची उपस्थिती हेच दर्शवते; असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले.
पाकिस्तान पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करावी अशी मागणी आता करत आहे. पण याआधी जेव्हा जेव्हा अतिरेकी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला देण्यात आले तेव्हा पाकिस्तानने काहीच केले नाही. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी भारतीयांसह परदेशी नागरिकही ठार झाले होते. पण या प्रकरणातही पुरावे देऊन पाकिस्तानने काहीच केलेले नाही; असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.
पाकिस्तानने दावा केला की, भारताने धार्मिकस्थळांना लक्ष्य केलं. पण तो दावा खोटा आहे. भारताने अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केला. याउलट पाकिस्तानकडून धार्मिक स्थळांवर हल्ला केला जात आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर येथील गुरुद्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानचे सैन्य भारताच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा करत आहे. पाकिस्तानचे अतिरेक्यांशी थेट लागेबांधे आहेत. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या अतिरेक्यांच्या जनाजावेळी अर्थात अंत्ययात्रेवेळी पाकिस्तानच्या सैन्यातील आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची उपस्थिती हेच दर्शवते. थोडक्यात सांगायचे तर पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देतो. भारतातील धार्मिक स्थळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करतो; असेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.