Wednesday, May 7, 2025

महाराष्ट्रपालघर

मोखाड्यातील नागरिकांच्या घशाला कोरड कायम

मोखाड्यातील नागरिकांच्या घशाला कोरड कायम

  • २५० कोटींची योजना; गाव-पाड्यांत भीषण टंचाई

  • दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट

  • वारघडपाडा,घोसाळी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू

  • ७ पाणीपुरवठा योजना बंद


मोखाडा : डोंगर, दऱ्यांनी व्यापलेल्या मोखाडा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट गडद आहे. नागरिकांना घरोघरी नळाने पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अडीचशे कोटीहून अधिक रकमेच्या योजनेतून तसेच जिल्हा परिषदेने ही पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. मात्र या योजनांची कामे रखडल्याने तालुकावासियांच्या घशाला कोरड कायम आहे. यंदा ३० गाव-पाड्यांत भीषण टंचाई असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा होतो आहे तर तेही पाणी पुरत नसल्याने महिला हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून दोन-तीन किमीचा प्रवास करताना दिसत आहेत.


मोखाड्यात ३० गाव-पाड्यांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नगरपंचायत क्षेत्रात सुद्धा ६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. गभालपाडा व माळी पाडा येथील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मोखाडा तालुक्यातील प्रमुख योजना अप्पर वैतरणा धरणसाठ्यावरून तयार केली असून हेच पाणी अनेक गावपाड्यांजवळील एका टाकीपर्यंत पोहोचवले गेले आहे. तिथून पुन्हा गावात आणि घरात नळ देण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून छोट्या योजना बनवून कामे चालू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग अशी दोघांची मिळून ही योजना प्रत्येकाच्या घरात पाणी पोहोचवणार होती. मात्र या कामांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी सुद्धा पाणी केवळ टाक्यांपर्यंत आणि तेथून कसेबरे विहीरीत पाणी नेले जाते.


/>

सुरुवातीपासून योजना वादग्रस्त


पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास तालुक्याची पाणीसमस्या यामुळे सुटणार आहे. मात्र अगदी सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली होती, कारण जीवन प्राधिकरणाकडून खोदाई करताना नियम पाळले गेले नाहीत. अर्ध्यापेक्षा जास्त पाइप रस्त्याला लागून पुरले गेले आहेत. आधी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात येणार असताना मध्येच अंदाजपत्रकात बदल करून काम उरकावे म्हणून अॅल्युमिनियमच्या टाक्या बांधल्या यामुळे टाकीचे आयुष्य कमी झाले आहे.



या गावांत टंचाई


गोळीचापाडा, धामोडी, वारघडपाडा, वाशाळा, मडक्याची मेट हनुमान टेकडी, केवनाळा,पाथर्डी, हेदवाडी, गोमघर, वाघवाडी, किनिस्तेपैकी गवरचरीपाडा, जांभूळवाडी या ग्रामीण भागातील गावांप्रमाणेच मोखाडा शहरातील वारघडपाडा, घोसाळी आणि तेलीपाडा या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून मेपर्यंत ही टंचाई अधिक प्रमाणात वाढणार आहे.

Comments
Add Comment