
प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना मोठी पसंती
अनंता दुबेले
कुडूस : विवाह सोहळा, सप्ताह, पूजा व धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी सध्याच्या आधुनिक युगात हद्दपार झाल्याचे चित्र आता ग्रामीण भागातही सर्रास पहावयास मिळत आहेत. तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना समाजात अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
विवाह सोहळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे. त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे असा छोट्या खानी रोजगार देणारा व्यवसाय मागणी कमी होत असल्याने जवळजवळ बंदच झाला आहे.
/>
पुरातन काळापासून मंगलकार्याच्या जेवण समारंभासाठी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. आयुर्वेदीय गुणधर्म असलेली पळसाच्या पानाची पत्रावळी सध्या लोप पावत असून, शहरातील पानटपरीवालेही सध्या पार्सल मावा पळसाच्या पानात बांधून न देता आता कागद किंवा प्लास्टिकमध्ये बांधून देत असल्याने पळसाच्या पानांची मागणी आपोआपच घटली आहे. परिणामी, जंगल परिसरातील स्थानिकांचा रोजगाराचे साधन असलेला हा व्यवसाय बंद झाल्याचे दिसत आहे.
जेवणाचा स्वाद वेगळाच
- पळसाच्या पानांनी बनविलेल्या पत्रावळीत जेवणाचा स्वाद अलगच असायचा, असे जुने जाणते वयोवृद्ध नागरिक आजही अभिमानाने सांगत आहेत.
- कारण पळसाच्या पत्रावळीला आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने जेवण लवकर पचत असते.
- अशी विविध गुणधर्म असलेली पळसाच्या पानांची पत्रावळी सध्याच्या स्थितीत हद्दपार झालेली असून, तिची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली असल्याचे दिसत आहे.
आदिवासींचा रोजगारही बुडाला
पुरातन काळापासून मंगलप्रसंगी जेवण समारंभासाठी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. आयुर्वेदीय गुणधर्म असलेल्या पत्रावळी सध्या लोप पावत असून, पानटपरीवालेही सध्या पार्सल, मावा आदी वस्तू पानात बांधून न देता कागद, प्लास्टिकमध्ये बांधून देत असल्याने पळस पानांची मागणी घटली आणि परिणामी जंगलातील आदिवासींच्या रोजगाराचे साधन बंद झाले आहे.