
मंत्री नितेश राणे यांचा मूर्तीची विटंबना प्रकरणी संताप
पुणे : मशिदीत जर हा प्रकार घडला असता, तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? असा सवाल बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना प्रकरणी आपला संताप व्यक्त केला. पुणे विभागातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी बोलणी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असता, त्यांनी जे उत्तर दिले, त्यावरून लक्षात येते की बापाच्या विचारांवर मुलगा कसा आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसविले आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज्यात तारापूर, नागपूर आणि पुणे येथे मत्स्यालय सुरू करण्यात येणार असून, पुण्यातील मत्स्य विभागाच्या हडपसर येथी १६ एकर जागेत मत्स्यालय उभारता येऊ शकते का, याबाबत चर्चा झाली. मत्स्य उत्पादनवाढीसाठी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आली आहेत. तसेच सध्याच्या मासळी बाजारांच्या स्थितीबाबतही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादन वाढ आणि आर्थिक स्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना उद्दिष्ट्ये देण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास अपेक्षित मत्स्य उत्पादन नाही. या बैठकीत मत्स्य उत्पादन कसे वाढवता येईल, तलावात मासेमारी करणाऱ्यांसाठी मंत्रालयाच्या वतीने काय करता येईल, तसेच तलावातील गाळ आणि अतिक्रमणे कशी काढता येतील यावर चर्चा झाली. यासोबतच मासळी बाजार कुठे आहेत, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि नवीन बाजार कुठे सुरू करता येतील यावरही विचारविनिमय करण्यात आला, असेही राणे यांनी सांगितले.
/>
तलावांच्या ठेकेदारांनी उत्पादनावर पुरेसे लक्ष दिलेले नाही. ठेकेदार काम करतो आहे की नाही, हे देखील तपासले जाईल. मत्स्य विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटलायझेशन आणली जाईल आणि उत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जातील. उजनी धरण जलसंपदा मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन या धरणाची जबाबदारी मत्स्य खात्याकडे देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा खात्याकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.