
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) बद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान
पहलगाम हल्ल्यात महिलांचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्वस्त करत, भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ल्यात मृत पावलेल्या २६ जणांना न्याय मिळवून दिला आहे. यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने फतेह मिळवला. भारताच्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला खरा, पण या हल्ल्याची बातमी मिळताच देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिले विधान केले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारताच्या तिन्ही सैन्यांचे अभिनंदन करताना त्यांनी सांगितले की "भारतीय सैन्याने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. आणि हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे."
पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील
या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि देशाच्या सद्य परिस्थितीची माहिती देतील अशी माहिती समोर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होतील.
कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब ठार
भारतीय सैन्याने काल रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. त्याच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा यात मृत्यू झाला आहे.