Thursday, May 8, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

'ऑपरेशन सिंदूर'मुळे बांगलादेश क्रिकेट संघ चिंतेत

'ऑपरेशन सिंदूर'मुळे बांगलादेश क्रिकेट संघ चिंतेत

ढाका : भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले केले.यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत, परंतु बांगलादेशमध्येही दहशत दिसून येत आहे. या प्रकरणात बांगलादेशने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल सध्या पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. अजूनही बरेच सामने बाकी आहेत. तथापि, आतापर्यंतच्या वृत्तांनुसार, पीएसएल त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील. दरम्यान, पाकिस्तानमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, बांगलादेशला सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या आणि पीएसएल खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंची चिंता वाटू लागली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला आहे आणि पीएसएलमध्ये खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल बोलले आहे असे वृत्त आहे.

बांगलादेशचा लेग-स्पिनर रिशाद हुसेन लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे, तर वेगवान गोलंदाज नाहिद राणा पेशावर झल्मीचा खेळाडू आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूंच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील याची खात्री करण्यासाठी ते पीसीबी आणि इस्लामाबादमधील त्यांच्या उच्चायुक्तांच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे लवकरच बांगलादेश क्रिकेट संघही पाकिस्तानचा दौरा करणार आहे, जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. ही मालिका मे महिन्याच्या २५ तारखेपासून आहे, ही मालिका देखील रद्द होण्याची शक्यता आहे.

सध्या फक्त दोन बांगलादेशी खेळाडू पाकिस्तानात आहेत.बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी सांगितले की, त्यांच्याकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, ते अजूनही वाट पाहत आहेत. येत्या काळात पाकिस्तानमध्ये परिस्थिती कशी असेल ते आपल्याला पहावे लागेल. बांगलादेश संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत ते म्हणाले की, त्यासाठी पुढील चार ते पाच दिवस वाट पाहावी लागेल. यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांची चिंता नाहिद राणा आणि रियाज हुसेन यांची आहे, जे सध्या पाकिस्तानात आहेत.

Comments
Add Comment