
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यातील सामना अनिर्णीत ठरला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना केवळ एकच गुण मिळाला. मात्र यामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत. जाणून घेऊया की आता आयपीएलच्या प्लेऑफचे समीकरण काय असणार आहे...
जाणून घेऊया पॉईंट्स टेबलचे गणित
या सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये जबरदस्त बदल झाले आहेत. दिल्लीच्या संघाला एक गुण मिळाला आहे आणि ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. आतापर्यंत दिल्लीने ११ सामने खेळले आहेत आणि ६ विजयासह त्यांचे १३ गुण आहेत. म्हणजेच आता दिल्लीचे ३ सामने बाकी आहे आणि प्लेऑफच्या आशा कायम आहेत.
तर हैदराबादचा संघ ११ सामन्यांमध्ये ७ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. म्हणजेच जर हैदराबादने आपलेले उरलेले ३ सामने जरी जिंकले तरी त्यांचे एकूण १३ अंक होतील. म्हणजेच हैदराबादच्या आशा संपल्या आहेत. राजस्थान आणि चेन्नई नंतर आता हैदराबादचा तिसरा संघ आहे जो प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
सध्याच्या वेळेस पॉईंट्सटेबलमध्ये आरसीबीचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांचे ११ सामन्यात ८ विजयासह १६ गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहेत. त्यांचे ११ सामन्यांत ७ विजयासह १५ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर मुंबईचा संघ आहे. त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. गुजरातचा संघ १० सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
सगळ्यात तगडी टक्कर कोलकाता आणि लखनऊ यांच्यात आहे. कोलकाताचे ११ सामन्यांत ११ गुण आहेत. म्हणजेच उरलेल्या ३ सामन्यांत केकेआरने विजय मिळवला तर त्यांचे १७ गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. तर लखनऊच्या संघाचे अजूनही १० गुण आहे आणि ३ सामने बाकी आहेत. ते जर सर्व सामने जिंकले तर त्यांचेही १६ गुण होतील.
हैदराबाद आणि दिल्लीच्या या सामन्याने आता प्लेऑफची शर्यत अधिक रोमहर्षक झाली आहे.