
प्रवास हा माणसाला समृद्ध करत असतो. प्रत्येकाला कुटुंब आणि मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जावं असं वाटतं. पण या प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी तुमचं आरोग्य देखील तितकंच उत्तम असणे गरजेचे असते. अनेकजण आनंदासाठी, निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी प्रवास करतात. तर काही जण कामाचा भाग म्हणून प्रवास करतात. प्रवासात सगळ्यांनाच आपल्या तब्येतीची खूप काळजी असते. कारण प्रवासादरम्यान अनेकांना उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी, पोटदुखी, अशक्तपणा यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, अशा परिस्थितीत प्रत्येकाने प्रवास करताना आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी काही खबरदारी घ्यायला हवी. कारण त्यांच्याकडून काही निष्काळजीपणा त्यांच्या समस्येला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान आपण आपल्या फिटनेसची काळजी कशी घेऊ शकतो हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
/>
प्रवासात भरपूर पाणी प्या
प्रवास हा फार दमवणारा असतो. अशामुळे प्रवासात तुम्ही कायमच स्वतःला हायड्रेड ठेवणे खूप गरजेचे असते. अशावेळी स्वतःची बाटली सोबत ठेवा. सतत पाणी तुमच्या सोबत कसं राहिल याची काळजी घ्या.. तसेच प्रवासात डोकेदुखी किंवा थकवा येण्याची दाट शक्यता असते. अशावेळी भरपूर पाणी प्या.
आरोग्यदायी पदार्थ खा
प्रवास करताना खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी न घेतल्यास प्रवासादरम्यानचं तुमचंआरोग्य बिघडू शकते. प्रवासादरम्यान डिहायड्रेशनमुळे चिंताग्रस्त होणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रवास करताना आरोग्यदायी पदार्थ खा आणि पाणी प्या. जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. सफरचंद, डाळिंब, पेरू यांसारखी काही फळे तुम्ही घरून घेऊन जाऊ शकता.
चहा -कॉफी टाळा
प्रवासात दगदग मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी चहा-कॉफी टाळा. तसेच विमानाने प्रवास करत असताना बोर्डिंगच्या ६० मिनिटे आधी आणि लँडिंगनंतर ६० मिनिटे चहा-कॉफी टाळा. तसेच रोड प्रवास करत असाल तेव्हा देखील चहा-कॉफी कटाक्षाने टाळा. रोड प्रवास करत असताना झोप लागू नये म्हणून कॅफिनचे सेवन केले जाते. मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
तेलकट पदार्थ टाळा
प्रवासाला बाहेर पडल्यावर वडापाव, भजी इत्यादी फास्ट फूड पदार्थ लांबच्या प्रवासात सहज उपलब्ध होतात आणि आपणही सहजतेने खातो. मात्र सतत या पदार्थांचे सेवन केल्याने आजारी पडण्याचा धोका असतो. या पदार्थांनी पित्त होऊन मळमळ, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे त्रास होऊ शकतात. म्हणूनच प्रवास करताना तेलकट पदार्थ कमी खाणे किंवा दूर राहणे चांगले.
फिटनेस फ्रिक
जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल आणि तुमची दिनचर्या खंडित करू इच्छित नसाल, तर यासाठी तुम्ही तुमची जंपिंग रोप आणि योगा मॅट सोबत घ्या. ज्याच्या मदतीने तुम्ही हॉटेलच्या खोलीत किंवा बाहेर बागेत व्यायाम करू शकाल. यामुळे तुमचे व्यायामाचे वेळापत्रक बिघडणार नाही.
चांगली झोप
प्रवास करताना तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे सहलीचा आनंद घेण्याबरोबरच विश्रांती घ्या आणि ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे प्रवासादरम्यान येणारा ताण आणि थकवा यापासून आराम मिळेल.
आवश्यक औषधे घ्या
बाहेर फिरायला जाताना कुणालाही किरकोळ दुखापत होऊ शकते किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यासाठी काही औषधे नेहमी बरोबर ठेवा. जर तुमच्यापैकी कोणी आधीच मधुमेह आणि बीपीचा रुग्ण असेल तर त्यांची औषधे तसेच शुगर आणि बीपी टेस्टिंग मशीन सोबत ठेवा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
तुम्हाला आधीच काही आरोग्य समस्या असल्यास, प्रवास करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि प्रवासादरम्यान तुमच्या आहाराची आणि विश्रांतीची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी प्रहार न्यूजलाईन केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून प्रहार न्यूजलाईन कोणताही दावा करत नाही.)