Monday, May 5, 2025

तात्पर्यसंपादकीय

ध्वनी प्रदूषण: अदृश्य अक्राळ विक्राळ स्वरूप

ध्वनी प्रदूषण: अदृश्य अक्राळ विक्राळ स्वरूप

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

प्रदूषण ही या विश्वासाठी खूप मोठी आरोग्य समस्या आहे आणि ही समस्या मानवनिर्मितच आहे. प्रदूषणाचे प्रकार हे सर्वांना माहीतच आहेत. ज्याच्याकडे खूप सहज दुर्लक्ष होते असे ‘ध्वनी प्रदूषण’; परंतु ते किती गंभीर आहे हे तुम्हाला पुढील लेख वाचल्यावर नक्कीच समजेल. ध्वनी प्रदूषण हे आनंदाच्या नावाखाली असणारे अदृश्य अक्राळ विक्राळ सजीवसृष्टीचे आरोग्य कमकुवत करणारे अवर्णनित स्वरूप आहे. ध्वनी प्रदूषण होण्यासाठी या विश्वात अनेक स्त्रोत आहेत. ट्रॅफिकमधील वाजवले जाणारे हॉर्न, बांधकाम, आपले सण आणि आनंदाचे क्षण व्यक्त करण्यासाठी आपण घेतलेला बँडपासून ते लाऊड स्पीकरचा आधार. WHO नुसार ६५ डेसिबल (dB) पेक्षा जास्त आवाज हा ध्वनी प्रदूषण मानला जातो. ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज हानिकारक आहे आणि १२० डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा वेदनादायक आहे. आपण धाब्यावर बसवलेले ध्वनी प्रदूषण नियम पाहूयात. महाराष्ट्रात ध्वनी प्रदूषणाचे नियमन करण्यासाठी ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० लागू आहेत. या नियमांनुसार, रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रांमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी मर्यादेत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी निवासी भागात दिवसा आणि रात्री अनुक्रमे ५५ dB आणि ४५ dB इतकी ध्वनी मर्यादा आहे. या नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत निवासी क्षेत्रांमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी ४५ डेसिबल (A) Leq वर ठेवणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस उप आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण नेमले गेलेत. ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी करण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येते. ध्वनी प्रदूषणाचा जगण्याच्या अधिकारावर विपरीत परिणाम होतो जो संविधानाच्या कलम २१ मध्ये अंतर्भूत केलेला मूलभूत अधिकार आहे. कलम २९१, भारतीय दंड संहिता, १८६० ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरण आणि सभोवतालची महत्त्वपूर्ण हानी होत असल्याने, तुम्हाला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि रु.१ लाख किंवा दोन्ही, जर तुम्ही ध्वनी प्रदूषण करत असाल, तर ही शिक्षा होऊ शकते. एवढे असूनही हा आवाज दीडशे ते २०० डेसिबल पेक्षा जास्तच्या आसपासच असतो. ध्वनी प्रदूषणाचे परिणाम हे सुद्धा खूप भयंकर गंभीर आहेत. श्रवणविषयक नुकसान, धडधडणे आणि टिनिटस. ध्वनी प्रदूषणाच्याच्या संपर्कात आल्यामुळे हृदयविकाराचा झटका खूप सहज येऊ शकतो. हृदय व रक्तवाहिन्या संबंधित रोग होतात. मुलांमध्ये ज्ञानात्मक कमतरता आणि नकारात्मकता शिवाय श्रवणशक्ती कमी होणे हे मोठ्या प्रमाणात होत आहे. अत्याधिक आवाजामुळे मानसिक आणि शारीरिक अनेक आजार होतात. WHO नुसार ३०डीबी पेक्षा जर जास्त आवाज असेल, तर तुमच्या झोपेवर परिणाम तर होतोच आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. शिवाय झोप पूर्ण न झाल्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि मग वर्तणुकीवर त्याचा सुप्त परिणाम होतो, आक्रमकता आणि चिडचिड वाढते, स्मरणशक्ती आणि एकाग्रता यावर परिणाम होतो शिवाय कशातच लक्ष लागत नाही. अशक्तपणा जाणवतो. दरवर्षी १२ हजार अकाली मृत्यू आणि ४८ हजार नवीन इसकेमिक हृदयरोगांच्या घटना या केवळ ध्वनी प्रदूषणामुळे होत असतात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निरोगी आणि शांत वातावरणाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हे एक आव्हान आणि बहुसंख्य मूक पीडितांवर काही लोकांची गुंडगिरी लादण्याचे ही कृती प्रतिनिधित्व करते. केंद्र किंवा राज्य स्तरावर योग्य कायदे असल्याची खात्री करून, असे गुन्हे दखलपात्र बनवून आणि उल्लंघन करणाऱ्या उपकरणांची जप्ती आणि कठोर शिक्षेची तरतूद करून हे थांबवण्याची वेळ आली आहे. हे उल्लंघन व्यापक आणि स्पष्ट आहेत. कारणे कोणतीही असोत पण उघडपणे आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करत आहेत. असहाय्य आणि वरिष्ठ नागरिकांच्या रक्षणासाठी संवेदनशीलतेने काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनाही बंधनकारक केले पाहिजे. काही ना काही कारणानिमित्ताने नेहमीच वाजणारा बँड, माइक, बॅन्जो यांची आवश्यकता आहे का? या धकाधकीच्या जीवनात समाजाची मानसिक आणि शारीरिक स्थिती कमजोर आहेच आणि त्यात भरीस भर म्हणून हे ध्वनी प्रदूषण. वसाहतींमध्ये सर्व वयोगटातील व्यक्ती राहतात. या धावपळीच्या जीवनात अनेक आजार मुळातच आहेत. या तरुण पिढीला याचे परिणाम आता जाणवत नसतील; परंतु कालांतराने ते परिणाम खूप भयंकर असतील.भारत हा देश असा आहे की जिथे अनेक सण साजरे होतात शिवाय मंदिर आहेत, अनेक दैनंदिन जीवनात येणारे कार्यक्रम आहेतच अशा वेळेस एखाद्या वसाहतीमध्ये वाजणारा बँड, माइक हा वर्षभरातून किती वेळा वाजतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण नैसर्गिकरित्या कमकुवत झालेल्या शरीर आणि मनावर त्याचे किती आघात होत आहेत. या ध्वनी प्रदूषणामुळे मानव त्याचे शरीर शास्त्र पूर्णपणे बिघडवत आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असणाऱ्या सर्व कार्यांमध्ये या ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा सहभाग आहे. मानव खूपच विध्वंसक प्रवृत्तीने आपले जीवन व्यतीत करत आहे. यांत मानव स्वतःचाच नाही, तर सर्व सजीव सृष्टीचा विध्वंस करत आहे. हे झाले मानवाबद्दल. पण कधी सजीव सृष्टीतील इतर घटकांचा विचार केला आहे का? जर मानवाला एवढा त्रास होत असेल तर इवल्याशा पशु-पक्षी कीटक या घटकांना किती त्रास होत असेल? तुम्हाला माहीत आहे का, या ध्वनी प्रदूषणामुळे हे घटक ताबडतोब स्थलांतरित होतात. आता तुमच्या लक्षात आले असेलच की, आपण लहानपणी बघत असलेल्या चिमण्यासुद्धा आपल्याला दिसत नाहीत. हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे, तर सजीव सृष्टीतील इतर घटकांबद्दल काय बोलावे? महत्त्वाचे म्हणजे यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे यांची शारीरिक प्रजनन क्षमताही कमकुवत होते. पहाटे उठणारे हे पक्षी संध्याकाळी सातच्या दरम्यान झोपतात. म्हणजेच निसर्ग नियमाप्रमाणे वागतात अशा वेळेला निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण जी काही अराजकता करत आहोत ती आपल्या पुरती मर्यादित न राहता आपण जबरदस्तीने या निरपराध आणि निस्वार्थी जीवांवर लादत आहोत. या पक्ष्यांना सुद्धा ध्वनी प्रदूषण आणि विनाकारण लावलेल्या प्रखर लाईटचा किती त्रास होत असेल याचा विचार केलाय का कधी? प्रदूषणाच्या सर्व कारणांमुळे मुळात हे नामशेष झाले आहेत. या बिचाऱ्यांचा अंत निश्चित आहेच; परंतु आता मानवाची वेळ आली आहे याची जाणीव मानवालाच होत नाही. कारण काय असावे बरे? आनंद? स्पर्धा की सूडबुद्धी?थोडक्यात काय तर विध्वंसक प्रवृत्ती. हातावर मोजण्या एवढ्या संघटना ध्वनी प्रदूषणावर कार्य करीत आहेत. आता आपल्याला ठरवावे लागेल की, कमीत कमी मी या ध्वनी प्रदूषणावर माझ्याकडून नियंत्रण करेन. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. कारण याचे परिणाम सर्व जग भोगत आहे; परंतु त्यात आपणही आहोत हे विसरून चालणार नाही.  
Comments
Add Comment