Tuesday, May 6, 2025

विशेष लेखसंपादकीय

जिहादी जनरल...

जिहादी जनरल...

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर


पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी भारताच्या विरोधात काही प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्यानंतर काही दिवसांतच काश्मीरमधील पहलगाम येथे हत्याकांड घडले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यंटकांची पॉइंट ब्लँक हत्या झाली. पहलगाम हत्याकांडानंतर देशातून सर्वस्तरातून पाकिस्तानच्या विरोधात संताप आणि आक्रोश प्रकट झाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा म्हणून लोक रस्त्यावर उतरले. दहशतवादाला फूस कोणाची? पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली. दहशतवादी हत्याकांड कोणी घडवले? पहलगाम हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण? दहशतवाद्यांना एके ४७ देऊन पहलगाममध्ये कोणी पाठवले? याची उत्तरे शोधताना असिम मुनीर यांनी भारतावर गरळ ओकणारी व काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना उत्तेजन देणारी जी वक्तव्ये केली, त्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? असिम मुनीर हे पाकिस्तानचे शक्तिशाली लष्कर प्रमुख आहेत. ते कट्टरतावादी आहेत. जिहादी जनरल किंवा मुल्ला जनरल अशी त्यांची प्रतिमा आहे.


असिम मुनीर म्हणतात, (१) पाकिस्तानची निर्मिती हिंदू विरोधातील द्वेषामुळे झाली. कुराणातील कलमाच्या आधारावर दोनच राष्ट्रे निर्माण झाली. पाकिस्तान आणि रियासत ए तोयबा. (२) हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फरक आहे. जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही. (३) पाकिस्तान त्यांच्या काश्मिरी भावांना एकटे सोडणार नाही. (४) काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे.


काश्मीर खोऱ्यात रक्तपात घडविणारे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षित असतात हे वेळोवेळी उघडकीस आले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी काश्मीर ही आमची जीवनदायी नस आहे, असे वक्तव्य करून भारताला एकप्रकारे इशाराच दिलेला आहे. एका देशाचा लष्कर प्रमुख अशी वक्तव्ये कशी करू शकतो? पण पाकिस्तानात आपणच श्रेष्ठ व शक्तिमान आहोत, हे जगाला दाखविण्याचा जनरल असिम मुनीर यांचा प्रयत्न असावा. असिम मुनीर यांचे वडील एका शाळेत मुख्याध्यापक होते. स्थानिक मशिदीचे ते इमामही होते. मुनीर यांचे प्राथमिक शिक्षण मदरशातून झाले. मांगला येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधे प्रशिक्षण घेऊन त्यांनी सैन्यात प्रवेश केला. झिया उल हक हे लष्कर प्रमुख असताना त्यांनी सैन्याला जिहादी चेहरा देण्याचा प्रयत्न केला. भारताशी युद्ध करताना त्याला धर्मयुद्धाची जोड मिळाली पाहिजे असा झियांनी प्रयत्न केला. मुनीर यांच्यावरही इस्लामिक वर्चस्वाचा प्रभाव आहे. सौदी अरेबियात काम करीत असताना त्यांनी कुराण तोंडपाठ म्हणून दाखवले होते. त्याबद्दल त्यांना हाफिज ए कोरान हा किताबही देण्यात आला होता. त्यांच्या भाषणात नेहमीच इस्लामची उदाहरणे आणि कुरणातील कलमांचा समावेश असतो. असिम मुनीर यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून काम केले आहे. इस्लामाबाद येथील नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीतून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी सौदी अरेबियात काम केले आहे. असिम मुनीर यांनी काश्मीरचा मुद्दा अचानक उपस्थित केला आणि त्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठे हत्याकांड घडले व त्यात हिंदू पर्यटकांना टिपून मारले. साठ वर्षांच्या असिम मुनीर यांची २०२२ मध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख पदावर नियुक्ती झाली. अगोदर ते आठ महिने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख होते. इम्रान खान पंतप्रधान असताना असिम मुनीर यांना आयएसआय प्रमुख पदावरून हटवले. सध्या इम्रान खान भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेलमध्ये आहेत व जनरल असिम मुनीर हे पाकिस्तानमधील लष्कराच्या सर्वोच्च पदावर आहेत.


दि. ५ फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिनाच्या कार्यक्रमात मुझफ्फराबादमध्ये बोलताना जनरल मुनीर म्हणाले, पाकिस्तानने काश्मीरसाठी आजवर तीन युद्धे लढली आहेत. गरज पडल्यास आणखी दहा युद्धे लढण्याची पाकिस्तानची तयारी आहे. पाकिस्तानच्या सिनेट सदस्य पलावाशा मोहम्मद झई या भारतावर गरळ ओकण्यात माहीर आहेत. त्या म्हणतात, अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैन्याकडूनच रचली जाईल. पहिली अझान असिम मुनीर देतील.


पलावशा यांनी व्हेनेझुएलाचे दिवंगत राष्ट्रप्रमुखांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. त्या म्हणतात, आपल्याकडे बंदुका आहेत, आपल्याकडे शस्त्रे आहेत. आपल्याकडे झाडे आहेत. जर शत्रूच्या सैन्याने काहीही (हल्ला) केले, तर आम्ही त्यांचे मृतदेह आपल्या झाडांवर लटकवू...


शीख सैन्य पाकिस्तानवर हल्ला करणार नाही, कारण त्यांच्यासाठी ही गुरू नानकांची भूमी आहे, आपले सैन्य ६-७ लाख नाही, तर २५ कोटी जनता सैन्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभी राहील, अशीही दर्पोक्ती पलवाशा यांनी केली आहे. पलवाशा या सत्ताधारी बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीत आहेत. पक्षाच्या माहिती सचिव आहेत. त्या सिंधचे प्रतिनिधीत्व करतात. भारताने सिंधू नदीचे पाणी बंद केले जाईल असा इशारा पाकिस्तानला दिल्यानंतर बिलावल भुत्तो झरदारी म्हणाले, सिंधू आमची आहे. आमची राहील. एक तर आमचे पाणी त्यातून वाहील नाही, तर भारतीयांचे
रक्त वाहील....


पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांनी तर पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही असे सांगताना भारताने सिंधू नदीवर धरण बांधले, तर पाकिस्तान हल्ला करील अशी भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांच्या सुरात सूर मिसळून भारताच्या विरोधात भडक बोलण्याची पाकिस्तानमधे जणू शर्यत लागली आहे. त्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळेत दोन्ही देशांत युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे.


पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबाशी हमासचे कसे संबंध आहेत, त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. दहशतवादी संघटनाचे नेते रोज भारताला कसे धमक्या देत आहेत, पाकिस्तानमधील विविध पक्षांचे नेते आणि धार्मिक नेते भारताविरोधात कशी गरळ ओकत आहेत, त्याच्याही क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत. भारताने पाकिस्तानला सिंधू नदीचे पाणी स्थगित करण्याची धमकी दिली व पाठोपाठ चिनाब नदीचे पाकिस्तानात वाहून जाणारे पाणीही थांबवले. पाकिस्तानातून योणाऱ्या आयातीवर बंदी घालण्यात आली. भारतात राहात असलेल्या हजारो पाकिस्तानी नागरीकांची मायदेशी पाठवणी केली. पाकिस्तानी विमानांना भारताने आपले हवाई क्षेत्र बंद केले. अटारी व वाघा या सीमा भारत सरकारने सील केल्यात. पाकिस्तानला जाणारी टपाल सेवाही बंद झाली. पाकिस्तानातून समुद्रमार्गे येणाऱ्या बोटींना मनाई केली. भारतात वास्तव्य असलेल्या पाकिस्तानी नागरीकांची शोध मोहीम तपास यंत्रणांनी सुरू केली. भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानची चोहोबाजूने आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला व काश्मिरी सीमेवर राहणाऱ्या लोकांना घरात दोन महिने पुरेल एवढे अन्न-धान्याचा साठा (रेशन) करून ठेवावे, असे फर्मान पाकिस्तान सरकारने काढले आहे. पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अन्वरूल यांनी तर तेरा मतदारसंघात दोन महिन्यांचे रेशन साठा करून ठेवायला सांगितले आहे. एक लाख अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी उभारण्यात आला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत सैन्य तैनात करण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील एक हजार मदरसे दहा दिवसांसाठी बंद ठेवले आहेत. भारत सरकारमधील कोण ना कोण मंत्री किंवा उच्च पदस्थ, चुन चुन के मारेंगे अशा धमक्या पाकिस्तानला व दहशतवाद्यांना देत आहेत. भारत सरकारने सर्व राज्यांत नागरीकांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणाचा भाग म्हणून मॉक ड्रीलचा आदेश जारी केला.


पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीत २४ एप्रिल रोजी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यात गृहमंत्रालयाने सादरीकरण केले. जून २०१४ ते २०१४ या काळात १६४३ दहशतवादी हल्ले झाले, १९२५ घुसखोरीचे प्रयत्न झाले. ५७६ सुरक्षा सैनिक ठार झाले, अशी आकडेवारी आहे. पठाणकोट, पुलवामा, पगलगाम ही मालिका थांबलेली नाही. अशा मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही पाकिस्तानला अद्दल घडविण्यात आपण कुठे कमी पडतोय का? भारताच्या तुलनेने पाकिस्तान खूप छोटा देश आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य किती तरी प्रचंड आहे. मग वारंवार दहशतवादी हल्ले का चालू राहतात? निरापराध भारतीयांचे त्यात का बळी जातात? पाकिस्तानने दहशवादी हल्ले करायचे आणि भारतीय जनतेने मॉक ड्रिल करायचे, हे किती दिवस चालू राहणार? पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवावा, हीच जनभावना आहे. ४४ सुरक्षा सैनिकांचे बळी घेणाऱ्या पुलवामा हल्ल्यातील दहशवाद्यांचे काय झाले हे कळले नाही. आता २६ पर्यटकांचे हत्याकांड घडविणाऱ्या पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी कुठे गेले हेही समजले नाही...


[email protected]
[email protected]

Comments
Add Comment