
मुंबई अग्निशमन दलाने दिला सावधानतेचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी): सध्या मुंबईसह संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एकूणच, तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याने विजेच्या उपकरणांवर ताण येऊन परिणामी घर, कार्यालये व औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईकर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, त्यामुळे सावधगिरी हा सर्वोत्तम उपाय आहे, ही भावना लक्षात घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलामार्फत करण्यात येत आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे तापमान वाढून विजेच्या वाहिन्या (इलेक्ट्रिक वायरिंग) गरम होणे, शॉर्टसर्किट होणे, गॅस गळतीच्या घटनांना सुरुवात होणे, पंखे, वातानुकूलित मंत्रणा, फ्रिज व इतर उपकरणांचा अतिवापर आणि त्या अनुषंगाने वीज वापरावरील ताण या साऱ्यांमुळे आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढतो. या पाश्र्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने १ मे २०२५ रोजी परिपत्रक प्रसारित केले आहे.
या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे नागरिकांना उष्णतेच्या लाटेमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबद्दल आवाहन करण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण व सज्जता राखली जाते. तरीही मुंबईतील कोट्यवधी नागरिकांनी जर खबरदारी घेतली, तर आग लागण्यासारख्या घटनांमध्ये लक्षणीय घट होऊ शकते, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी नमूद केले आहे.
मुंबईकरांनी घरात काय घ्यायला हवी काळजी
घरगुती व व्यावसायिक ठिकाणांवरील विजेची वायरिंग, प्लग, स्विच बोर्ड्स आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी.
जुन्या किवा जीर्ण वायरिंगची आवश्यक असल्यास तज्ज्ञाच्या मदतीने दुरुस्ती करावी. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जीने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.
एकाय प्लग संकिटमध्ये अनेक विद्युत उपकरणे लावणे टाळावे, वातानुकूलित (AC) यंत्रणेची नियनित देखभाल (maintanace) करणे आवश्यक आहे. घरात, दुकानात किंवा कार्यालयात किमान एक 'फायर एक्सटिंग्विशर' ठेवावा आणि त्याचा योग्य वापर शिकून घ्यावा.
रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर 'फायर सेफ्टी ऑडिट' करणे बंधनकारक आहे.
कोणतीही आग लागल्यास वेळ न दवडता १०१ या आपात्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.