
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची भूमिका अधिकच आक्रमक झाली आहे. सिंधू पाणी करार थांबवणे, व्यापार आणि टपाल सेवा बंद करणे, तसेच राजनैतिक संबंध तोडणे या सगळ्या पावल्या युद्धाच्या दिशेने टाकल्या गेलेल्या वाटचालीसारख्या दिसत आहेत. देशात आतापर्यंत जी कारवाई झाली, ती केवळ ट्रेलर असल्याचं स्पष्ट होतंय. प्रत्यक्षातील चित्रपट अजून सुरू व्हायचाय.
या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारत १० किंवा ११ मे रोजी पाकिस्तानवर मोठा हल्ला करू शकतो, असा दावा पाकिस्तानमधील एके काळचा भारतीय उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की रशियाच्या विजय दिनानंतर भारत कारवाई करेल. विशेष म्हणजे, पाकिस्तानमधील गुप्त यंत्रणांनाही भारताच्या संभाव्य हल्ल्याची कल्पना आहे, असंही ते म्हणाले.
/>
रशिया दरवर्षी ९ मे रोजी विजय दिन साजरा करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात सहभागी होणार होते, मात्र पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांनी ही भेट रद्द केली आहे. त्यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जाणार होते, परंतु आता त्यांचीही ही भेट रद्द झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, भारतात उद्या म्हणजेच ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. या सरावामध्ये सामान्य नागरिकांना युद्धसदृश परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. सायरन वाजवले जातील, खबरदारीची उपाययोजना सांगितली जाईल. विशेष म्हणजे, १९७१ नंतर प्रथमच अशा स्वरूपाचा देशव्यापी सराव होत आहे.
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या चार दिवस आधी अशीच एक मॉक ड्रिल झाली होती. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या त्या सरावानंतर ३ डिसेंबर रोजी युद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न निर्माण झालाय.
भारतीय हवाई दलाने नुकतीच उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा भव्य सराव केला. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळात लँडिंग, टेक-ऑफ आणि कमी उंचीवरील फ्लाय-पास्टसारख्या तंत्रांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. रात्री ९ ते १० दरम्यान झालेलं लँडिंग हे विशेष आकर्षण ठरलं. या सरावाद्वारे भारतीय हवाई दलाच्या अचूकतेचा आणि सज्जतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही आपला देश सतर्क असल्याचं नमूद केलं असून, भारत नियंत्रण रेषेवर कधीही हल्ला करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या घडणाऱ्या घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट आहे की, भारत युद्धाच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ घोषणा बाकी आहे.