
मध्य प्रदेश: उज्जैनच्या महाकाल मंदिर (Ujjain Mahakal Temple) परिसरात अचानक मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या शंख द्वारजवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या, आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेमुळे संपूर्ण मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मंदिर परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच उज्जैनचे जिल्हाधिकारी आणि एसपी देखील घटनास्थळी उपस्थित राहिले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही बातमी नाही.
प्रदूषण मंडळाचा नियंत्रण कक्ष जळून खाक
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात ही आग लागली, त्या परिसरात प्रदूषण मंडळाचा नियंत्रण कक्ष होता. या आगीत प्रदूषण मंडळाचा नियंत्रण कक्ष पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.