
कर्जत : कर्जत तालुक्यात पुणे जिल्हा लगतचे शेवटचे गाव असलेल्या मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील स्टेशन ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे आवार सौर दिव्यांनी उजळून गेले आहे. चिराग फाऊंडेशन या संस्थेने गावातील चौक उजळविण्यासाठी शाळेसाठी असे एकूण सहा सौर दिवे दिले आहेत. शाळेच्या आवारातील रात्रीच्या वेळी दिव्याचा प्रकाश पाहून हे सौर दिवे कोणी बसवले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
ठाकूरवाडी जिल्हा परिषदेची शाळा रात्रीच्या वेळी अंधारात असते. शाळेच्या परिसरात मोठी मोकळी जागा असून देखील रात्रीच्या वेळी अंधार असल्याने तेथे गप्पा मारण्यासाठी किंवा कोणते खेळ खेळण्यासाठी कोणालाही बसता येत नाही. ही समस्या चिराग फाऊंडेशन या संस्थेकडे राज्यातील प्रयोगशील शिक्षक वेच्या गावित यांच्याकडून उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर चिराग फाऊंडेशन चे काही पदाधिकारी स्टेशन ठाकूरवाडी मध्ये आले आणि त्यांनी गावाची पाहणी केली. गावात वीज आहे पण गावातील लोकवस्ती मधील चौक हे कायम अंधारात आहेत, तसेच शाळेच्या आवारातील अंधार पाहून एक नाहीतर चक्क सहा सौर ऊर्जेवर चालणारी दिवे भेट देण्याचा निर्णय या फाऊंडेशनने घेतला.
मोलमजुरी करणारे स्टेशन ठाकूरवाडी गावातील ग्रामस्थ दिवसा बाहेर असतात. त्यांच्या अनुपस्थितीत चिराग फाऊंडेशनचे कार्यकर्ते सोलर पॅनल घेऊन पोहोचले आणि त्यांनी सिमेंट खडी यांच्या साहाय्याने सर्व सहा सौर दिवे बसवून गावातून आपले कामाचे ठिकाण गाठले. . शाळेतील संजय राठोड, ज्ञानेश्वर येळदरे याकामी सहकारी शिक्षकांचे योगदान मोलाचे राहिले आहे.