Monday, May 5, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

रशियाचा भारताला पाठिंबा, सुरक्षा परिषदेत बंद दाराआड चर्चा; देशभर सायरन चाचणीचे आदेश

रशियाचा भारताला पाठिंबा, सुरक्षा परिषदेत बंद दाराआड चर्चा; देशभर सायरन चाचणीचे आदेश

नवी दिल्ली : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वाढली आहे. सुरक्षा परिषदेत बंद दाराआड भारत - पाकिस्तान दरम्यानच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. चीनने पाकिस्तानची बाजू घेण्याचे संकेत दिले. यानंतर रशियाने भारताला पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

धक्कादायक म्हणजे पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणाऱ्यांपैकी किमान एक जण हा पाकिस्तानच्या सैन्यातील कमांडो पथकात कार्यरत होता. सैन्यातून बाहेर पडून ही व्यक्ती थेट लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित गटात सहभागी झाली. हल्ला झाल्यानंतर लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. अतिरेकी हल्ल्यातील पाकिस्तानचे संबंध उघड करणारे ठोस पुरावे भारताच्या हाती आले. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.

सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. भारताने सिंधू आणि चिनाब या दोन नद्यांचे पाणी भारतीय प्रकल्पांसाठी वळविण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. भारत - पाकिस्तान व्यापार बंद करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या कमी करण्यात आली आहे. भारत - पाकिस्तान दरम्यानची टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भारत हल्ला करेल आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर कायमचे हातातून जाईल, या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताच्या आक्रमणाच्या भीतीने हजारो दहशतवाद्यांना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये कोरोना काळातील लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरातील एक - दोन व्यक्तींना बाहेर पडण्याची परवानगी आहे. इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. पाकिस्तानच्या लष्कराने हॉटेल्स, पर्यटन स्थळे, मंगलकार्यालयांचा ताबा घेतला आहे. सामान्यांसाठी हॉटेल सेवा आणि मदरसे बंद आहेत. नागरिकांना अन्न, औषधे आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साठेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे महागाई वाढू लागली आहे. अनेक बँकांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील त्यांच्या शाखा अनश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दररोज काळोख पडू लागताच विजेचा पुरवठा खंडीत केला जात आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकरवरुन (ध्वनीक्षेपक) दिली जाणारी अजान बंद आहे.

भारत सरकारने दिले सायरन चाचणीचे आदेश

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना बुधवार ७ मे २०२५ रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. सायरन वाजवून चाचणी घ्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सक्रिय करुन त्याच्याशी संबंधित प्रशिक्षण नागरिकांना देणे, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी मूलभूत नागरी संरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण देणे, काळोखात अर्थात ब्लॅकआऊटमध्ये कामकाज करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षित करणे, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्यवस्था करणे, हल्ला झाल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची व्यवस्था करणे या सर्वांचे नियोजन सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment