Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

भारतीय सैन्याना मोठे यश! पूंछमधील दहशतवाद्यांचे तळ केले उद्ध्वस्त

भारतीय सैन्याना मोठे यश!  पूंछमधील दहशतवाद्यांचे तळ केले उद्ध्वस्त

जम्मू काश्मीर: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) दहशतवाद ठेचून काढण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्‍कराने (Indian Security Forces) युद्धपातळीवर कारवायांना सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लपून बसलेल्या एक एक दहशतवाद्यांना शोधून त्यांना यमसदनी पाठवण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. भारतीय सैन्याने पूंछमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला करत, त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे. जम्‍मूमधील तुरुंगांवर हल्ला करण्‍याचा हे दहशतवादी कट रचत होते, असा अंदाज गुप्तचर विभागाने व्‍यक्‍त केला आहे.


पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान पूंछमधील सुरनकोट येथे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. ज्यामधून पाच सुधारित स्फोटके (IED) आणि दोन वायरलेस सेट जप्त करण्यात आले आहेत. यावेळी अर्धा किलो ते पाच किलोग्रॅम वजनाचे आयईडी, नियंत्रित स्फोटात सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले, ज्यामुळे सीमावर्ती जिल्ह्यामधील संभाव्य हल्ले प्रभावीपणे रोखण्यात लष्कराला यश आल आहे.



अतिरेक्यांकडून आयईडी जप्त 


जप्त केलेले आयईडी अतिशय हुशारीने लपवण्यात आले होते, त्यातील दोन स्टीलच्या बादल्यांमध्ये आणि तीन टिफिन बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. घटनास्थळी सापडलेल्या अतिरिक्त वस्तूंमध्ये युरियाचे पाच पॅकेट, पाच लिटरचा गॅस सिलेंडर, एक दुर्बिण, लोकरीच्या टोप्या, ब्लँकेट आणि इतर विविध साहित्यांचा समावेश होता.


एका वेगळ्या पण संबंधित घडामोडीत, लष्कर-ए-तोयबाच्या स्लीपर सेलमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या इम्तियाज अहमदचा देखील मृत्यू झाला आहे.  पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात अहमद वैशो प्रवाहात बुडाल्याचे वृत्त आहे.


Comments
Add Comment