Thursday, July 10, 2025

राजकीय व्यंगचित्राचा प्रकार असते लोकशाहीचे प्रतीक...

राजकीय व्यंगचित्राचा प्रकार असते लोकशाहीचे प्रतीक...

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे मत


पुणे :आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणाऱ्या प्रत्येक व्यंगचित्रांची शाखा वेगळी असते. राजकीय व्यंगचित्र लोकशाहीचे प्रतीक असते, तर अभ्यासक्रमाशी संबंधित व्यंगचित्र शिक्षकाची भूमिका बजावणारे असते. या व्यंगचित्रांमुळे जीवनातील क्लिष्टता कमी होते,असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले.



विश्वास प्रकाशनातर्फे जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त व्यंगचित्रांचे ज्येष्ठ अभ्यासक, संग्राहक आणि प्रसिद्ध लेखक मधुकर धर्मापुरीकर लिखित ‘हास्य चित्रे देशातली परदेशातली’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.वसंत काळपांडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.



स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर डॉ.काळपांडे, लेखक मधुकर धर्मापुरीकर, प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे आणि विश्वास प्रकाशनाच्या संचालक वैशाली पेंडसे-कार्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मधुकर धर्मापुरीकर यांच्या खास शैलीत देशातल्या आणि परदेशातल्या हास्यचित्रांचा आस्वाद रसिकांनी घेतला.




यावेळी बोलताना व्यंगचित्रकार शि. द. फडणीस म्हणाले की, बालभारतीच्या निमित्ताने गणितासारख्या क्लिष्ट विषयात व्यंगचित्रांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्याला विरोध देखील झाला. मात्र, आमच्या आणि व्यंगचित्र कलेच्या बाजूने उभ्या राहिलेल्या सुजाण व्यक्तींमुळे ती संकल्पना प्रत्यक्षात आली. व्यंगचित्र हे केवळ हास्य निर्माण करत नाही, तर चित्र पाहणाऱ्याला ज्ञानचक्षू प्रदान करीत असते. नव्या पिढीतील मुलांपर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून व्यंगचित्रे पोहोचविण्याचा विश्वास प्रकाशनाचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. व्यंगचित्रांचा अभ्यास करण्यासाठी झपाटून जाऊन काम करणारे मधुकर धर्मापुरीकर हे चांगल्या अर्थाने एक उत्तम व्यसनी व्यक्ती आहेत. त्यांचे ‘हास्य चित्रे देशातली परदेशातली’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.



Comments
Add Comment