
कथा - प्रा. देवबा पाटील
नंदराव हे त्यांचा नातू स्वरूपला सोबत घेऊन नित्यनेमाने रोज सकाळी बाहेर फिरायला जायचे. रस्त्याने जाता-येता ते स्वरूपला बरीच माहिती सांगायचे. “इंद्रधनुष्याबद्दल तुला तर माहिती आहेच. त्या दिवशी पांढऱ्या धनुष्याची माहिती मी तुला सांगितली. तसेच हिरवळीवर दवधनुष्यसुद्धा निघते.” आनंदराव बोलले. “काय सांगता आजोबा?” डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघत स्वरूप म्हणाला, “तुम्ही तर रोज एकेक नवनवीनच माहिती सांगत आहात.”
“होय स्वरूप, माझा नातू आहेच तसा जिज्ञासू व हुशार. म्हणून मला जे जे माहीत आहे ते ते सर्व मी त्याला सांगणारच.” आजोबा सांगू लागले, “हिवाळ्याच्या दिवसात सकाळी झाडाझुडपांच्या, वनस्पतींच्या पानांवर दव पडलेले असते. अशा हिरवळीमध्ये बऱ्याचदा सूर्योदयानंतर इंद्रधनुष्य दिसते. ते पानांवरील दवामुळे निर्माण होते म्हणून त्याला दवधनुष्य असे म्हणतात. सूर्यकिरणे व आपल्या डोळ्यांची पातळी यामध्ये किमान ४२ अंशांचा कोन होऊन तो कोन जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाला छेदतो तेव्हाच दवधनुष्य निर्माण होते व आपणास दिसते. सूर्यकिरण दवबिंदूतून जातांना दवबिंदूत त्यांचे पृथक्करण म्हणजे विभाजन होते व दवबिंदूतच त्यांचे परावर्तन झाल्यास बाहेरच्या हिरवळीवर दवधनुष्य दिसते; परंतु आकाशातील इंद्रधनुष्य हे कमानीसारखे गोलाकार असते, तर हे हिरवळीतील दवधनुष्य अर्धलंबगोलाकार वा अर्धअंडगोलाकृती आकाराचे दिसते.”
दोघांनीही आता परतीची वाट धरली. एवढ्यात स्वरूपचे लक्ष तारेवर बसलेल्या पोपटांकडे गेले व तो आनंदाने म्हणाला, “आजोबा, ते पोपट बघा त्या तारांवर बसून कसे छान झोके घेत आहेत. त्यांना विजेचा शॉक नाही का लागत? ते कसे छान मिठू-मिठू बोलतात.” “पोपटाला माणसांसारखे बोलता येत नाही, पण पोपटाची जीभ मानवाच्या जीभेसारखीच असून पोपट हा माणसाच्या आवाजाचे अनुकरण करतो. तो गळा, तोंड व जिभेच्या साहाय्याने शब्दानुसार ठराविक कंपन असलेला विशिष्ट ध्वनी बाहेर काढतो. त्यालाच आपण पोपटपंची म्हणतो.” आनंदराव सांगत होते.
“स्वरूप, आता प्रथम तुला विजेचा धक्का किंवा शॉक कसा लागतो ते सांगतो. विजेच्या तारेला जेव्हा आपला स्पर्श होतो किंवा चुकून बोट बटनात जाते त्यावेळी वीज आपल्या शरीरातून प्रवाहित होऊन जमिनीत जाते व विद्युतमंडल पूर्ण झाल्याने आपल्याच शरीरातून वाहणाऱ्या विजेचा आपणांस धक्का बसतो. तेच आपण विजेसोबत काम करतांना जर पायांत रबरी चपला वापरल्या किंवा लाकडी पाटावर वा लाकडी बाकड्यावर उभे राहून काम केले, तर रबर व लाकूड हे विद्युतरोधक असल्याने विद्युतमंडल पूर्ण होत नाही व आपल्या शरीरातून वीज वाहत नाही आणि आपणांस विजेचा धक्का बसत नाही.” “विजेच्या तारा या खांबावर लावतांना विद्युतरोधक पदार्थ व वस्तू वापरून बसवलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा खांबाशी व पर्यायाने जमिनीशी काहीच संपर्क येत नाही म्हणूनच तारांमधून वाहत असलेल्या विद्यूतचा सुद्धा खांबाशी व जमिनीशी काहीच संपर्क न आल्याने आपणांस विद्यूत खांबाला हात लावला तरीही वीजधक्का बसत नाही. तसेच पक्षी हे कोणत्याही एकाच तारावर बसतात, या तारेवरून त्या तारेवर फिरतात. अशा वेळी त्यांचा दुसऱ्या तारेला स्पर्श होत नाही. त्यामुळे विद्युतमंडल पूर्ण न झाल्याने त्यांना वीजधक्का बसत नाही.” आनंदराव एकदम सोप्या भाषेत सांगत म्हणाले, “आलं ना लक्षात.”
“हो. आजोबा.” स्वरूप म्हणाला. असे रमत गमत ते दोघेही नाताजले घरी पोहोचले.