Sunday, May 4, 2025

कोलाज

तो राजहंस एक...!

तो राजहंस एक...!

महान संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ चा. ३० एप्रिलपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले, त्या निमित्ताने...

विशेष - अभय गोखले

महान संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ चा. ३० एप्रिलपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होते, त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच. एक अष्टपैलू संगीतकार अशी ओळख असलेले श्रीनिवास खळे हे मराठी संगीत क्षेत्राला लाभलेले एक वरदान होते, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. भक्तिगीत, बडबड गीत, बालगीत, भावगीत, चित्रपट, संगीत, पोवाडा, लावणी आणि नाट्यसंगीत या संगीतातील सर्वच क्षेत्रांत संचार करणारे श्रीनिवास खळे हे बहुदा मराठी संगीत क्षेत्रातील एकमेव संगीतकार असावेत.महाराष्ट्राचे राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा’’ या गीताला श्रीनिवास खळे यांनी चाल लावली आहे, ही गोष्ट आजच्या पिढीतील बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल.

वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार, राम कदम, सुधीर फडके आणि दत्ता डावजेकर या समकालीन संगीतकारांच्या स्पर्धेत श्रीनिवास खळे हे नुसते टिकलेच नाहीत, तर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीला ते आकाशवाणीवर व नंतर एचएमव्ही या रेकॉर्ड कंपनीत नोकरीला असल्यामुळे महाकवी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके यांच्यासारख्या दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्याणपूर, पं. भीमसेन जोशी, सुरेश वाडकर, अरुण दाते यांच्यासारख्या दिग्गजांनी खळे यांनी बांधलेल्या चाली गायल्या आहेत.

भावगीत, सुगम संगीत आणि बालगीत या बाबतीत तर खळे यांचा हातखंडा होता. “उतरली सांज ही धरेवरी’’ (सुमन कल्याणपूर), कशी ही लाज गडे मुलुखाची’,(मालती पांडे), जादू अशी घडे ही,’ (अरुण दाते-सुमन कल्याणपूर), कशी रे तुला भेटू’ (मालती पांडे), तू अबोल होऊनी, (सुमन कल्याणपूर), शुक्र तारा मंद वारा’ (अरुण दाते-सुधा मल्होत्रा) यांसारखी खळे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी त्यांना प्रचंड लोकप्रियता देऊन गेली. अभंगवाणी या प्रकारात खळे यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतलेले, ‘विठ्ठल गीती गावा, पंढरीचा वास, राजस सुकुमार, सावळे सुंदर रूप मनोहर, जे का रंजले गांजले, हे अभंग अजरामर झाले आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हा लता मंगेशकर यांच्या गोड गळ्यातील अभंग, खळे हे किती अप्रतिम चाल लावत असत यांची साक्ष देणारा आहे.

‘या‌ चिमण्यांनो परत फिरा रे’ हे ‘जिव्हाळा’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे हा खळे यांच्या संगीत कारकीर्दीतील सर्वोच्च बिंदू मानावा लागेल. या गाण्याची हकीकत अशी आहे की, जिव्हाळा हा चित्रपट गुरूदत्त प्रोडक्शनचा होता. या चित्रपटाचा निर्माता होता, गुरूदत्त यांचा भाऊ आत्माराम. या चिमण्यांनो... या गाण्याची चाल लता मंगेशकर यांना समोर ठेवून खळे यांनी बांधली होती. मात्र लता मंगेशकर यांना वेळ नसल्याने ते गाणे दुसऱ्या कुणाकडून तरी गाऊन घ्यावे, असे लता मंगेशकर यांनी खळे यांना सुचवले होते; परंतु हे गाणे मी लता मंगेशकर यांच्यासाठीच बांधले आहे, तेव्हा त्याच ते गातील असा आग्रह खळे यांनी धरला होता. अखेर खळे यांनी थेट लतादीदींना सांगितले की, हे गाणे तुम्हीच गावे अशी माझी फार इच्छा आहे. यावर लतादीदींनी आपली डायरी बघितली आणि सांगितले की, दीड महिना तरी आपल्याला वेळ नाही. इकडे जिव्हाळा चित्रपटाचा निर्माता आत्माराम याला चित्रपट रिलीज करण्याची घाई झाली होती. शेवटचा उपाय म्हणून खळे यांनी गाण्याची चाल ऐकण्याची गळ लतादीदींना घातली व त्यांनीही ते मान्य केले. चाल ऐकल्यानंतर त्यांना ती इतकी आवडली की त्या म्हणाल्या, मी माझ्या कार्यक्रमात कितीही व्यस्त असले तरी हे गाणे मीच गाणार आहे.

नंतर त्यांनी ते गाणे गायले आणि आपण खळे यांना नकार दिला असता, तर मोठी संधी गमावली असती, याची जाणीव त्यांना झाली. गाणे गाऊन झाल्यानंतर लतादीदी स्टुडिओतून बाहेर पडत असताना, आत्मारामच्या सहाय्यकाने खळे यांना विचारले की, मानधनाचे काय? खळे म्हणाले ते तुम्हीच बघून घ्या. मग त्याने शक्य तेवढे पैसे पाकिटात भरले व ते पाकीट तो लतादीदींना देऊ लागला, त्यावर दीदी म्हणाल्या कसले पैसे? मी तुमच्यासाठी नव्हे तर खळ्यांकरिता गायले, मी मानधन घेणार नाही. खळे यांचे हे गाणे इतके अप्रतिम होते की ते गायल्यानेच माझे मानधन मला मिळाले आहे. १९५१ साली ‘लक्ष्मीपूजन’ या चित्रपटाला खळे यांनी पहिल्यांदा संगीत दिले. या चित्रपटाचे निर्माते होते, शरद पोतनीस. पोतनीस यांनी असा आग्रह धरला की चित्रपटाला संगीत खळे हेच देतील; परंतु या चित्रपटाचे गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा त्याला विरोध होता. त्यावेळी खळे हे चित्रपट क्षेत्रात नवीन असल्याने गदिमांनी विरोध केला असावा. माडगुळकर हटूनच बसले की चित्रपटाला संगीत, सुधीर फडके हेच देतील, नाहीतर मी गाणी लिहिणार नाही. पोतनीस यांनी गदिमांना सांगून बघितले की, तुम्ही प्रथम खळे यांनी चाल लावलेली गाणी ऐका आणि नंतरच काय ते ठरवा; परंतु गदिमा आपला हेका सोडायला तयार होईनात.

पोतनीसही मग हटून बसले. ते म्हणाले गदिमांचा विरोध असेल, तर आपण शांता शेळके यांच्याकडून गाणी लिहून घेऊ. शेवटी हो ना करता करता गदिमा, खळे यांनी बांधलेल्या चाली ऐकण्यास तयार झाले. त्यातील ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती’ या गदिमांच्या गाण्यांना खळे यांनी इतक्या अप्रतिम चाली लावल्या होत्या की, त्या ऐकून गदिमा थक्कच झाले. त्यांनी आनंदाने खळे यांना मिठीच मारली. आता खळे हेच या चित्रपटाला संगीत देतील असा आग्रह त्यांनी धरला. खळे यांची तारीफ करताना सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांनी एके ठिकाणी असे म्हटले होते की, खळे यांनी जी गाणी स्वरबद्ध केली आहेत, ऐसे गीत मै जिंदगी सचमे नहीं बना सका! खळे यांचा शागीर्द बनण्यात मला धन्यता वाटेल, असे गौरवोद्गारही नौशाद यांनी त्यावेळी काढले होते.

Comments
Add Comment