मनस्विनी - पूर्णिमा शिंदे
माणसाला जगण्यासाठी काही ना काही करावेच लागते अत्यंत कष्टकरी आणि सर्वाच्या परिचयाची लोकप्रिय माणसे म्हणजेच टॅक्सीवाला…. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईसारख्या शहरात अत्यंत आवश्यक असलेले म्हणजे टॅक्सीवाले. …त्यांचा प्रत्येकाला बरा-वाईट अनुभव आलेलाच असतो. सकाळी लवकर जायचंय कुठे, स्टेशनला पोहोचायचंय, लांबवर जायचंय यासाठी आपण धावत असतो आणि याच वेळी त्यांची ड्युटी बदलीची वेळ असते, हा आपल्याला आलेला हमखास अनुभव… म्हणून आपण संध्याकाळी सहा ते आठ वाजता घरी जाण्यासाठी धावत असतो त्याचवेळी हे आपल्याला कुठेही जायला नकार देतात. मग आपल्याला ते काहीसे लबाड, धूर्त, उद्धट, रागीट वाटतात… पण असं काही नसतं. बारा-बारा तास सातत्याने ट्राफिकमध्ये हजारो लोकांच्या सोयी गैरसोयीने ते घडत जातात. त्यांची भाषा, बोलण्याची पद्धत जाणून घेतली की माणसं खूप भावनिक आहेत हे
आपल्याला जाणवते.
टॅक्सीवाल्यांशी बोलायला आपण सुरुवात केली की, ‘मालूम है चालीस साल से गाडी चला रहे है हम’! हमे मत बताओ!! हे वाक्य ठरलेले. सगळे सिग्नल घेत हळूहळू चालवणारे तर आपल्या डोक्यातच जातात. मग तेही आपल्याला ‘क्या करेगा मेमसाब कॅमेरा है ना’… अशी उत्तर देतात. सुट्ट्या पैशांची मारामारी… सुट्टे पैसे तर कधीच देत नाहीत. यांच्याकडे सुट्टे पैसेच नसतात. आपल्या झालेल्या बिलात एक रुपया कमी घेणार नाहीत. त्र्याहत्तर झाले समजा, आपण शंभर दिले. तर वीस रुपयेच परत देतात. वरचे चक्क सात रुपये देत नाहीत काहीजण. सुट्टे नाही सांगत. आपण गप्प बसायचं,
तोंडात मारल्यासारखं.
काहीजण ज्येष्ठ वयाने ड्रायव्हिंग करतात. चाचा वय झालं, रिटायरमेंट नाही का घेतली? सत्तरी ओलांडून गेलेल्या तिवारी अंकलला विचारलं, म्हणे ‘क्या करू, लडका संभालता नही है. त्यांच्याही कथा व्यथा खूप हृदय द्रावक असतात. एके दिवशी एकाने सांगितलं की, बिवी कॅन्सरसे गुजर गई. दोन मुली लग्न होऊन गेल्या. दोन मुलगे आपापल्या संसारात व्यस्त आहेत. मी एकटा जेवण करून खातो. आई नंतर दोन्ही भूमिका त्यांच्यासाठी मी पार पाडल्या. पण क्या साला जिंदगी है? अकेले आना अकेले जाना. कोई किसी का नही होता.
एक मिस्त्री नावाचे टॅक्सी ड्रायव्हर. वय वर्ष ७८. तुफान गाडी चालवतात त्यांना विचारलं, आजोबा, तुम्ही या वयात का बरं काम करताय? मुलं कुठे आहे? मुले नाहीत… मग पोटाला कोण कमावणार? पत्नी कोरोनामध्ये गेली. मी हॉटेलमध्ये खातो आणि असाच कुठेतरी राहतो. मला काही फॅमिली नाही, हे दुःख त्याच्या तोंडावर दिसत होतं. बापरे, ह्या उतरत्या वयातही किती यातना मानवी आयुष्याची शोकांतिकाच आहे ही, किती दुःख. एकदा भर उन्हात मला कार्यक्रमाची पोहोचण्याची घाई होती. भैय्या उत्तर प्रदेशातला होता. घाईघाईत टॅक्सी पकडली. सिग्नलला गाडी लागली. एक २२ वर्षाचा मुलगा आला आणि मीटरचा फोटो काढू लागला. भैय्याने मीटरवर हात धरला. तो मुलगा म्हणाला, प्रोजेक्टसाठी मला हवा आहे. इतकेच ना, मी म्हटलं भैया दो उसको एक फोटो निकाल के. त्याने सांगितलं, ऐसा नही चलेगा. हमारा सब उसमे हमारा सबकुछ पत्ता लायसन नंबर आता है. फालतू में परेशानी मे डालते है. खरंच आहे, मला त्याचा निर्णय योग्यच वाटला.
एक मराठी माणूस… पश्चिम महाराष्ट्रातील कदम नावाचे. सद्गृहस्थ, कष्टाळू. मानखुर्दला लहानसा संसार… लेकराबाळासह पदवीधर नोकरी लागली नाही. म्हणून काय करणार? तर उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालक झालेले आहे. घर, शेतीवाडी, जमीन, बंगला होता. पण भावांच्या भांडणात गेला. घरातून बेदखल केले गेले. गाव नावापुरतं सगळं काही मुंबईतच. ते विचाराने परिपक्व होते. माझा फोनवर संभाषण चालू होतं. ते त्यांनी टॅक्सीत ऐकलं आणि माझ्या संभाषणामध्ये नव्या नवरीचे वाद चालू होते. त्यांचं कौन्सिलिंग मी करत होते. माझ्या भाषेवरून त्यांनी विचारलं, तुम्ही टीचर आहात का? मी म्हटलं हो! मग तुम्ही हे काय सांगत होतात? मी म्हटलं एक संसार तुटता तुटता वाचेल. यासाठी त्या मुलीला मी काही सांगत होते. ते म्हणाले हल्लीच्या मुली ऐकतात का हो? त्यांनीच मला वर प्रश्न केला. खूप चांगलं काम करताय, मॅडम तुम्ही अशाच मोठ्या व्हा! असे बोलत माझं ठिकाण आलं, मी उतरले. चला दादा, येते म्हणून निघून गेले. पण त्यांच्या शुभेच्छा बरोबर राहिल्या. आपलं बोलणं संभाषण यावरून ते आपल्याला जज करतात.
एकदा एक टॅक्सीवाले महाशय ड्रायव्हिंग करताना बिडी फुकट होता. हिंदी भाषिक तो, मी म्हटलं बिडी आधी विजव… ऐकेचना. दोन चार शब्द सुनावले, जोरात बोलले. माझा पारा चढलेला आहे पाहून त्यानी खरच विडी विजवली. मग त्याला सांगितलं तू ही जी ऐष करतोय ना,हे व्यसन आहे. घरी बायका मुले उपाशी राहतील! तुला काय वाटलं समजतंय का? अरे हे बिडी तंबाखू आणि सिगारेट पिऊन कॅन्सर होतो. व्यसनमुक्तीवर दोन चार वाक्य सांगितली. त्याला पटलं. माझी त्याने माफी मागितली. काही समजूतदारही असतात. एकदा तर माझी महत्त्वाची बॅग विसरले बऱ्याच वेळाने मला आठवण झाली की, माझ्या हातात दोन बॅगा होत्या. त्यापैकी एक बॅग नाहीये. आता दुसरी टॅक्सी पकडली. त्याचा पाठलाग केला तरी तो भेटेल का? मी लालबाग जवळच होते. परत दुसरी टॅक्सी पकडली आणि दादर पर्यंत जाण्याचे धाडस केलं. आणि एका सिग्नलला त्याला गाठले. माझी बॅग मिळाली.आपल्या रोजच्या प्रवासामध्ये अनेक माणसे आपल्याला भेटतात. वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळी अनेकविध माणसं पण खऱ्या अर्थाने युवती, महिलांना, ज्येष्ठांसाठी सामंजस्याने आपल्या इच्छित स्थळी कोणतेही टेन्शन न देता भर दुपार असेल किंवा रात्री अपरात्री असेल मुंबईचे टॅक्सीवाले हे खरोखर प्रवाशांसाठी देवदूत आहेत. घाईच्या वेळी संकट समयी सहज उपलब्ध होतात हेही माणूस म्हणून आपणही जावे त्याच्या वंशा तेव्हा ते कळेल अशा पद्धतीने वागलं पाहिजे हेच खरं.