Thursday, October 30, 2025
Happy Diwali

यश

यश

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर

यश ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकाला आपल्या जीवनात हवीहवीशी वाटते, पण ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे मात्र नाही. ती दुर्मीळ आहे असे नाही. पण यश मिळविण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. यश मिळविण्यासाठी रूप सुंदर व देखणं असावे लागते असे नाही. उंच, बुटकी, कुरूप, सडपातळ, रंगाने काळी माणसे देखील जीवनात यशस्वी होतात. पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वत:च्या श्रीमंतीतून नव्हे, तर इतरांकडून मिळविलेल्या देणग्यांतून बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. डेमोस्थेनीस हा मुखदुर्बल होता, त्याच्या बोलण्यात अनेक दोष होते पण त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तो फर्डा वक्ता झाला! यशाची गुरुकिल्ली कोणालाही प्रयत्नाने हस्तगत करता येते.

यशस्वी होण्यासाठी जीवनात काहीना काहीतरी ध्येय असले पाहिजे. जीवनात कोणते तरी निश्चित ध्येय असले की ते प्राप्त करण्यासाठी योग्य मार्गाच्या दिशेने व्यक्तीची वाटचाल होऊ शकते. संत हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य होते पण त्यांनी ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित केले आणि जीवनात वाटचाल केली. त्यामुळे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, परमहंस, विवेकानंद हे संत-पुरुषात गणले गेले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते छत्रपती शिवाजी राजे झाले. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयाप्रमाणेच विविध स्वप्नही रंगविली पाहिजेत. मानवाने स्वप्न रंगविले की आकाशात दिसणाऱ्या चंद्रावर मी एकदा पाऊल ठेवीन! राईट बंधूंनी पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडण्याचे स्वप्न रंगविले! पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांनी शतकानंतरची भारताच्या स्वातंत्र्याची रम्य पहाट पाहण्याचे स्वप्न रंगविलं. कुंडलच्या ओसाड माळावर लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी उद्योग समूह उभारावयाचे स्वप्न रंगविले !

ध्येय निश्चित केले पाहिजे, स्वप्न रंगविली पाहिजेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी संधीची प्रतीक्षा केली पाहिजे. ती संधी हुकू देता कामा नये. प्रयत्नाचा डोंगर उभा करून यश संपादन केले पाहिजे. यासाठी जे अथक परिश्रम केले जातात ते खरे भांडवल असते! आपण करीत असलेल्या कामावर आपले प्रेम असले की नैपुण्य संपादन करण्यातले खरे सुख कळते! नेतृत्व आणि पुढाकार घेतल्यामुळे यश प्राप्तीचा मार्ग सोपा होतो. कोणतेही काम असो ते उत्कृष्ट करावे लागते. ते उत्कृष्ट केले की सर्व काही साध्य होते. नाही तर यश दूर पळण्याची शक्यता असते.

विद्यार्थी मित्रांनी परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय निश्चित केले पाहिजे. चांगल्या गुणांची जोपासना करण्याचा आपण चंग बांधला पाहिजे. एकदा ध्येय ठरवले की त्या दृष्टीने अथक परिश्रम केले पाहिजेत. त्यात येणारे अडथळे दूर केले पाहिजेत. योग्य मार्गावर वाटचाल केली पाहिजे. आपल्या प्रयत्नात सातत्य पाहिजे. एवढं केले की यश हे आपल्यापासून कधीच दूर जाणार नाही.

क्रीडा, कला, साहित्य, राजकारण, समाजकारण अशी अन्य क्षेत्र आहेत की ज्यात माणसांना यश मिळविण्याची संधी आहे. यश मिळविण्याची तीव्र इच्छा मनात असली पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिसच्या समुद्रात उडी टाकताना मागं पुढं पाहिलं नाही. तेव्हा त्यांना भारत भूमी स्वतंत्र झालेली पाहावयास मिळाली. यश मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न, धाडस, परिश्रम आपल्याला दिसत नाहीत आपल्याला शेवटी दिसते ते यश!

पंडित भीमसेन जोशी यांनी संगीताच्या क्षेत्रात केलेले परिश्रम आपल्याला दिसत नाहीत. सुनील गावस्कर यांच यश दिसतं पण त्याची एकाग्रता, इच्छा शक्ती आणि त्यांनी घेतलेले कष्ट आपण नजरेआड करतो. अशिक्षित आणि कमी शिकलेल्या व्यक्ती जीवनातील विविध क्षेत्रात अमाप यश मिळविताना दिसतात. यासाठी आपण सर्वांनी “हरलेल्या माणसांच्या गोष्टी’’ हे पुस्तक वाचावे. या कथासंग्रहाच्या लेखिका डॉ. छाया महाजन आहेत.

जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रात आपण दैदीप्यमान यश मिळवू शकतो पण त्यासाठी त्या कार्याला आपण स्वतःला वाहून घेतले पाहिजे. आपल्या ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्नांच्या बळावर इच्छाशक्तीने भारावून जाऊन यशाची ध्वज पताका सर्वोच्च शिखरावर आपण निश्चितपणे रोवू शकतो.

Comments
Add Comment