Sunday, May 4, 2025

रविवार मंथन

मराठीच्या संवर्धनासाठी सोमैयाचा पुढाकार

मराठीच्या  संवर्धनासाठी  सोमैयाचा पुढाकार

मायभाषा - डॉ. वीणा सानेकर

अभिजात मराठीची चर्चा महाराष्ट्रात सर्वदूर सुरू आहे. जी गोष्ट अभिजात असते ती विशिष्ट संस्कृतीचा मानदंड या नात्याने जपण्याची खूण असते. भाषा ही कोणत्याही म्युझियम-संग्रहालयात काचेच्या कपाटात ठेवण्याची गोष्ट नाही. भाषा ही ती बोलण्याच्या धमन्यांतून प्रवाहीपणे जिवंत राहण्याची गोष्ट आहे. ज्या-ज्या वेळी अभिजात मराठीची चर्चा होते त्या-त्या वेळी ज्ञानभाषा म्हणून तिच्या जडणघडणीचा विचार अत्यंत आवश्यक ठरतो. याकरता विविध विषयांतील- क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान मराठीत येणे अत्यंत आवश्यक आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात असे म्हटले होते की, ‘ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच भाषा ज्ञानाची भाषा होऊ शकते.’ या दृष्टीने शिक्षण क्षेत्राकडे पाहणे अतिशय आवश्यक ठरते.

प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया असून त्याच्यावर माध्यमिक शिक्षणाची आणि महाविद्यालयीन शिक्षणाची इमारत उभी राहते, तर विद्यापीठीय शिक्षण हा सर्वोच्च बिंदू म्हणजे या इमारतीचा कळस होय. महाविद्यालयांमधून विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानाचा खजिना खुला करून देणे हे विद्यापीठांचे कर्तव्य आहे. इंग्रजी आज जगाची संपर्क भाषा झालेली असली तरी भारतीय भाषांमधून ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी आपली भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे .

महाराष्ट्रात विद्यापीठ निर्मिती मंडळाची स्थापना मराठीतून विविध ग्रंथांचे अनुवाद व्हावेत म्हणून झाली होती. ते बंद झाल्यानंतर या आघाडीवर सामसूमच आहे. मराठीविषयी बांधीलकी मानून विविध ग्रंथांचे अनुवाद व्हावेत म्हणून प्रयत्न करणे हे त्या-त्या विद्यापीठाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे .गेल्या वर्षभरापासून ‘ज्ञानसेतू’ हे उल्लेखनीय अभियान सोमैया विद्याविहार विद्यापीठाने हाती घेतले आहे. महाराष्ट्रभरातील जवळपास २५ अनुवादक या अभियानाअंतर्गत जगातील विविध मूलभूत ज्ञानग्रंथांचा मराठी अनुवाद करीत आहेत. आजवर जागतिक प्रतलावरील हे ग्रंथ मराठी अनुवादाची वाट पाहत होते असेच म्हटले पाहिजे.

सोमैया विद्याविहार विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषयातील दोन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सिद्ध झाले आहे. एम.ए मराठी म्हणजे पदव्युत्तर मराठीच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राची जडणघडण, अभिजात मराठीच्या विकासाच्या दिशा, मराठीचे अध्यापन, माहिती तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे आणि मराठी अशा काळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. भाषा, साहित्य आणि उपयोजित मराठी यावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम मराठीच्या पारंपरिक अभ्यास क्रमांपेक्षा वेगळा आणि नावीन्यपूर्ण आहे, तर अमराठी भाषकांसाठी संवादी मराठीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे . महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही घोषणा सोमैया विद्यापीठाचे कुलगुरू राजशेखरन पिल्लई यांनी नुकतीच केली. सोमैया शैक्षणिक संकुलात वर्षानुवर्षे भाषा आणि साहित्यसंवर्धनाचे प्रयत्न केले जातात त्यामुळे हातात हात घालून इथे विविध भाषा सुखाने नांदतात भाषा आणि साहित्य हा कोणत्याही विद्यापीठाचा आत्मा असतो. माणसाच्या आंतरिक उन्नतीसाठी भाषा आणि साहित्याची दृष्टी विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील विद्यापीठे जग अधिक सुंदर करतील यात शंका नाही.

Comments
Add Comment