Sunday, May 4, 2025

कोलाज

सर्वेपि सुखिनः सन्तु

सर्वेपि सुखिनः सन्तु

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर

एका शाळेत घडलेली ही गोष्ट. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पटांगणात बोलावले, प्रत्येकाच्या हातात एक-एक फिरकी आणि मांजा दिला आणि म्हणाले, ‘फिरकी, मांजा तुमच्या दप्तरात ठेवा आणि पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये जा. तिथे हॉलमध्ये भिंतीवर पतंग टांगलेले आहेत. प्रत्येक पतंगावर प्रत्येक विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आणि रोल नंबर लिहिलेला आहे. आपण सर्वांनी आत जाऊन आपापले नाव असलेला पतंग घेऊन घरी जाऊन उडवायचा आहे. चला तर करा सुरुवात.’

मुख्याध्यापकांनी एवढं बोलताच सर्व विद्यार्थी हॉलच्या दिशेने धावले. हॉलमध्ये एकच गर्दी उसळली. प्रत्येकजण आपापल्या नावाचा पतंग शोधू लागला. इतरांच्या नावाचे पतंग मुलांनी दूर सारायला सुरुवात केली. त्या धांधल-गडबडीत अनेक पतंग फाटले. ज्यांना आपल्या नावाचा पतंग फाटलाय हे समजले त्यापैकी काहींनी रागाने इतरांचे पतंग फाडले. त्यामुळे तिथे मारामारी सुरू झाली. आरडाओरडा आणि कोलाहलात काही अर्वाच्य शिव्यादेखील मिसळल्या आणि परिणामी... परिणामी एकाही विद्यार्थ्याला आपल्या नावाचा पतंग धडपणे बाहेर आणणे शक्य झाले नाही. सगळ्यांचेच पतंग फाटले होते.

वेळ संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पटांगणात बोलावून बसायला सांगितले. तिथे भयाण शांतता पसरली होती. एकाही विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांच्या नजरेला नजर देणं शक्य होत नव्हते; परंतु मुख्याध्यापक समजूतदार होते. त्यांनी सौम्य शब्दात मुलांशी पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली आणि म्हणाले, ‘जे झालं ते झालं. आता हाच खेळ आपल्याला पुन्हा नव्याने खेळायचा आहे. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये तशाच प्रकारे तुमच्या प्रत्येकाच्या नावाचे पतंग भिंतीवर टांगून ठेवलेले आहेत. तुम्ही आत जाऊन पहिल्यासारखेच आपापल्या नावाचा पतंग घेऊन बाहेर यायचे आहे. पण यावेळी खेळाचा नियम थोडा बदललेला आहे. प्रत्येकाने एक-एक पतंग काढून तो ज्याच्या नावाचा आहे त्या विद्यार्थ्याला द्यायचा आहे. समजले.’

विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या मजल्यावर धावले. हॉलमध्ये शिरले. पण यावेळी त्यांच्यात एक शिस्त होती. एकेक विद्यार्थी एक एक पतंग घेऊन, सांभाळून, त्यावर ज्याचं नाव आहे त्या मुलाला शोधून त्याच्या हातात देऊ लागला. हां हां म्हणता, प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या नावाचा पतंग सापडत गेला. बाहेर पडताना सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातात स्वतःच्या नावाचे पतंग होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता.

मुख्याध्यापकांनी पटांगणात पुन्हा सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले अन् म्हणाले, ‘तुम्ही यंदा दहावीत आहात. पुढच्या वर्षी तुम्ही शाळेतून कॉलेजमध्ये जाणार, त्यानंतर एका आगळ्या-वेगळ्या जगात प्रवेश करणार आहात. ते जग तुमच्यासाठी खूपच अनोळखी असेल. तिथे तुम्हाला अनेक प्रकारची अनेक माणसं भेटतील. काही चांगली, काही वाईट. अनेक अनुभवांना तुम्ही सामोरे जाल... पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येकाला जर आनंद हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही केवळ स्वतःचा आनंद शोधू नका. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केलात, तर आपोआपच इतरांकडून तुम्हाला तुमचा आनंद सापडेल.’

आजच्या आधुनिक जगात वावरताना आपण पहातोय की, आपल्यापैकी प्रत्येकजण सुखाच्या मागे धडपडतोय. एका अदृष्य चक्रात गुरफटून भोवळ येईपर्यंत गरगरतोय. हे चक्र आहे स्पर्धेचे. या चक्रात सापडलेला प्रत्येकजण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी धडपडतोय. मी आणि माझं कुटुंबीय एवढाच संकुचित विचार करून जगतोय.परिणामी... प्रत्येकाचाच पतंग फाटतोय...

बरं, केवळ मी आणि माझं ही वृत्ती आजचीच आहे असं नाही. अगदी प्राचीन काळातही अशी वृत्ती धारण करणारी माणसं होती. अगदी रामायण महाभारताच्या काळातही होतीच की... रामायणातील कैकयी हे त्याचं धडधडीत उदाहरण आहे. केवळ माझ्याच मुलाला राज्य मिळाले पाहिजे यासाठी प्रभू श्रीरामाला वनवासात पाठवणारी कैकयी आणि संपूर्ण विश्वावर केवळ माझीच सत्ता असायला हवी, मला जे हवं ते मी कोणत्याही मार्गाने मिळवणारच असा दंभ बाळगून सीतामाईला कपटाने पळवून नेणारा रावण...

महाभारतातही पांडवांचे न्यायहक्काने मिळालेले राज्य छल-कपट करून द्यूतात जिंकून त्यांना वनवासात पाठवणारा दुर्योधन-दुःशासन, शकुनी आणि त्यांचा पाठीराखा कर्ण ही चांडाळ चौकडी... हस्तिनापूरच्या राज्यावर केवळ माझाच मुलगा दुर्योधन बसायला हवा या मोहाने ग्रासलेला जन्मांध तसंच कर्मांध धृतराष्ट्र आणि त्याला ठाम विरोध न करणारी त्याची पत्नी गांधारी... इतिहासातही अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. राघोबादादांची पत्नी आनंदीबाई ‘ध चा मा करणारी’ भर दरबारात नारायणरावाचा खून करवणारी आनंदीबाई...

मूठभर मोहरांसाठी फितुर होऊन शंभूराजांना मोगलांच्या स्वाधीन करणारा गणोजी शिर्के... स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी पृथ्वीराज चौहानच्या विरुद्ध कारस्थान करून त्याला महंमद घोरीच्या ताब्यात देणारा जयचंद राठोड... मोगलांच्या इतिहासात तर अशा अनेक व्यक्ती सापडतात. औरंगजेबाच्या बाबतीत सांगायचं तर त्याने राजगादी मिळवण्यासाठी स्वतःच्या वडिलांना, शहाजहाँला मरेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले होते. स्वतःच्या सख्ख्या भावाचा दारा शुकोहचा खून केला होता.

१८५७ च्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिटिशांना फितूर होणारा बहादूरशहा जाफर केवळ मी आणि माझं ही स्वार्थी वृत्ती आजचीच नाहीये. पण अलीकडे ती जरा अधिक प्रमाणात वाढलीय हे मात्र नक्की. त्यामागे अनेक कारणं आहेत. काही सामाजिक, काही राजकीय, काही आर्थिक... राजकारणाबद्दल तर बोलायची सोयच उरली नाहीये. केवळ स्वतःला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून निवडून देणाऱ्या जनतेशी आणि युती केलेल्या पक्षाशी बेईमानी केलेले नेते आपण पाहिले आहेत. स्वार्थासाठी आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांची संख्या तर मोजूनही संपणार नाही. स्वार्थी राजकारण्यांबद्दल न बोलणंच योग्य... पण अलीकडे आपल्यासारखा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूसही खूपच स्वार्थी आणि स्वयंकेंद्री होऊ लागलाय. टीव्हीवरच्या लांबलचक मालिका बघून आपल्या मध्यमवर्गीय समाजाच्यादेखील सुखाच्या संकल्पना झपाट्याने बदलत चालल्या आहेत. त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे असलंच पाहिजे. आणि मला जे मिळालं नाही ते इतर कुणालाही मिळता कामा नये असा विकृत दृष्टिकोन झपाट्याने फोफावतोय ही चिंतेची बाब आहे. टीव्हीवरच्या मालिकांतून जी कपट-कारस्थानं, कुरघोड्या आणि कुचाळक्या आपण पाहतोय ते सगळे दुर्गुण आपल्या स्वभावात भिनू लागले आहेत. आपण केवळ मी आणि माझं एवढाच संकुचित विचार करायला लागलो आहोत... कुठंतरी चुकतंय... यावर उपाय... यावर उपाय एकच... आपल्याकडे एक प्रार्थना आहे. सर्वेपि सुखिन सन्तु। सर्वे संन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित दुःखमाप्नुयात।। भावार्थ ः सर्वजण सुखी होवोत. सर्वजण निरामय (आरोग्यसंपन्न होवोत) सर्वांच्या डोळ्यांना शुभच दिसू देत म्हणजेच सर्वांच्या आजूबाजूला केवळ मांगल्याचं वातावरण असू देत. सर्वांचं कल्याण होवो आणि कुणीही दुःखी नसू दे. प्रत्येकानेच ही प्रार्थना काही अंगी जरी अमलात आणण्याची आवश्यकता आहे. सर्वांनीच जर स्वतःच्या वृत्तीत थोडा बदल केला आणि ‘आपल्यासोबत इतरांनाही सुखी होण्याचा तितकाच हक्क आहे.’ हे मान्य करून परस्परांशी वैरभाव न धरता थोडं मित्रत्वानं सहकार्य केलं तर... ‘जर आणि तर’चा विचार न करून काहीही होणार नाही. चला तर... इतरांनी चांगलं वागावं ही अपेक्षा न बाळगता आपण स्वतःपासूनच सुरुवात करूया... स्वतःबरोबरच आसपासचं जगही सुंदर करूया...

Comments
Add Comment