
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीने २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. तसेच अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. कोहलीने ३३ बॉलमध्ये ६२ धावांची खेळी केली. या दरम्यान, कोहलीने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. कोहलीने या मैदानावर आतापर्यंत १५२ षटकार ठोकले आहेत. एखाद्या खेळाडूकडून एकाच मैदानावर ठोकण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.
याबाबतीत त्याने आपला माजी सहकारी आणि युनिर्व्हर्स बॉस म्हटल्या जाणाऱ्या क्रिस गेललाही मागे टाकले आहे. त्याने बंगळुरूमध्ये १५१ षटकार ठोकले होते. विशेष म्हणजे गेल आणि कोहली या दोघांनीही ही कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना केली आहे.
क्रिस गेलने बंगळुरूशिवाय बांगलादेशच्या मिरपूर स्टेडियममध्येही १३८ षटकार ठोकले आहेत. इंग्लंडच्या एलेक्स हेल्सने नॉटिंगहममध्ये १३५ षटकार ठोकले आहेत. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये १२२ षटकारांसह आपला दबदबा कायम ठेवला आहे.
आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार
विराट कोहलीचा षटकारांचा हा दुसरा मोठा रेकॉर्ड आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा. कोहलीने आरसीबीसाठी खेळाताना आतापर्यंत ३०१ षटकार ठोकले आहेत. एखाद्या खेळाडूकडून एकाच टीमसाठी ठोकण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. या यादीत त्याने आपला जुना सहकारी क्रिस गेल(२६३) आणि मुंबई इंडियन्सचा दिग्गज रोहित शर्मा(२६२) यांना मागे टाकले आहे.