
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ५४व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला ३७ धावांनी हरवले. या विजयासह पंजाबचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आले आहे. या सामन्यात टॉस जिंकत लखनऊच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रभासिमरनच्या तुफानी ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर लखनऊसमोर २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या लखनऊच्या संघाला ७ विकेट गमावत १९९ धावाच करता आल्या.
प्रभासिमरनच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २३६ धावा करता आल्या. त्याने लखनऊच्या गोलंदाजांना अक्षऱश: झोडून काढले. त्याने तब्बल ७ षटकार ठोकले. श्रेयस अय्यरनेही ४५ धावांची चांगली खेळी केली. त्याने २५ बॉलमध्ये ४ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी साकारली. जोश इंग्लिशने ३० धावा केल्या.
अशी होती पंजाबची फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकांत आकाश महाराज सिंहने प्रियांश आर्यला बाद केले. प्रियांशला केवळ एक धाव करता आली. मात्र यानंतर प्रभासिमरन सिंह आणि जोश इंग्लीश यांनी तुफानी फलंदाजी केली. इंग्लिशनेही षटकारांची हॅटट्रिक केली. मात्र ५व्या षटकांत त्याला आकाशने बाद केले. मात्र दुसऱ्या बाजूला प्रभासिमरन टिकून राहिला. प्रभासिमरनने ३० बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. मात्र १३व्या षटकांत पंजाबला तिसरा झटका बसला. श्रेयस अय्यर २५ बॉलमध्ये ४५ धावा करून बाद झाला. यानंतर नेहाल वढेराने चांगली फलंदाजी केली मात्र १६व्या षटकांत प्रिंस यादवने त्याला बाद केले. नेहाल केवळ १६ धावाच करू शकला. प्रभासिमरन ९१ धावांवर बाद झाला. त्याने ही खेळी ४८ धावांत साकारली. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि ७ षटकार ठोकले.