
प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ
साधारण वीस वर्षांपूर्वीची मी गोष्ट सांगत आहे. मुंबई सह्याद्रीवर एक कार्यक्रम होता. ‘वसुंधरा दिवस’च्या निमित्ताने या कार्यक्रमात बोलण्यासाठी मला निमंत्रित केले गेले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती बोलण्यासाठी आलेले होते जसे की ‘लोकसंख्या शिक्षण खाते’, ‘अनुशक्तीमधील शास्त्रज्ञ’, ‘गणपती उत्सव महामंडळ अध्यक्ष’, ‘ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ’, ‘पोलीस खात्यातील उपनिरीक्षक’, ‘शालेय विद्यार्थी’ इत्यादी. प्रत्येकाला बोलायला दोन-अडीच मिनिटे दिली होती. महाविद्यालयाची प्रोफेसर या निमित्ताने मला विद्यार्थ्यांमध्ये मी ‘झाडे लावा, झाडे जगवा.’ या उपक्रमासाठी आमचे महाविद्यालय नेमकेपणाने काय करते, याविषयी बोलायचे होते.
मी दूरदर्शन केंद्रावर पोहोचले तेव्हा ते मला मेकअप रूममध्ये घेऊन गेले. खरंतर माझ्या विषयासाठी मी सुंदर दिसण्याची खरंच आवश्यकता नव्हती, काहीतरी सुंदर बोलण्याची गरज होती, असे मला वाटले. मी मेकअपसाठी नकार दिला. तेव्हा त्या कार्यक्रमाच्या अधिकाऱ्याने सांगितले की आपला चेहरा जेव्हा कॅमेराच्या खूप जवळ असतो तेव्हा आपला चेहरा कितीही नितळ असला तरी तो तितकासा चांगला दिसत नाही. त्यामुळे चित्रीकरणासाठी थोडासा तरी मेकअप चेहऱ्यावर असणे आवश्यक आहे. त्यांनी माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित मेकअप केला. त्यानंतर मी वॉशरूममध्ये गेले आणि माझा चेहरा पाहून घाबरले. मी अतिशय उग्र आणि भयानक दिसत होते, असे मला स्वतःला उगाचच वाटले. पण काही उपाय नव्हता. मी कार्यक्रमाला गेले. दूरदर्शनसाठी हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे थोडेसे धास्तावलेले होतेच. चकचकीत दिव्यांच्या समोर असलेल्या आकर्षक खुर्च्यांवर आम्ही सगळे अर्धगोलाकार बसलो. समोर असलेल्या कॅमेऱ्यांपैकी मी नेमक्या कोणत्या कॅमेराकडे पाहत बोलायचे, हे मला समजावून सांगितले गेले. त्यामुळे समोरच्या सहा कॅमेऱ्यांपैकी माझा कोणता हे मी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला.
काय बोलायचे हे परत परत आठवत राहिले. कारण मला तसे फारसे पाठांतर जमत नाही. कार्यक्रम सुरू झाला आणि मला सूत्रसंचालकाने प्रश्न विचारल्यावर मी व्यवस्थित उत्तर दिले आणि सुटकेचा निश्वास टाकला. तो रेकॉर्डेड कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचे प्रसारण ज्या दिवशी होते त्या दिवसाची तारीख आणि वेळ माझ्या सर्व परिचितांना इतकेच काय तर छोट्याशा खेडेगावातल्या नातेवाइकांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना कार्यक्रम आवर्जून पाहायला सांगितले. कार्यक्रमाच्या दिवशी मी अगदी वेळेच्या आधी टीव्ही चालू करून माझ्या कुटुंबीयांसोबत तो कार्यक्रम पाहण्यासाठी बसले. कार्यक्रम झाल्यावर अपेक्षित होते की खूप जण फोन करतील पण कोणाचाच फोन आला नाही. मग मीच फोन करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी दूरच्या लोकांना फोन करावा म्हणून वर्धाच्या खेडेगावातील चुलत भावाला फोन केला मग नागपूरच्या मामाला फोन केला आणखी कोणाकोणाला, तर ते सगळे म्हणाले की एवढा आम्ही आठवणीने कार्यक्रम पाहिला पण तू काही आम्हाला दिसलीसच नाही. ‘मी कार्यक्रमात आहे’, असे ज्यांना माहीत असूनही, त्यांनी मला ओळखले नाही, याचे खूप वाईट वाटले. मग असेही वाटून गेले की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं टीव्ही पाहतात, कोणीच मला ओळखले नाही, तर काय उपयोग आहे त्या कार्यक्रमात जाऊन माझा?
...तर अतिमहत्त्वाचा सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी माझ्या चेहऱ्यावर केलेल्या मेकअपमुळे मी इतकी बदलून गेले होते की, कोणी मला नावानिशी ओळखूच शकले नाही. आताही कोणत्याही चॅनलवर कार्यक्रमासाठी गेले की मी विनंती करून सांगते की मला इतका कमी मेकअप करा की लोकांनी मला ओळखले पाहिजे!
‘मेकअप’ म्हणजे चेहऱ्यावर सौंदर्यप्रसाधने वापरून आपला चेहरा अधिक आकर्षक आणि सुंदर बनवणे, ही मेकअपची व्याख्या आपण सर्व जाणतो. तो चेहरा सुंदर बनवणे ठीक आहे पण तो कमीत कमी ओळखता येईल असा ठेवणेसुद्धा कुठेतरी अपेक्षित आहे असे मला वाटते. अगदी पूर्वापार वर्तमानपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकांमधून सौंदर्य वृद्धिंगत कसे करायचे या विषयीच्या टीप असायच्या. त्या वहीत लिहून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर सौंदर्यविषयक काही कात्रणं कापून चिकटवून ठेवलेल्या वह्यासुद्धा अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. आता तर काय सोशल मीडिया मेकअप किट आणि मेकअप कसा करायचा या पद्धतीचा जोरदार मारा सुरू असतो आणि या वयातही मी अगदी वेळ देऊन त्याकडे पाहात असते. मी स्वतः मेकअप करत नसले तरीही कोणत्याही मुलीला मेकअप करून तिला सुंदर बनवताना पाहणे, खूप आनंददायी असते.
एका युट्युबमध्ये एका सौंदर्यवतीचा मेकअप उतरवताना दाखवलेले आहे. तो उतरल्यावर तिचा चेहरा पाहून मी दचकले, तर मेकअप नेमके काय करू शकतो हे लक्षातही आले. घामाने किंवा पावसाच्या पाण्याने मेकअप उतरून जाऊ नये यासाठी आजकाल वॉटरप्रूफ मेकअपसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे सिनेकलाकार शॉवरखाली किंवा पावसात भिजतानाही इतक्याच सुंदर दिसतांना दाखवता येतात. असो.
मेकअप चढवल्यावर आपण आपल्याला ओळखता येऊ नये इतका तो गडद नसावा आणि मेकअप उतरल्यावर आपण आपला आत्मविश्वास गमवावा, इतका तो हलका नसावा! एकंदरीत काय तर चेहरा सुंदर बनवणाऱ्या मेकअपपेक्षा समोरचा माणूस आपल्या स्वभावाने आकर्षित होईल, आपला आदर करेल आणि आपण जे काही बोलू, त्याला तो समजून घेईल असे कोणत्याही मेकअपशिवाय असलेले मन आपल्याला निश्चितपणे प्रगतिपथाकडे घेऊन जाईल! ओळखीच्या किंवा बिनओळखीच्या माणसांसमोर केलेले केवळ एक हलकेसे स्मितसुद्धा कोणत्याही मेकअपपेक्षा जास्त भारी असते शिवाय ‘हास्य’ हा सुंदर दागिना कायमस्वरूपी आपल्यासोबत असतोच, होय ना?
pratibha.saraph@ gmail.com