
इस्लामाबाद : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत जास्तीत जास्त अतिरेक्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करेल, असा पाकिस्तानचा अंदाज होता. पण भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापार थांबवला. पाकिस्तानच्या जहाज, विमान, रेल्वे आणि इतर वाहनांना भारतात बंदी घातली तसेच भारतीय जहाज, विमान, रेल्वे आणि इतर वाहनांना पाकिस्तानमध्ये जाऊ नका, असे सांगितले. भारत - पाकिस्तान दरम्यानची टपाल सेवा बंद केली. मोदी सरकारने जगभरातून भारताच्या कृतीला पाठिंबा मिळवला. भारतात हवाई दलाने आणि नौदलाने युद्धाभ्यास सुरू केला. या घडामोडी ज्या वेगाने घडल्या ते बघून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत हल्ला करेल आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर कायमचे हातातून जाईल, या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताच्या आक्रमणाच्या भीतीने हजारो दहशतवाद्यांना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये कोरोना काळातील लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरातील एक - दोन व्यक्तींना बाहेर पडण्याची परवानगी आहे. इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. पाकिस्तानच्या लष्कराने हॉटेल्स, पर्यटन स्थळे, मंगलकार्यालयांचा ताबा घेतला आहे. सामान्यांसाठी हॉटेल सेवा आणि मदरसे बंद आहेत. नागरिकांना अन्न, औषधे आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक बँकांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील त्यांच्या शाखा अनश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दररोज काळोख पडू लागताच विजेचा पुरवठा खंडीत केला जात आहे.
मशिदींमधून लाऊडस्पीकरवरुन (ध्वनीक्षेपक) दिली जाणारी अजान बंद आहे. पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. साठेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे महागाई वाढू लागली आहे.