
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५३व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्स अवघ्या १ धावेने हरवले. कोलकाताच्या ईडन गार्डनवर आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र त्यांना २० षटकांत ८ बाद २०५ धावाच करता आल्या. सध्याच्या आयपीएलच्या हंगामातील कोलकाता संघाचा ११ पैकी पाचवा विजय आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा १२ सामन्यांतील नववा पराभव आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आधीच संपल्या आहेत.
सामन्यातील शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. वैभव अरोराच्या त्या षटकांत शुभम दुबेने दोन षटकार आणि एक चौकार लगावत सामना रोमहर्षक केला. मात्र शेवटच्या बॉलवर विजयासाठी ३ धावा करता आल्या नाहीत. राजस्थानसाठी कर्णधार रियान परागने ९५ धावा केल्या. मात्र त्यांची खेळी कामी आली नाही.
आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकांत त्याने वैभव सूर्यवंशीची विकेट गमावली.त्यानंतर पदार्पण करणारा कुणाल राठोड खाते न खोलताच बाद झाला. यानंतर तिसऱ्या विकेटसाठी यशस्वी जायसवाल आणि कर्णधार रियान पराग यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी मोईन अली याने तोडली. यशस्वी जायसवालने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ बॉलवर ३४ धावा केल्या.
यानंतर स्पिनर वरूण चक्रवर्तीने एकाच षटकात ध्रुव जुरेल आणि वानिंदु हसरंगा यांना बोल्ड करत राजस्थानचा स्कोर ५ बाद ७१ केला. येथून रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांनी राजस्थानला सामन्यात आणले. पराग आणि हेटमायर यांच्यात सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी झाली. हेटमायर २९ धावा करत बाद झाला.