
दी लेडी बॉस - अर्चना सोंडे
कर्तृत्व हे जन्माने नव्हे, तर कर्माने घडते. हे तिच्या जीवनकहाणीने अधोरेखित होते. ज्या देवकीने तिला जन्म दिला तिने तिला अर्भकावस्थेत रुग्णालयात सोडून दिले. मात्र ज्या यशोदेने तिचा सांभाळ केला तिने तिला विश्वविख्यात क्रिकेटपटू घडवले. ही गोष्ट आहे लिसा स्थळेकर या महान महिला क्रिकेटपटूची.१३ ऑगस्ट १९७९ रोजी लिसाचा जन्म पुण्यात झाला. लिसाचे डोळे अजून उघडले नव्हते. तेव्हा तिला नियतीच्या क्रूर काळोखात ढकलण्यात आले. नवजात अर्भक असण्याच्या अवस्थेत तिला रुग्णालयात सोडून देण्यात आले. रुग्णालय व्यवस्थापनाने काही दिवस सांभाळले नंतर तिला जवळच्या श्रीवास्तव अनाथाश्रमात ठेवण्यात आले. संस्थेच्या व्यवस्थापकाने तिचे नाव लैला ठेवले. ना आईची माया ना बाबाची छाया. ना मायेची ती कूस ना ममतेची ऊब. या बाळाच्या भविष्यात सटवाईने काय लिहून ठेवलंय हे कोणालाच माहीत नव्हतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळा प्लॅन होता.
लैला तीन आठवड्यांची असताना तिच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. हरेन आणि स्यू नावाचे एक भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन जोडपे त्यावेळी भारतात आले होते. हे जोडपे एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने भारतात आले होते. त्यांच्या कुटुंबात आधीच एक मुलगी होती, जी दत्तक घेतली होती. त्यामुळे ते या वेळेस एका मुलाला दत्तक घेणार होते. पण पुण्यातील त्या श्रीवास्तव अनाथाश्रमात लैलाच्या चमकदार तपकिरी डोळ्यांनी स्यू मोहित झाली. स्यू लगेचच तिच्याकडे आकर्षित झाली. हरेन आणि स्यूने लैलाला दत्तक घेतले आणि तिचे नाव लिसा ठेवले. लैलाला लिसा नावाने नवीन नाव, नवीन कुटुंब आणि नवीन आयुष्य मिळाले जणू. लिसा आपल्या या कुटुंबासोबत प्रथम अमेरिकेत आणि नंतर केनियामध्ये राहिली. स्थळेकर कुटुंब शेवटी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झाले.
ऑस्ट्रेलिया म्हटलं की समोर येते ते क्रिकेट. भारतात जर क्रिकेट धर्म असेल, तर ऑस्ट्रेलियात तो एक पंथ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या क्रिकेटपंढरीने जगाला क्रिकेटचा खरा डॉन सर डॉन ब्रॅडमन दिला. फिरकीचा जादूगर शेन वॉर्न दिला. ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंगसारखे जगज्जेते याच मातीतले. साहजिकच लिसाला देखील तिच्या वडलांनी क्रिकेटचं बाळकडू पाजलं ते सिडनीमध्येच. सुरुवातीला, तिचे क्रिकेटवरील प्रेम फक्त एक मनोरंजन वाटत होतं. पण त्यावेळी कोणालाही माहिती नव्हतं की हा अंगणातील मनोरंजक खेळ लवकरच एका विश्वविख्यात खेळाडूला जन्म देईल.
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींमध्ये लिसा उत्तम खेळू लागली. ती नैसर्गिकरीत्या प्रतिभावान खेळाडू होती. जेव्हा लिसाने स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा तिची अष्टपैलू क्रिकेट प्रतिभा लोकांना उमजू लागलं. तिची छबी आसपासच्या भागात निर्माण झाली. क्रिकेटबद्दलची तिची आवड जोपासण्यासोबतच, हरेन आणि स्यू यांनी तिच्या शैक्षणिक कौशल्याकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घेतली.
लिसाचा व्यावसायिक अशा राष्ट्रीय स्तरावर पदार्पण झाले. लिसा १९९७ मध्ये न्यू साऊथ वेल्सकडून स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये क श्रेणीत खेळू लागली. फेब्रुवारी २००३ मध्ये तिचे कसोटी पदार्पण झाले. २००५ मध्ये तिचा टी-२० संघात समावेश झाला. संघाची आधारस्तंभ ठरत क्रिकेटच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासाठी ती धमाकेदार कामगिरी करत राहिली. अल्पावधीत तिने एक आक्रमक फलंदाज आणि ऑफस्पिन गोलंदाज म्हणून जागतिक महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून जगात तिची ओळख निर्माण झाली. तिच्या गौरवशाली कारकिर्दीत, लिसाने खेळाच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी या तिन्ही स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने आठ कसोटी सामन्यांमध्ये ४१६ धावा केल्या आणि २३ विकेट्स घेतल्या. १२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७२८ धावा आणि १४६ विकेट्स घेतल्या, तर ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७६९ धावा आणि ६० विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियन महिला संघाने २००५ आणि २०१३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक तर २०१० आणि २०१२ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकले. या चार विश्वचषक विजेत्या संघात लिसा महत्त्वाचा घटक होती. या चारही स्पर्धेत तिने महत्त्वाचे योगदान दिले आहे. दरम्यान लिसाने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व देखील केले आहे. ऑस्ट्रेलियाने २०१३ मध्ये महिला विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी लिसाने निवृत्ती घेतली.
ती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १००० धावा आणि १०० विकेट घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली. तिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. जेव्हा आयसीसीची रँकिंग प्रणाली सुरू झाली तेव्हा ती जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) लिसा स्थळेकरला त्यांच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिले आहे. लिसा ही बेलिंडा क्लार्क पुरस्काराची दोन वेळा विजेती आहे, जो वर्षातील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूला दिला जातो. या तिच्या कर्तृत्वावरून ती किती महान खेळाडू होती याची खात्री पटते.
अनाथ म्हणून सोडून दिलेलं ते बाळ जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनते हा लिसाचा क्रिकेट प्रवास थक्क करणारा आहे. आयुष्यात आपल्या जवळ काय नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्या गुणांचा वापर करून आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हा, हा संदेश लिसा स्थळेकरचा जीवनप्रवास आपल्याला देतो. आपण कुठून सुरुवात करतो यापेक्षा आपण कसे पुढे जातो हे महत्त्वाचे आहे. लिसा स्थळेकर सर्वार्थाने जागतिक महिला क्रिकेटमधील लेडी बॉस आहे.