
कोकण आयकॉन - सतीश पाटणकर
वेरी बाजार, क्रॉफर्ड मार्केट या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कुणीही रसिक चांगल्या दर्जेदार अत्तराच्या शोधात गेला की, अत्तरवाले त्यांचा रुमाल सुगंधी करून सोडतात आणि ग्राहकाची पसंतीची दाद मिळाली की सांगतात, ‘केल्करका है, असली’. परफ्युमरीच्या उद्योगात फ्रान्सपासून इजिप्तपर्यंत कोणत्याही देशांची कितीही नावे घेतली गेली, तरी केळकरांच्या अत्तराला तोड नाही, हे कोणीही मान्य करील. अत्तरवाले केळकर याच नावाने सर्व घरांमध्ये परिचित झालेले उद्योगपती भाऊसाहेब केळकर यांच्या महतीचा दरवळ हा असा कायम राहिला आहे.
भाऊसाहेबांच्या वडिलांनी भावासह १९२२ साली अत्तर निर्मितीसाठी एस. एच. केळकर कंपनीची स्थापना केली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हा उद्योग आणखी बहरेल, हे लक्षात घेऊन त्यांनी मुलुंडमध्ये ३५ एकरची जागा खरेदी केली होती. भाऊसाहेबांनी सेन्ट झेवियर्समधून भूगर्भ विज्ञानाची पदवी घेतल्यानंतर या उद्योगाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. पण केवळ वडिलोपार्जित संचितावर कारभाराचा गाडा न हाकता सुगंधी द्रव्याच्या क्षेत्रात परिश्रमपूर्वक संशोधन त्यांनी सुरू केले. परफ्युमरी आणि कॉस्मेटिक्स या क्षेत्रात फ्रान्स, इटलीसारखे देश तेव्हाही आघाडीवर होते. त्यामुळेच जगात लोकप्रिय होतील, अशी अत्तरे तयार करायची, तर कच्च्या मालावर ज्याला बेस म्हणतात ती द्रव्ये तयार करण्यावर अपूर्व असे संशोधन गरजेचे होते. भाऊसाहेबांनी त्यात लक्षणीय यश मिळविल्यामुळेच आज त्यांच्या अत्तरांची ५० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात होते आणि हा उद्योग दीडशे कोटींचा टप्पा पार करून गेला आहे. इतकेच नव्हे, तर कित्येकांना ठाऊक नसलेल्या उत्पादनांमध्येही केळकर कंपनीची अत्तरे, इसेन्स यांचा बेस उपयोगास येतो. मग ती एखादी साबणाची पावडर किंवा वडी असो, अगरबत्ती असो, परफ्युम-डिओडरन्ट असो, नाहीतर थंडगार आइसक्रीम. फॅन्टासिया, फसली गुलाब, चंदनॉल, हिना यासारख्या सभा-समारंभांचे मांगल्य वाढविणाऱ्या अत्तरांची नावे सर्वांना पाठ झाली.
परदेशी आयातीवर अवलंबून न राहता भारतात उपलब्ध असलेल्या वनस्पतींचा वापर करण्याचे संशोधन त्यांनी केले. केळकर उद्योगाची सुगंधी द्रव्ये काळाच्या महिम्यातही अशीच टिकून राहिली, कुटुंबप्रणीत उद्योगांच्या परंपरेत यशस्वी ठरलेली घराणी अगणित आहेत; परंतु सुगंध निर्मितीसोबतच सामाजिक ऋण फेडणारं वझे-केळकरांसारखे कुटुंब आणि त्यांची कथी विरळच आहे...
देश पातळीवर टाटा, बिर्ला, अंबानी असे मोठे उद्योग हे कुटुंबप्रणीत उद्योग आहेत. महाराष्ट्रातही किर्लोस्कर, बजाज, गरवारे अशी उद्योजक घराणी प्रसिद्ध आहेत. या सगळ्या कुटुंबप्रणीत उद्योगांमध्ये आजही अग्रणी आहे ते वझे-केळकर कुटुंब. एस. एच. केळकर आणि कंपनी लिमिटेड या नावाने प्रसिद्ध असलेल्या या उद्योगसमूहाची मालकी केळकर कुटुंबीयांकडे आहे. १८० कोटी रु. हून अधिक उलाढाल आणि पाचशे कोटी रु. हून अधिक मूल्य असलेला हा उद्योग कुणाच्याही सहयोगाशिवाय एका कुटुंबाने चालवला आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सदाशिव आणि दामोदर हे बंधू कोकणातल्या देवगड जवळच्या लहानशा खेड्यातून शिक्षणासाठी म्हणून बहीण सरस्वतीबाई वझे यांच्याकडे सांगलीला आले. नट म्हणून सांगली परिसरात प्रसिद्ध असलेले मेहुणे गोविंद वझे यांच्या अत्तराच्या जोडव्यवसायात दोघे भाऊ मदत करू लागले. त्या काळी बीएस्सीपर्यंत शिकलेल्या या बंधूंनी केवळ अत्तर विक्री न करता, अत्तरनिर्मितीचे तंत्रही शिकून घेतले. सरस्वती केमिकल वर्क्स या नावाने हेअर ऑइलसारख्या सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन सुरू केले. अशातच मेहुणे गणेशराव वझे यांचे अकस्मात निधन झाले. आता दोघा भावांनी मिळून व्यवसाय पुढे न्यायचा असे ठरवले. धंद्याच्या वाढीबरोबर केळकर कुटुंबाने सांगलीहून मुंबईला स्थलांतर केले. १९२२ मध्ये गिरगावात अत्तराच्या किरकोळ विक्रीचे दुकान त्यांनी सुरू केले आणि त्याच वर्षी एस. एच. केळकर आणि कंपनीची स्थापना झाली. त्या काळात दसरा, दिवाळीच्या मोसमात दुकानाबाहेर रांग लावून लोक अत्तराची खरेदी करत. याशिवाय, सदाशिवराव तथा दादासाहेब हिंदी चित्रपटांना अर्थसहाय्यही करत. व्ही. शांतारामांचा राजकमल स्टुडिओ आणि त्यांच्या पहिल्या तीन चित्रपटांना सदाशिवरावांनी अर्थसहाय्य केले होते.
पुढे १९३३ मध्ये सरस्वतीबाई गंभीर आजारी पडल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या धाकट्या भावाला म्हणजे दामोदर केळकर यांना दत्तक घेतले आणि त्यांचे विनायक गणेश वझे असे नामकरण केले. सदाशिव केळकर आणि विनायक वझे हे दोघे सख्खे भाऊ आणि केळकर-वझे हे खरे तर एकच कुटुंब. त्याकाळी दादरला वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबाला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बिकट परिस्थितीमुळे एक वर्षभर सांगलीला जाऊन राहावे लागले. मुंबई इलाख्यात सरकारच्या कर आकारणीचे प्रमाण जाचक होते (नफ्याच्या ९० टक्के भाग सुपर प्रॉफिट कर म्हणून द्यावा लागे.) त्याला कंटाळून थोरले बंधू सदाशिवरावांनी स्वतःच्या मालकीचा धंदा विकून म्हैसूर प्रांतात स्थलांतर केले. अत्तरासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उत्पादनाचे एक छोटे युनिट त्यांनी बंगळूरुला सुरू केले. काही काळानंतर ते परत महाराष्ट्रात आले आणि पुण्याला स्थायिक झाले. पुण्यातील प्रभात स्टुडिओची जागा त्यांनी विकत घेतली; परंतु शासनाने फिल्म इन्स्टिट्यूटसाठी ही जागा मागितली, तेव्हा सदाशिवरावांनी मोठ्या मनाने आणि कवडीमोल दराने ही जागा सरकारला देऊनही टाकली. कारण त्यांच्या मते, या जागेवर काही तरी महत्त्वाचे कार्य उभे राहणार होते.
केळकर कुटुंबाचा हा रंजक इतिहास आपल्याला वाचायला मिळतो, ‘सुगंधोपासना’ या छोटेखानी पुस्तकात. अत्तरवाले अण्णासाहेब तथा विनायक गणेश वझे यांचा मोठा मुलगा गोविंदराव तथा भाऊसाहेब केळकर यांनी हे पुस्तक लिहिले अाहे. ग्रंथाली प्रकाशनाने ते २००२ मध्ये प्रकाशित केले आहे. लेखकाच्या शब्दांत सांगायचे, तर आसमंतात दरवळणाऱ्या एका यशस्वी उद्योगाची ही चरित्रकथा आहे. म्हटले तर ही उद्योगकथा आहे आणि म्हटले तर कुटुंबकथाही आहे. विनायक वझे यांचे दत्तकविधान होण्याच्या एक वर्षे आधी, १९३२ मध्ये गोविंद केळकरांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचे आडनाव केळकरच राहिले. पण दत्तकविधानानंतर काही वर्षांनी जन्मलेल्या त्यांच्या सख्ख्या भावांची रमेश आणि सुरेश यांची आडनावे वझे झाली.
१९२२ मध्ये सुरू झालेला हा उद्योग १९५२ पासून गोविंदरावांनी सांभाळला आणि वाढवला. कारण ते स्वतः बुद्धिमान अत्तारी होते. अनेक सुगंधी द्रव्यांच्या संमिश्रणातून आपल्या गंध संवेदना चेतवणाऱ्या वेगळ्याच सुगंधाची निर्मिती करण्याची दुर्मीळ कला त्यांनी अवगत केली. वेगवेगळी अत्तरे कशी केली जातात याचे फारच मनोवेधक वर्णन त्यांनी केले आहे. गाणे समजण्यासाठी जसा कान तयार व्हावा लागतो तसा गंध समजण्यासाठी नाक तयार व्हावे लागते. आकर्षक आणि अभिनव सुगंध तयार करण्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या लागते. अनुभवी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते आणि त्याचबरोबर तरल संवेदनशीलता आणि चिकाटी हे दोन्ही गुण असावेच लागतात. आपल्या या आत्मनिवेदनात भाऊ साहेबांनी कुटुंबप्रणीत उद्योग कसे चालतात आणि यशस्वी होण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काय पथ्ये पाळावी लागतात, यावरही मार्मिक विवेचन केले आहे. उद्योग विस्ताराच्या प्रवासात त्यांना आलेले अनुभव वाचताना वाचकालाही व्यवसाय व्यवस्थापनाविषयी अनेक गोष्टी समजतात. उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे, हेच या व्यवसायात सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते. त्याविषयीचे केळकरांचे अनुभवाचे बोल वाचणे रंजकही आहे आणि उद्बोधकही !
शैक्षणिक दर्जाच्या बळावर मानाचे स्थान मिळविलेल्या वझे-केळकर कॉलेजामध्ये दोन वर्षांपूर्वीपासूनच परफ्युमरी आणि कॉस्मेटिक्सचा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुसज्ज प्रयोगशाळेसह सुरू झाला आहे. त्यातून भाऊसाहेबांनी रोवलेली महाराष्ट्राची सुगंधी पताका अनेक विद्यार्थी जगभर फडकवत राहतील. केळकर यांनी सामाजिक उत्तरदायित्वालाही महत्त्व देत सिंधुदुर्गातील देवगड येथे कॉलेज स्थापन केले. ( लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत. )