Sunday, May 4, 2025

कोलाज

अपेक्षा...

अपेक्षा...

हलकं-फुलकं - राजश्री वटे

अपेक्षा कशाकशाची...? हे न संपणारं ओझं आहे!! मनुष्य जीवन जगत राहतो आणि नको त्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर पेलत असतो. पण खरंच, हे ओझं घेण्याची गरज असते का... नाही ना? विचार केला की ओझं वाटणाऱ्या अपेक्षाच जर ठेवल्या नाहीत, तर जगणं किती सुखाचं होईल. पण तसं होत नाही ना...

एक तर दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहायचं... नाहीतर दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आयुष्य खर्ची घालायचं... सगळंच कसं साध्य होईल मग त्याचं ओझं बाळगत बसायचं. खूप गोष्टी अपेक्षा असतानाही, पात्रता असूनही वाट्याला येत नाहीत, त्याचं कौतुक होत नाही किंवा त्याप्रमाणे सन्मान मिळत नाही... म्हणून खचून जायचं नाही... सोडून द्यायचं... याचा अर्थ असा नाही की पात्रता नव्हती म्हणून किंवा कमतरता होती म्हणून... किंवा समोरची व्यक्ती जास्त श्रेष्ठ होती म्हणून विचार करत बसायचं, त्रास करून घ्यायचा व अपेक्षाभंगाचं दुःख कुरवाळत बसायचं नाही... हे तिथेच सोडून द्यायचं व पुढे जायचं !

ही ज्याला त्याला मिळालेली संधी असते... यावरून कोणी कमी किंवा कोणी मोठं असं ठरत नसतं... अशावेळी पुढच्या संधीची वाट पाहावी व दुसऱ्याचं कौतुक करण्याचा मोठेपणा नक्कीच अंगीकारावा! पुढे गेलेल्याचा द्वेष न करता हे त्याच्या नशिबात होतं त्याला मिळालं... हे त्याचं प्रारब्ध होतं, त्याला मिळालं हे स्वीकारता आलं पाहिजे व प्रयत्न करत करत पुढे जाता आलं पाहिजे! कोणाची रेषा लहान न करता स्वतःची रेष मोठी कशी करता येईल असा विचार केला, तरच अपेक्षांचं ओझं न वाटता यश तुमचा पाठलाग नक्कीच करेल व तिथपर्यंत पोहोचण्याची स्वतःचीच स्वतःबद्दल असलेली अपेक्षा पूर्ण करता येईल. कोणाकडूनही खूप अपेक्षा केल्या तर स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेणं हा मनुष्य स्वभाव! त्यापेक्षा कोणाकडूनही अपेक्षा करू नये... आणि कोणाच्याही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करू नये... नाहीतर पदरी निराशाच येणार !

या अपेक्षांमध्ये कधी कधी द्वेष उत्पन्न होतो व द्वेष करणारा नेहमीच खुजा ठरतो व निरपेक्ष भावनेनं कौतुक करणारी, प्रोत्साहन देणारी सदैव उंची गाठते!!निरपेक्ष जीवन जगणं हा सुखाचा मुलमंत्र नक्कीच आहे... आयुष्यात अपेक्षांचा हिशोब मांडूच नये कधी!! ना रहेगी अपेक्षा... ना मिलेगा दुःख... आनंदी राहा... आनंदी जगा!!

Comments
Add Comment