Sunday, May 4, 2025

रविवार मंथन

दरवाजा

दरवाजा

माेरपीस - पूजा काळे

काव्य संमेलनाला जमलेली गर्दी पाहून मन सुखावले होते. आंतरराष्ट्रीय कविता दिनाचा तो दिवस माझ्यासाठी खासचं होता. आपल येणं सार्थकी लागावं, त्यातून ऊर्जा मिळवत, काहीतरी नवीन घडावं, असा काहीसा तो दिवस होता. गमतीचा भाग म्हणजे दर्दी माणसांच्या गर्दीतले बहुतांश चेहरे ओळखीचे असल्याने एकापेक्षा एक दर्जेदार कविता ऐकायला मिळणार हे नक्की होतं. संमेलन सुरू झालं, पुढील कविता सादर करणाऱ्या कवीच्या नावासोबत त्याच्या रचनेचं नाव सांगण्यात आलं. दरम्यान कवीचा साधेपणा त्याच्या कवितेतून झिरपू लागलेला. आता तर दरवाजा विषयीचे गूढ मनात पिंगा घालू लागलेले. हाचं विषय घेऊन, इतर दरवाजांच्या शोधात मी निघाले असता, प्रथम आले अद्वैतापाशी. म्हणजे देवळाच्या प्रमुख द्वारापाशी, जिथं एका पातळीवर भक्त ईश्वराशी गाठ पडते. आंतरिक भावनेने देवत्वाकडे जाताना, गाभाऱ्यातला देव आणि आपल्यात असतो ओथंबून वाहणारा एक भक्तीरस दरवाजा. देवळाचे दरवाजे एका ठराविक वेळी बंद झाले तरी, एक आश्वस्थ, चिरंजीवी हात आपल्या पाठीशी कायम असतो.

पुढे आलेले गड किल्ले. जे माझ्या मराठी मुलुखाचे श्रद्धास्थान आहेत. याच्या भक्कम तटबंदी, बुरूजापुढे मी नतमस्तक होते. किल्ल्यावरील एक एक दरवाजा इतिहासाची साक्ष देतो. गड किल्ल्यांच्या दरवाज्याची भाषा म्हंटली तर रांगडेपणाची. ज्यामध्ये अजातशत्रू, संकटाचं वारं पळवून लावण्याचं सामर्थ्य आहे. लाखोंचे बळ या दरवाजापाशी असल्याने यापुढे तलवारी म्यान टाकतात. शत्रू माघार घेतो. त्याला परतवून लावण्याची जबर शक्ती या दरवाजात आहे. अशा या कणखर, बुलंद महाराष्ट्राची प्रतिमा चाळवजा संस्कृतीत घराघरांत जोपासली जाते. दहा बाय दहा चाळसंस्कृतीच्या दरवाज्यात डोकावताचं लोखंडी कडीकुलपं मला खुणावू लागतात. ही खूण खुपशी ओळखीची तसचं आपलीशी असणारी. दिवसा उजेडी कदापी बंद नसलेले, आगंतुकाला आपलसं करणारे, चाळीचे सताड आणि उघडे दरवाजे माणसाच्या चांगुलपणाची साक्ष देतात. माणुसकी सांभाळणारे, अभावानेचं दिसणारे हे दरवाजे आता पाहावयासं दुर्मीळचं. कारण साहित्य संस्कृतीची शोभा वाढवणारे, चाळीतील दरवाजे गगनचुंबी पहाऱ्यात बंदिस्त झालेले पाहिले की, आपणचं आपल्याला घातलेल्या मर्यादेच्या जाणिवा चिरून टाकतात. इमारतीचे बंद दरवाजे कोतेपणाची भावना तीव्र करतात. आम्ही नसे कोणाचे आम्ही आमचे राजे म्हणत, संपुष्टात येत असलेली अमानवी मुळं इथं उगवतात. त्या उलट भावकीची वाट पाहणारे गाव-खेड्यातील कमनीय, नक्षीदार दरवाजे सागवानी लाकडाच्या गुणधर्मासारखे मजबूत, तटस्थ आणि वाटेकडे डोळे लावून बसलेले दिसतात.

जिथं वस्ती तिथं दरवाजा. म्हणजे बघा, सतत कामाच्या ओझ्यानं दबलेला. एक ते पाच वेळेतला कामकाजाच्या ठिकाणी ऊघडणारा दरवाजा कमी अधिक प्रमाणात उन्नतीच्या मार्गाने येणाऱ्या रस्त्यांना जाऊन मिळतो. इथं तुमची ओळख पंचिंग मशिन ठरवते. शासकीय यंत्रणाही यातून सुटत नाही. यांच वैशिष्ट्य म्हणजे बिनओळखीच्या माणसांचे स्वागत करण्यास हे दरवाजे पुढे असतात. टेबलाखालून, टेबलावरून दिल्या-घेतल्याशिवाय, एखादं आत्मदहन, एखादी विपरीत घटना, मोर्चे, संप, आंदोलन घडल्याशिवाय ते सहसा उघडत नाहीत, यांना जाग येत नाही, एवढा गंज यांच्या कडीला लागलेला असतो. असं म्हणतात की, पोलिस स्टेशन आणि कोर्ट यांचे दरवाजे ठोठावू नयेत. किंवा तिथपर्यंत जाऊ नये, पण चित्र त्या विरुद्ध भासत. आजकाल कोर्टाची पायरी सामान्य माणसांच्या नव्हे तर, उच्चभ्रूंच्या चप्पलबुटांच्या चिखलाने माखलेली दिसते. न्याय मिळेलचं याचीही शाश्वती नाही. हीचं गोष्ट इथल्या इस्पितळांची. दरवाजातून लक्ष्मी आत येते, पण परतावा म्हणून दरिद्री नारायणाला यमदूताचे रौद्र रूप दाखवते. ऑक्सिजन विरहित आरोग्याचे तीन तेरा वाजवणारे इस्पितळातले मृतवत दरवाजे फारसे आनंददायी नसतात, हे आपण जाणतो. दरवाजा आवर्तनातल्या छोट्या, मोठ्या तारक, मारक परिणामकारक पायऱ्यांचा अनुभव बऱ्याचं जणांच्या गाठीशी आहे. तो पार करण्यातली भिस्त, घबराट, आनंद, दुख, नैराश्य प्रत्येकाजवळ आहे. प्रत्येक दरवाज्याच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी, दारोदारची शिकवण वेगळी असते. विटा, रेती, माती, दगड, पाषाण, लोखंड, लाकूड यापासून बनलेली दारं वेगळी असली तरी चार भिंतीतल्या चार माणसांमध्ये समन्वय राखण्याचं काम ती करतात. तेव्हाची स्थिती ही अशी असते.. चार भिंतीं अन् खुले दरवाजे, स्वप्न पाहिले मी घेत ऊसासे.. मजली मजली चढवित जाता, घर संगमरवरी ताजचं भासे.|

मी पुढे होत असताना, ओळखीच्या वळणावर ज्ञानसंवर्धनासाठी असलेला एक दरवाजा शाळेचा रस्ता दाखवतो, जो पिढ्या घडवतो. उत्तुंग, भव्य विचारांची पेरणी करतो. कॉलेज लायब्ररीत ज्ञानाचे दीप प्रज्वलित करतो. कधीकधी तर व्यसनमुक्तीचे दरवाजे जीव तोडून मुक्त होण्यासाठीची धडपड करतात. त्यांच ऐकायला हवं. पण ऐकत कोण.? लालवस्तीत पडद्यामागच्या दरवाज्यात निष्पाप जीव कलंकित वलयात धूसर होत जातात. तिथल्या दरवाज्याआड आकांतातला आतला आवाज सहसा कुणाला ऐकू येत नाही. उंबरठा या माझ्या कवितेतून मला हेच सुचवायचंय... क्षतिग्रस्त चौकटीचा उंबरठा ओलांडून, सिद्ध करावे स्वत:ला ओळखून पारखून...| वेशीवर उभा असतोच दूषणाचा बाप, तिच्या हरकतीवर सगे काढतात माप... | उरी जपण्या लाजेस घेते दमानं उश्वास, चारित्र्याच्या कुपीमध्ये बंद कोंडलेला असतो तीचा श्वास.. | उंबरठा झिजेपरी असे भिंतीला आधार, चौकटीला वाळवीची नशा लागे अंती फार... | जात असते बाईची शांत संयमी कठोर, उंबराचं असतो दिमतीला सोसण्यास भार...| अशावेळी आपलं धोरण कस असावं तर असं असाव, अन्यत्र एकही दरवाजा आपल्यासाठी नसेल.‘ रोज होते माणसांची ये-जा ये-जा, दरवाजा पाहतोय मजा मजा | दरवाज्या आत अतिरिक्त चळवळी, बाहेर वाढते विचारांची रणधुमाळी | मेंदूवर चढतोय गाळचं गाळ, ए...माणसा तू तुझं दप्तर सांभाळ|"

विविधांगी रंगीन कमानीचे दरवाजे नाना दिशा दाखवतात. यातला एक दरवाजा जातो स्वप्नांकडे आणि उघडतो ध्येयपूर्तीजवळ जो मानव केंद्रित असतो. मनाने घेतलेली पकड आव्हान झेलण्यास मजल मारू लागली की, समजावं प्रकाशाचे दरवाजे उघडत आहेत. दुखाच्या परडीत सुखाची तिळमात्र सुगंधीत फुले नाचू लागली की, ओळखावं आतला आवाज दरवाजाच्या वाटेवर सक्षम विटा रचू लागलाय. आतबाहेर ऊघडणारी दारं, शिड उभारलेल्या गलबतासारखी साथ देणारी दारं घराला घरपण देतात. सातच्या आत घराला शिस्त आणतात. या दारातून मार्गक्रमण म्हणजे एक पाऊल प्रगतीकडे. यशोउन्नतीसाठीचा प्रवास सगळ्यांच्या आयुष्यात असतो. नकळत पावल घराकडे वळतात. आता गोकुळात माझीचं उणीव असते. मी दरवाजा ठोकावतो. सुहास्यवदनाने आई, बायको, मुली, मुलं दरवाजा उघडतात. आनंदाचं शिंपण करत, खळाळतं हसत असतं घर. मनस्वास्थ्यासाठी, असिम शांततेच्या शोधात चौकटी आत प्रवेश करतो मी. लगोलग खुला दरवाजा विश्वासाने बंद होतो, दुसरा दिवस पाहण्यासाठी, उघडण्यासाठी.

Comments
Add Comment