चिऊताई करी घाई!

कथा - रमेश तांबे


एक होती चिऊताई
तिला असायची नेहमीच घाई
उडताना घाई, खाताना घाई
काम करतानासुद्धा घाई!
तिच्या मैत्रिणी तिला सांगायच्या,
“अगं चिऊताई दमाने घे जरा
काही करताना विचार जरा करा”
पण ऐकेल ती चिऊताई कसली
त्यामुळे एकदा ती चांगलीच फसली!

त्याचे काय झाले,
एका शिकाऱ्याने आंब्याच्या झाडावर
लावले होते जाळे
दिसायला होते ते कितीतरी काळे
चिऊताईला मैत्रिणी म्हणाल्या,
“जाऊ नको तिकडे अडकून पडशील
मग वाचवा वाचवा म्हणत रडत बसशील”
पण तिने ऐकलेच नाही
म्हणाली तुम्ही सारे वेडाबाई
कसले जाळे आणि कसले फाळे
मनात तुमच्या विचारच काळे!

मग चिऊताई गेली उडून भुर्रकन
आंब्याच्या झाडावर बसली पटकन
बाजूलाच होता पिवळाधमक आंबा
कोण तिला सांगणार जरा थोडं थांबा!
मारल्या चोची पटापटा चार
आंब्याच्या रसाची लागली धार
गोडगोड रस चिऊताई प्यायली
पोटभर खाऊन झोप तिला लागली
मग काय ती झोपेतच खेळली
इकडे तिकडे लोळली
थोड्या वेळाने तिला जाग आली
अन् विचार करत स्वतःशीच म्हणाली,
“एक आंबा घेऊन जाऊ
साऱ्या मैत्रिणींना तो दाखवू”

मग एक आंबा तिने तोडला
चोचीमध्ये घट्ट धरला
पंख हलवले, वर केली मान
पण तिला उडताच येईना
चिमणीला काही कळेना
असे काय झाले?
ताकद माझी का कमी पडते
तिने नीट बघितले
तर ती होती एका जाळ्यात!
काळे काळे जाळे पाहून
ती घाबरली विचार करून
अंग तिचे थरथरले
डोळे तिचे भिरभिरले
तिने केला चिवचिवाट
चोच आपटली खाटखाट
पण उपयोग काही होईना
शांत तिला बसवेना
आता मात्र चिऊताई घाबरली
हाका साऱ्यांना मारू लागली,
“कुणीतरी वाचवा मला
या जाळ्यातून सोडवा मला”
चिऊताईचा आवाज मैत्रिणींनी ऐकला
साऱ्याजणी चिऊताईकडे धावल्या
बघतात तर काय चिऊताई अडकल्या
साऱ्याजणी हसल्या अन् म्हणाल्या,
“काय चिऊताई कसा वाटला आंबा?
गोड आहे ना फार!
मग आंबेच खा झाडावर बसून
बसूून राहा अंगावर जाळं ओढून

तशी चिऊताई म्हणाली,
“अगं माझ्या मैत्रिणींनो
मदत मला करा ना...
मी जाळ्यात अडकडले आहे.
माझे पंख दुखून गेले आहेत.
चोचीने जाळेसुद्धा तुटत नाही.
तुम्ही काहीतरी करा ना...
मला पटकन सोडवा ना...
यापुढे मी तुमचे ऐकेल,
घाई करणार नाही.
विचार करून काम करीन,
सगळ्यांसोबत राहीन.
चिऊताईला आता पश्चाताप झाला
आपण ऐकायला हवे होते
चिऊताईंने सगळ्यांची माफी मागितली.
मग सगळ्या मैत्रिणींनी मिळून
एकसाथ जाळे उचलले
आणि चिऊताई मोकळी झाली
मग तिने आकाशात भरारी घेतली
सगळ्यांबरोबर लागली उडू,
आकाशाच्या पायऱ्या लागली चढू.
स्वातंत्र्य म्हणजे काय असतं!
मोकळेपणा म्हणजे काय असतो!
आज चिऊताईने तो अनुभवला
इतरांचा सल्ला आपण ऐकला पाहिजे.
कोणतेही काम करताना
धोक्याचा विचार आधी केला पाहिजे.
हा नवा विचार चिऊताईला
अनुभवाने शिकायला मिळाला!
चिऊताई म्हणाली,
ऐका माझे ऐका
करू नका घाई
आधी विचार मग काम
हाच आहे मंत्र भारी!
Comments
Add Comment

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता

खेड्याकडे चला

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आईच्या पेन्शन बँकेत तिचे ‘केवायसी’ करायचे म्हणून मी इंडियन बँकेत गेले होते.

कालाय तस्मै नम:

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर भारतीय तत्त्वज्ञानात ‘काल’ या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

पाऊस

कथा : रमेश तांबे एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला