Sunday, May 4, 2025

कोलाज

भगीरथाने केला पितरांचा उद्धार

भगीरथाने केला पितरांचा उद्धार

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे

ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्मदेव हे विष्णूच्या नाभीतून उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाच्या अनेक मानस पुत्रांपैकी दक्ष प्रजापती एक होते. दक्षाच्या अनेक कन्यांपैकी १७ कन्या ऋषी कश्यपांना दिल्या. त्यापैकी एक कन्या अदितीपासून विवस्वानासह बारा पूत्र झाले. विवस्वानापासून मनूचा जन्म झाला. एकदा मनूला शिंक आली. त्यामुळे एक पुत्र उत्पन्न झाला, तो ईश्वांकू. ईश्वांकूच्या कुळातच पुढे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला.

ईश्वांकूच्या कुळात बाहूक नावाचा राजा झाला. बाहुकाचा त्याच्या शत्रूंनी पराभव केल्यामुळे तो पत्नीसह अरण्यात गेला. त्या वेळेला त्याची पत्नी करुणावती गर्भवती होती. वनात राजा मरण पावला. तेव्हा करुणामाईने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु त्रिकालज्ञानी महर्षी और्व मूनींना करुणावती गर्भवती असल्याचे अंतर्ज्ञानाने कळले. त्यामुळे त्यांनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. करुणावती गर्भवती आहे, हे पाहून तिच्या ११ सवतींना मत्सर निर्माण झाला. त्यांनी करुणावतीला जेवणातून विष दिले; परंतु महर्षी और्व यांना हे अंतर्ज्ञानाने कळल्यावर त्यांनी आपल्या तपोबलाने त्याचे रक्षण केले. तो पुत्र म्हणजे सागर. सागर मोठा झाल्यानंतर त्याने सैन्याची जमवा जमव करून आपले राज्य परत मिळवले. सागरला दोन राण्या होत्या. सुमती व दुसरी केशीनी. केशनीला असंमज नामक एक पुत्र, तर सुमितीला साठ हजार पुत्र होते. केशनीचा पुत्र असमंजस. तो दुराचारी होता. त्याला अंशुमान नावाचा पुत्र होता.

एकदा सागरने अश्वमेघ यज्ञ केला. त्या यज्ञाचा घोडा इंद्राने पळवून कपिल मुनींच्या आश्रमात सोडला. घोड्याच्या शोधात गेलेल्या सागरच्या साठ हजार पुत्रांना हा घोडा कपिल मुनींच्या आश्रमात दिसल्यामुळे कपिल ऋषींनी त्या घोड्याला पकडून आणले असावे या विचाराने ते सर्वजण कपिल मुनींवर धावून गेले. कपिल मुनींनी त्या सर्वांना भस्म केले. बऱ्याच वेळेपर्यंत पुत्र आले नाही हे पाहून सागर राजाने अंशुमानला आपल्या चुलत्यांना शोधायला पाठविले. शोधता शोधता तो कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचला. आश्रमात उभा असलेला घोडा पाहून त्याने मुनींना आदरपूर्वक नमन करून त्यांची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन कपिल मुनींने त्याला घोडा घेऊन जाण्यास सांगितले. त्याच ठिकाणी असलेले राखेचे ढीग पाहून अंशुमाने त्यांना विचारले, असता ही तुझ्या चुलत्यांची राख असल्याचे कपिल मुनींनी त्याला सांगितले. या मरण पावलेल्या तुझ्या चुलत्यांचा उद्धार तुझा नातू करेल, असा अंशुमानाला आशीर्वाद दिला. अंशुमान घोडा घेऊन निघून गेला व सागराने यज्ञ पूर्ण केला.

कपिल ऋषींच्या सांगण्यावरून आपल्या पितरांना मुक्ती देण्यासाठी अंशुमान त्याचा मुलगा दिलीप यांनी बरेच श्रम व तप केले मात्र त्यांना यश मिळाले नाही. दिलीपचा पुत्र भगीरथाने यासाठीच अनेक वर्ष गंगेची प्रार्थना केली. गंगा ब्रह्म लोकात होती. तसेच तिच्या स्वतःच्या इच्छेशिवाय तिला स्वर्गातून ब्रह्मदेव काढू शकत नव्हते. भगीरथाने गंगेला पृथ्वीवर येण्याची विनंती केली, भगीरथाचा उदात्त हेतू पाहून गंगेने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. मात्र ब्रह्मलोकांतून पृथ्वीवर येताना तिचा वेग प्रचंड असल्यामुळे त्या वेगाला काबूत ठेवू शकेल, असा आधार शोधणे आवश्यक आहे. अन्यथा हा वेग पृथ्वीला फाडून मी(गंगा) रसातळाला जाईन. तसेच मी(गंगा) पृथ्वीवर आल्यास लोक आपली पापे त्यात धुतील मग मी ती पापे कोठे धुणार? अशी भगीरथाला विचारणा केली.

तेव्हा भगीरथाने सांगितले सदगुरू, संन्याशी व ब्रह्मनिष्ठ अशा लोकांमध्ये स्वतः भगवानच वास करीत असतात, ते तुझ्यात स्नान करतील. त्यांच्या अंग स्पर्शाने तुझी पापे नष्ट होतील. अशा प्रकारे भगीरथाने समर्थन करता, गंगेने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. तेव्हा भगीरथाने पुन्हा ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांच्याकडून गंगेला पृथ्वीवर नेण्यासाठी परवानगी मिळवली. तसेच गंगेच्या आधारासाठी महादेवाकडेच विनंती करावी, अशी ब्रह्मदेवांनीच भगीरथाला सूचना केली. त्याप्रमाणे भगीरथाने महादेवाची आराधना केली व महादेवांना गंगेला धारण करण्याची विनंती केली. महादेवाने भगीरथाची विनंती मान्य केली. भगीरथाने गंगेला विनंती करताच गंगा स्वर्गातून पृथ्वीवर येण्यासाठी प्रचंड वेगाने निघाली. महादेवाने गंगेला आपल्या जटेत बद्ध करून तिच्या वेगावर नियंत्रण केले व आपली एक जटा मोकळी करून तिला त्यातून मुक्त केले. तसेच भगीरथाला पुढील प्रवासासाठी एक रथ दिला. गंगेने भगीरथाला आता तू पुढे चल तुझ्या मागे मी येते, असे म्हणून भगीरथाच्या मागे जाऊ लागली. मार्गात एका ठिकाणी महर्षी जनहू आश्रम होता. गंगेच्या प्रवाहाने आश्रमातील यज्ञाचे अनुष्ठान वाहून गेले. ते पाहून ऋषी जनहूंनी गंगेला पिऊन टाकले. तेव्हा भगीरथाने सर्व वृत्तांत कथन करून महर्षी जनहू गंगेला मुक्त करण्याची विनंती केली. भगीरथाचा उदात्त हेतू पाहून महर्षी जनहू यांनी गंगेला आपल्या कानातून मुक्त केले. त्यामुळे गंगेला जान्हवी सुद्धा म्हटले जाते. भगीरथाने गंगेला आपल्या पितरांच्या राखेच्या ढिगाऱ्यापाशी आणताच व गंगेचा स्पर्श होताच भगीरथाच्या पितरांचा उद्धार होऊन ते स्वर्गाला गेले. श्रीमद् भागवतानुसार गंगाजलाने ज्यांच्या शरीराच्या राखेलाही स्पर्श केला त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली, तर जे लोक श्रद्धेने नियमपूर्वक गंगा स्नान करतात. त्यांच्या भाग्यासंबंधी काय सांगावे?

भगीरथाने महत्त प्रयासाने गंगेला पृथ्वीवर आणल्यामुळे गंगेला भागीरथी असेही म्हटले जाते, तर महर्षी जनहू यांनी तिला कानातून मुक्त केले म्हणून तिला जान्हवी या नावानेही ओळखले जाते. तर एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न असे म्हणण्याचा प्रघात आहे.

Comments
Add Comment