
पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची धडक बसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेला तरुण महाड औद्योगिक वसाहतीत नोकरी करत होता. वैभव रमेश पालकर असे या तरुणाचे नाव होते. तो पोलादपूरच्या आनंदनगरचा रहिवासी होता.
वैभव पालकर रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरुन घरी परतत होता, त्यावेळी अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. अपघात झाल्याचे कळताच जवळच्या लोहारे गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनीच वैभवचा मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. यानंतर वैभवच्या नातलगांना माहिती देण्यात आली.
महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने-आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनीही कामगारांच्या प्रवासाकरिता सुरक्षित अशी व्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. यामुळे अनेकजण मिळेल त्या वाहनातून प्रवास करतात. नोकरीचे ठिकाण ते घर असा प्रवास करताना कधी अपघात झाला तर काही वेळा कामगारांच्या जीवावर बेतते तर काही वेळा ते जखमी होतात.