
नाशिक: मेडिकल अभ्यासक्रमांसाठी महत्वाची असलेली NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा संपूर्ण देशभरात आज ५ मे २०२५ रोजी पार पडली. देशभरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. दरम्यान नाशिकमधून एक बातमी समोर आली आहे, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटं विलंब झाल्यामुळे दोन विद्यार्थिनींना परीक्षेला मुकावे लागले आहे.
परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही केवळ काही मिनिटांच्या उशिरामुळे या विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला.
राष्ट्रीय नियमांतर्गत प्रवेश नाकारला
परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार, परीक्षेची वेळ दुपारी 2 वाजेची असली तरी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान १.३० वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक असल्याचे सूचना पत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र नाशिकमधील वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात दोन विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या काही मिनिटांनंतर पोहोचल्या. त्यांना निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीर झाला होता. दरम्यान विद्यार्थिनींनी परीक्षेला बसू देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे विनंती देखील केली होती. मात्र परीक्षेचे राष्ट्रीय नियम अत्यंत कठोर असल्या कारणामुळे त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थिनींचे एक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.