Saturday, May 3, 2025

अग्रलेख

पाकला धडा शिकवणार, कूटनीती की रणनीती

पाकला धडा शिकवणार, कूटनीती की रणनीती

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हा हल्ला पाकिस्तानने त्यांच्या दहशतवाद्यांकडून करवून घेतला, याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांना पहलगाम परिसरामध्ये उपलब्ध झाले. पाकिस्तान या प्रकरणी हात झटकत असला तरी भारतात होत असलेले दहशतवादी हल्ले हे पाकपुरस्कृतच असल्याचे जगजाहीर आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्याने जम्मू-काश्मीरच्या पर्यटनांवर परिणाम झाला आहे. नवविवाहित जोडपी हनीमूनसाठी जम्मू-काश्मीरमध्ये आलेली असताना, सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला आणि अनेकांच्या नवसंसाराची राखरांगोळी झाली. पहलगाममध्ये हल्ला होताच भारताच्या कॅबिनेट सुरक्षा समितीने काही निर्णय घेतले. त्यात १९६०चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील.

अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे २०२५ पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचे आदेश. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही व्हिसा रद्द मानले जातील. सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आले. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण/नौदल/हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आले. संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात. दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील. १ मे २०२५पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली जाईल. पाकनेही त्यास तत्काळ प्रत्युत्तर देत तशाच स्वरुपाचे निर्णय घेतले. फक्त त्यात भारताशी तसेच भारताच्या माध्यमातून इतर देशांशी होणारा सर्व व्यापार त्वरित स्थगित केले, हा अतिरिक्त निर्णय घेतला. पहलगाम घटनेनंतर दोन्ही देशांवर युद्धाचे सावट आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सातत्याने बैठका घेत आहेत. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी कुरापती करतच आहे. १९४७, १९६५, १९७१ या तीनही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. भारताशी उघडपणे युद्ध जिंकणे शक्य नसल्याने दहशतवाद्यांच्या माध्यमातून देशामध्ये गोळीबार, स्फोट, हल्ले घडवून आणणे, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, भारताच्या चलनात बनावट नोटा घुसविणे अशा प्रकारातून भारताचे नुकसान करण्याचा पाकिस्तानचा उद्योग गेली ६८ वर्षे सातत्याने सुरूच आहे.

२६/११चा सागरी मार्गाने झालेला हल्ला, कारगील युद्ध, आताचा पहलगामचा प्रकार असे हजारोंनी प्रकार पाकिस्तान करत असल्याने पाकिस्तानला कायमचाच धडा शिकविण्याची भाषा आज प्रत्येक भारतीयांकडून उघडपणे बोलली जात आहे. पाकविरोधी कारवाईसाठी सर्व राजकीय नेते व पक्षसंघटना एकवटल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबाबत निर्णय घेण्याचे व वेळ ठरविण्याचे स्वातंत्र्य भारताच्या तीनही संरक्षण दलाला दिले आहेत. या युद्धातून होणाऱ्या नुकसानीची झळ काही वर्षे दोन्ही देशांना सोसावी लागणार आहे. युद्ध झाले तरी चालेल, पण पाकिस्तानला ठेचलेच पाहिजे, पाकिस्तानच्या कारवायांना ठोस उत्तर दिले पाहिजे, असा सूर भारतीयांकडून आळविला जात असून केंद्र सरकारवर दिवसेंगणिक तसा दबावही वाढत चालला आहे. मुस्लीम राष्ट्रांनी पाकिस्तानला समर्थन द्यावे यासाठी त्यांच्याकडे याचना केली जात आहे. तुरुंगातील कैद्यांकडेही मदत मागण्याची वेळ पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आली आहे. भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीनेच धीर खचलेल्या पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने व पाकिस्तानने एकमेकांना हवाई हद्दीचा वापर करण्यास मनाई केल्याने या अकरा दिवसांमध्ये दोन्ही देशांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे व युद्धसदृश्य वातावरण लांबल्यास अजून मोठ्या प्रमाणावर दोघांचीही प्रचंड आर्थिक हानी होण्याची भीती आहे. भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने पीओकेमधील १ हजारहून अधिक मदरसे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून लक्ष्य करेल या भीतीने १० दिवसांसाठी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. भारताने हल्ला केल्यास अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असा दावा पीओके सरकारने केला आहे.

आपत्कालीन निधीत एक अब्ज रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. पाक अधिकाऱ्यांनी नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील इतर संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरून परत पाठवण्यात आले. लिपा व्हॅलीमधील रहिवाशांना नियंत्रण रेषेजवळ जाण्यास मनाई करण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारत हल्ला करेल याची पाकिस्तानला भीती वाटत आहे. दोन्ही देशांचे सैनिक सज्ज झाले आहेत. दोन्ही देशाचे सत्ताधारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान आर्थिक समीकरणात कंगाल झालेला असल्याने पाकिस्तानची बाजू घेऊन भारतासारखी बाजारपेठ गमविण्याचा धोका सहजासहजी कोणी स्विकारणार नाही. युद्धसदृश्य परिस्थितीमुळे सीमारेषेवर तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूच्या कुरुक्षेत्रावर सैन्याची जमवाजमव झाली आहे. हवाई तसेच पाण्यातूनही लढाई लढण्याची चाचपणी सुरु झाली आहे. केवळ युद्धाचा बिगुल वाजण्याचीच दोन्हींकडून प्रतिक्षा सुरु आहे.

Comments
Add Comment