Saturday, May 3, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीक्राईम

मालाडमध्ये थरारक हत्या! ‘मचमच’ प्रकरणाने हादरली मुंबई

मालाडमध्ये थरारक हत्या! ‘मचमच’ प्रकरणाने हादरली मुंबई

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणा-याची थेट हत्या! तिघे अटकेत, मृतदेह अद्याप गायब

मुंबई : मालाड मधील मालवणी येथील १७ एप्रिल रोजी बेपत्ता झालेला फहिम नझीर सय्यद उर्फ फहिम ‘मचमच’ (वय ४३) याचा पत्ता काही लागत नव्हता… कुटुंबीय थकले, पोलीस शोधात होते, पण फहिम कुठेच सापडला नाही. आणि मग अचानक एका गोपनीय माहितीने पोलिसांच्या हातात लागली थरारक कहाणीची सुरुवात…

भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळाली एक गोपनीय माहिती – "फहिमचा खून झाला आहे आणि त्याचा मृतदेह बोऱ्यात बांधून नाल्यात फेकण्यात आला आहे!"

मालवणी पोलीस ठाण्यात याआधी ड्युटी बजावलेल्या आढाव यांनी तात्काळ मालवणी पोलिसांना या गंभीर प्रकरणाची वर्दी दिली. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी तात्काळ सैफ फैज शेख (२८), हाझीम इमरान खान (१९), सूरज अरुण ठाकूर (१९) या तीन संशयितांना ताब्यात घेतले.

उलगडत गेलं खुनाचं गूढ...

फहिम आणि त्याचा मित्र फैयाज शेख (५२) यांनी एकत्र अमली पदार्थ घेतले. नंतर ते फैयाजच्या घरी गेले, जिथे त्याची पत्नी आणि १५ वर्षांची मुलगीही होती. रात्री सगळे झोपले, पण... फहिमने त्या अल्पवयीन मुलीकडे अश्लील इशारे केले, ती मोबाईलवर तिच्या प्रियकराशी बोलत होती. घाबरून, तिने आपल्या प्रियकराला सांगितले आणि मग आले तीन तरुण.

या तरुणांनी मिळून फहिमला जबर मारहाण केली आणि हीच मारहाण फहिमच्या मृत्यूचं कारण ठरली. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. त्या तिघांनी फहिमचा मृतदेह बोऱ्यात भरला आणि मालाड पश्चिमेतील मिठ चौकी मेट्रो स्थानकाजवळील नाल्यात तो फेकून दिला. विशेष म्हणजे, आरोपींनी फहिमला मारहाण करतानाचे व्हिडीओही चित्रीत केले होते. एका आरोपीने नशेत ही गोष्ट आपल्या मित्राला सांगितली, ज्याने ही माहिती पुढे पोलीस खबऱ्याला दिली.

सीसीटीव्हीत पुरावा:

पोलीस तपासात असेही उघड झाले की, आरोपींनी ऑटोरिक्षाच्या माध्यमातून मृतदेह नेला, आणि त्याचा सीसीटीव्ही पुरावाही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पण अजूनही ‘मृतदेह’ सापडलेला नाही...!

गुन्हा कबूल झाला, आरोपी अटकेत आहेत, पुरावेही आहेत… पण मृतदेह अजूनही मिळालेला नाही! कारण, नाला आधीच स्वच्छ करण्यात आला होता. हा कचरा मीरा-भाईंदरजवळील डम्पिंग ग्राउंडला पाठवण्यात आला आहे. शुक्रवारी मालवणी, बांगूरनगर, गोरेगाव व भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली. मात्र नाला आधीच स्वच्छ झाल्यामुळे मृतदेह डंपिंग ग्राउंडला नेण्यात आल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस मीराभाईंदरजवळील डंपिंग ग्राउंडवर मृतदेहाचा शोध घेत आहेत.

पोलिसांचं वक्तव्य

“खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत तीन आरोपी अटकेत आहेत. अजून काहींना अटक होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.

दरम्यान, या थरारक घटनेने मालवणी परिसरात खळबळ माजली असून, सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. मृतदेह सापडतो का, आणखी कोण आरोपी आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment