
अनिल आठल्ये-निवृत्त कर्नल, अभ्यासक
भारत आपल्या संस्कृतीप्रमाणे युद्धनीती आखतो. आजही आपल्यातील तो भाव जिवंत आहे. मात्र आता उघडपणे धोरणात्मक बदल करणे गरजेचे असल्याचे ताज्या दहशतवादी हल्ल्याने दाखवून दिले आहे. थोडक्यात, आता आपण पाकिस्तानचे तुकडे करण्याच्या उद्दिष्टावर काम करणार आहोत असे स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे. देशाचे अस्तित्वच संकटात आल्याचे समजले तर पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करणे बंद करेल.
पाकिस्तानसंदर्भात अगदी १९४७ पासून आपले धोरण चुकीचे राहिले आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानलाही आपल्या देशातील लोकांची काळजी आहे आणि आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान समृद्ध व्हावा यासाठी तेथील सरकार आपल्या सरकारप्रमाणेच काम करेल, अशी भाबडी आशा आपण गेली ७५ वर्षे बाळगून आहोत. इतिहासाचा दाखला घेतला, तर १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये आर्थिक सुबत्ता होती. तेथील जनतेचे राहणीमान बाकी भारतापेक्षा चांगले होते. तसेच पाकिस्तानी नागरिकांचे दरडोई उत्पन्न भारताच्या दुप्पट होते. पण या ७५ वर्षांनंतर पाकिस्तानी जनता सर्वसामान्य भारतीय नागरिकांपेक्षा गरीब झाली आहे तसेच त्यांचे दरडोई उत्पन्न भारतीयांच्या उत्पन्नाच्या निम्मेदेखील नाही, हे वास्तव आहे. आज पाकिस्तान भिकेला लागण्याचे मुख्य कारण म्हणजे या देशाचे उद्दिष्ट्य युद्ध आणि काश्मीर काबीज करणे हेच आहे. जनतेच्या आर्थिक विकासाला त्यांनी कधीच प्राथमिकता मानले नाही. उत्तर भारताच्या इतिहासाकडे नजर टाकली, तर दिल्लीचे सुलतान आणि नंतरचे मोघल साम्राज्य यांनीही हेच केल्याचे दिसते. त्याचाच कित्ता पाकिस्तान गिरवत आहे. खेरीज इस्लामी धार्मिक शिकवणीप्रमाणे भारताला ‘गझवा ए हद’ म्हणजे पादाक्रांत करून त्याचे संपूर्ण इस्लामीकरण करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे, असेच मानले जाते. काश्मीर हे केवळ निमित्त आहे; परंतु संपूर्ण हिंदुस्तान पादाक्रांत करणे हेच पाकिस्तानचे जन्मापासूनचे उद्दिष्ट्य राहिले आहे. मात्र दुर्दैवाने भारताच्या नेतृत्वाला आजपर्यंत या मूलभूत प्रश्नाची समज आलेली नाही. पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि अगदी पंतप्रधान मोदी आदींनी कधी ना कधी पाकिस्तानशी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या मूलभूत धार्मिक धोरणेमुळे पाकिस्तान भारताशी कधीच शांतता ठेवणार नाही, हे भारतीयांना आजपावेतो समजलेले नाही.
जनरल मुशर्रफ कारगील युद्धावेळी पाकिस्तानचे हुकूमशहा होते. त्यांनी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर एकदा म्हटले होते की, काश्मीर प्रश्न पाकिस्तानच्या मनाप्रमाणे सुटला तरी भारत-पाकिस्तानात शांतता नांदणे शक्य नाही. त्यामुळेच भारतीयांची एकूणच युद्ध आणि त्याचा उपयोग याबद्दलची मनोवृत्ती आणि धारणा अजूनही श्रीरामाच्या काळातील सत्ययुगात अडकलेल्या आहेत, असे म्हणावे लागेल. भारतीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिले तर जाणवते की, परकीय आक्रमणांसमोर आपण कधीच टिकाव धरू शकलो नाही. अर्थातच याला आपापसातली भांडणे आणि राजकीय ऐक्याचा अभाव कारणीभूत आहे; परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अगदी महाभारत काळापासून भारतीय युद्धाकडे ‘सीमित युद्ध’ अशाच भावनेने पाहतात. दुसरीकडे, परकीय आक्रमक संपूर्ण युद्ध आणि शत्रूचा संपूर्ण विनाश या उद्दिष्टाने लढतात. या मूलभूत फरकामुळे वैयक्तिक शौर्य असूनही धर्मयुद्धाच्या कालबाह्य कल्पनांमुळे भारतीय अनेक लढाया हरत राहिले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात या ऐतिहासिक चुकीला तिलांजली देऊन हदवी साम्राज्य स्थापन केले. जवळपास ५०० वर्षांनंतर महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आक्रमकांवर निर्भेळ विजय मिळवले. राजपूतांचा सर्व भर वैयक्तिक शौर्यावर असे. यापुढचे पाऊल म्हणजे विजय मिळवण्याऐवजी हौताम्य पत्करण्याचीच फुशारकी मिरवली जाऊ लागली. आज पाकिस्तानशी सामना करताना पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी शिकवलेला धडा गिरवण्याची गरज आहे. आज भारतीयांनी मनाशी खूणगाठ बांधण्याची गरज आहे की, पाकिस्तानचे राष्ट्रीय उद्दिष्ट भारतावर कब्जा करणे आणि संपूर्ण भारत इस्लाममय करणे हेच आहे. पाकिस्तानच्या मते शांतता ही तात्पुरती सोय असते. यामुळे भारताला पाकिस्तानी आव्हानाचा यशस्वी सामना करायचा असेल, तर पाकिस्तान पूर्णपणे नष्ट करणे हे राष्ट्रीय उद्दिष्ट ठेवण्याखेरीज पर्याय नाही. एकदा हे राष्ट्रीय उद्दिष्ट सर्वसंमत झाले की त्यानंतर देशाचे धोरण, रणनीती आणि डावपेच आपोआपच बदलतील. नेहमीप्रमाणे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर ही गुप्तहेर तंत्राची चूक होती, अशी आवई उठवली गेली; परंतु गुप्तहेर संस्थांना दोष देणारे लोक विसरतात की, गेल्या ३० वर्षांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटकांवर कधीच हल्ले झालेले नाहीत. पहलगाममध्ये ज्या प्रकारे एका आडबाजूला अनेक पर्यटक गेले होते तसेच मी स्वत: दोन वर्षांपूर्वी पत्नीसह सोनमर्गजवळ अशाच एका ठिकाणी गेलो होतो. तेथेही जाण्यास घोड्यावरून प्रवास करावा लागला होता आणि आमच्यासारखे असेच शंभरभर पर्यटक तेव्हा तेथे होते. पहलगामप्रमाणेच त्या ठिकाणीदेखील आमच्याबरोबर कोणीही पोलीस किंवा सैनिक नव्हते. आम्ही फिरत होतो तेथून जवळची सैनिक चौकी पहलगामप्रमाणेच दहा किलोमीटर दूरवर होती. त्यामुळे पहलगामच्या पर्यटनस्थळावर पोलीस नसणे ही काही नवी गोष्ट नाही. फरक हा की, आजपर्यंत पाळली जाणारी लक्ष्मणरेषा यावेळी पाकिस्तानने आणि पाक दहशतवाद्यांनी पार केली आहे. अर्थातच या आगळिकीसाठी पाकिस्तानला धडा शिकवणारी कारवाई होणे गरजेचे आहे.
आता सिंधू जलसंधी निलंबित करून भारताने पाकिस्तानच्या मर्मावर घाव घातला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिमालयातले बर्फ वितळून सिंधू आणि इतर नद्यांमध्ये पाणी येते आणि त्यावरच पाकिस्तानची तहान भागते. सध्या भारताकडे चिनाब आणि झेलम नदीवर जलविद्युत प्रकल्प असून त्यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी साठून आपण पाकिस्तानमध्ये जाणारा ओघ कमी करु शकतो. याउलट, पावसाळ्यात पूर आले असताना साठवलेले अधिक पाणी सोडून तेथील पूरस्थिती आणखी गंभीर करू शकतो. गेल्या महिनाभरापासून काश्मीरला जोडणारा रेल्वेमार्ग तयार आहे. एकदा तो सुरू झाला की काश्मिरी लोकांची खूप सोय होणार आहे कारण त्यांच्याकडे होणाऱ्या फळे तसेच इतर उत्पादनाचा वाहतूक खर्च निम्म्यावर येणार आहे. अर्थातच त्यामुळे काश्मीरमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण होईल, यात शंका नाही. एकदा एखाद्या प्रदेशात आर्थिक सुबत्ता निर्माण झाली की तेथील लोक सहजसहजी हसाचाराला उद्युक्त होत नाहीत. पाकिस्तानला नेमकी हीच भीती सतावत आहे. म्हणूनच त्यांनी पहलगामची घटना घडवून आणली. गेल्या अनेक महिन्यांपासून गुप्तहेर संघटनांना याची कुणकुण आहे. त्यामुळेच तयार होऊनही श्रीनगरची रेल्वेसेवा सुरू करण्यात आलेली नाही. पाकिस्तानी अतिरेक्यांचा पूर्ण बिमोड केल्याखेरीज ही रेल्वेसेवा सुरू केली, तर त्यावर दहशतवादी हल्ले होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्याच्या निमित्ताने पाकिस्तानमधील दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्याची संधी मिळाली आहे.
पाकिस्तानचा पंजाब प्रांत दहशतवादाची जननी आहे. पाणी तोडल्यामुळे सगळ्यात जास्त परिणाम पंजाबवर होणार आहे. आपल्या सैन्याने चालवलेल्या दहशतवादामुळे ही परिस्थिती झाली आहे, अशी जाणीव पाकिस्तानी पंजाबात होईल तेव्हा तेथील लोकच सैन्याविरुद्ध उठाव करतील. मात्र यासाठी भारताने उघडपणे धोरणात्मक बदल करणे गरजेचे आहे. थोडक्यात, आता आपण पाकिस्तानचे तुकडे करण्याच्या उद्दिष्टावर काम करणार आहोत असे उघडपणे सांगण्याची वेळ आज आली आहे. असे झाल्यास आपल्या देशाचे अस्तित्वच संकटात आल्याचे समजल्यावर पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करणे बंद करेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.