Saturday, May 3, 2025

रिलॅक्स

बिंदास कुहूच्या भूमिकेत जाई

बिंदास कुहूच्या भूमिकेत जाई

युवराज अवसरमल

जाई खांडेकर अभिनयाच्या क्षेत्रात हळूहळू आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘भूमिका’ या नाटकात ती सचिन खेडेकर व समिधा गुरू यांच्या मुलीची भूमिका साकारीत आहे.

भांडुपच्या पवार पब्लिक स्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमात तिला जास्त भाग घेता आला नाही. नंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिथे तिने इतिहासामध्ये पदवी घेतली. मल्हार या फेस्टिवलमध्ये तिचा सक्रिय सहभाग होता त्या वेळी ती त्या कार्यक्रमाची वीसीपी होती. एथका या थिएटर फेस्टिवल मध्ये तिने भाग घेतला होता. होप्स नावाच्या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन तिने केले. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित मन शुद्ध तुझं या मालिकेमध्ये तिने काम केले.

भूमिका या नाटकातील एका पात्रासाठी तिची निवड झाली. या नाटकातील तिच्या भूमिकेविषयी विचार असता ती म्हणाली की, या नाटकात माझी कुहू नावाच्या मुलीची भूमिका आहे. मी आधुनिक विचाराची आहे. ती नवीन पिढीची प्रतिनिधित्व करते. ती बिंदास आहे. ती आताच्या प्रश्नावर बोलणारी आहे. सचिन खेडेकर व समिधा गुरुची ती कन्या दाखविली आहे. हे नाटक माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे.

ती या नाटकाचे सारे श्रेय दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीना देते. त्यांनी मोठ्या अभ्यासाने तिचे मूव्हमेंट बसविले आहेत. त्यांनी दिलेल्या विश्वासमुळेच ती ही भूमिका यशस्वीरीत्या साकारू शकली. सचिन खेडेकर व समिधा गुरु हे अनुभवाने तिच्यापेक्षा सीनियर आहेत; परंतु त्यांच्यामध्ये मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. त्यांच्यामध्ये चांगला रेपो निर्माण झाला आहे. रंगमंचावरचा वावर, संवादफेक ही त्यांना पाहून, त्यांचे मार्गदर्शन मिळून ती शिकली.

सध्या प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया तिला या नाटकातील भूमिकेविषयी मिळत आहे. एक कलाकार म्हणून घडण्याची प्रक्रिया तिच्यामध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या चांगल्या भूमिका साकारण्याची तिची इच्छा आहे. वेगवेगळ्या चांगल्या दिग्दर्शकाकडे काम करण्याची देखील तिची इच्छा आहे. भूमिका नाटकासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment