Saturday, May 3, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

10th Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा शुल्कात वाढ

10th Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा शुल्कात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या जातात. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जातात. यामुळे १०वी किंवा १२वीत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सतत दबावात असतात. यशस्वी होऊ का असा प्रश्न त्यांना सतावत असतो. तर अशा चिंतेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

दहावीच्या २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षासाठी ५२० रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय झाला आहे. याआधी २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असलेल्यांसाठी परीक्षा शुल्क ४७० रुपये होते. यामुळे २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असलेल्यांना आधीच्या वर्षाच्या तुलनेत परीक्षा शुल्क म्हणून जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत. परीक्षा शुल्कात थेट ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत झाला. यावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत परीक्षा शुल्कवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. या चर्चेनंतर निर्णय घेत फक्त परीक्षा शुल्कात वाढ झाली. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जात आहे, हे शुल्क देखील विद्यार्थ्यांकडूनच घेतले जाते. असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment