Saturday, May 3, 2025

रिलॅक्स

‘कोर्टरूम ड्रामा’ची नाट्यावकाशात ‘एन्ट्री’...!

‘कोर्टरूम ड्रामा’ची नाट्यावकाशात ‘एन्ट्री’...!

राज चिंचणकर

मराठी रंगभूमी अनेकदा साचेबद्ध नेपथ्यात अडकलेली दिसते; मात्र आता तिच्या नाट्यावकाशात थेट ‘कोर्टरूम’ दृष्टीस पडणार आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर रंगभूमीवर ‘कोर्टरूम ड्रामा’ची एन्ट्री होत आहे. ‘गंगा यमुना सरस्वती’ असे या नवीन नाटकाचे शीर्षक आहे. पुण्यात १ मे रोजी शुभारंभ झालेल्या या नाटकाचा मुंबईतला शुभारंभाचा प्रयोग शनिवार, ३ मे रोजी यशवंत नाट्यमंदिरात होत आहे. ‘गंगा यमुना सरस्वती’ या नाटकाचे लेखन राजन मोहाडीकर यांनी केले आहे. या नाटकाची मूळ संकल्पना पुरुषोत्तम बेर्डे यांची असून त्यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य आणि वेशभूषा केली आहे. शीतल तळपदे यांनी या नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. रसिका वेंगुर्लेकर, बाळ धुरी, सुनील जाधव आदींसह एकूण १४ कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.

‘गंगा यमुना सरस्वती’ या नाटकाविषयी बोलताना दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे म्हणतात, “रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असे हे नाटक आहे. नाटककार राजन मोहाडीकर यांना मी या नाटकाची संकल्पना ऐकवली, तेव्हा ती त्यांना आवडली. या नाटकातून आम्ही एक प्रकारचा निष्कर्ष काढला आहे आणि तो रसिकांना नाटक पाहिल्यानंतर समजेल. या नाटकातल्या मुख्य भूमिकेसाठी रसिका वेंगुर्लेकरची आम्ही निवड केली आणि आता तिने या नाटकातल्या भूमिकांचा ताबा घेतला आहे. बाळ धुरी यांचे कास्टिंग अगदी पहिल्यापासूनच कन्फर्म होते. काही महिन्यांपूर्वी मला साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा ते तिथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून मी त्यांना म्हटले होते की, पुढेमागे मी कलाक्षेत्रात जेव्हा काही करीन, तेव्हा आपण एकत्र काम करू आणि हा योग या नाटकाच्या निमित्ताने जुळून आला. नाटकासाठी सध्या चार-पाच कलाकारांच्या पुढे कोणी जात नाही; परंतु आमच्या नाटकात १४ कलाकार आहेत आणि एकूण २६ भूमिका आहेत. अनेक वर्षांनंतर असे खटलेबाज नाटक रंगभूमीवर आले आहे”.

या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणारी रसिका वेंगुर्लेकर म्हणते, “सात वर्षांनंतर मी पुन्हा एकदा नाटक करत आहे. माझी सुरुवात नाटकातूनच बालकलाकार म्हणून झालेली आहे. त्यामुळे नाटकावर माझे विशेष प्रेम आहे. नाटक ही फार मोठी कमिटमेंट असते आणि त्यासाठी स्वतःला पूर्णतः वाहून घ्यावे लागते. तो सगळा योग या नाटकाच्या निमित्ताने जुळून आला आहे. गेली दोन वर्षे मी नाटकाच्या शोधात होते. त्यासाठी अनेक स्क्रिप्ट वाचल्या. जेव्हा मला पुरुषोत्तम बेर्डे यांनी या नाटकाविषयी सांगितले आणि स्क्रिप्ट दिली, तेव्हा ती मला खूप आवडली. या नाटकातली माझी भूमिका खूप सशक्त आणि इंटरेस्टिंग आहे. पुरुषोत्तम बेर्डे सरांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर यानिमित्ताने मला काम करता येत आहे. हे नाटक म्हणजे कोर्टरूम ड्रामा आहे आणि मी यात एका वकिलाची भूमिका करत आहे. नाटकाचा विषय सामाजिक आहे; मात्र खूप सिरीयस पातळीवर न जाता इंटरेस्टिंग पातळीवर जाणारे हे नाटक आहे. लोक स्वतःलाच या नाटकात पाहतील, कारण आपल्या आजूबाजूला घडणारा हा विषय आहे आणि त्याविषयी फारसे बोलले गेलेले नाही. तर असा एक विषय घेऊन आम्ही आलो आहोत. रसिकांना हे नाटक नक्कीच आवडेल”.

ज्येष्ठ रंगकर्मी बाळ धुरी या नाटकाच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहेत. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणतात, “चंद्रलेखा नाट्यसंस्थेचे ‘पहाटवारं’ हे नाटक सन २००४ मध्ये मी केले होते. त्यानंतर आता २१ वर्षांनी मी पुन्हा नाटकात काम करत आहे. मधल्या काळात माझे सिनेमे आणि मालिका सुरू होत्या. परंतु नाटकातल्या माणसाला नाटक केल्याशिवाय चैन पडत नाही. मी आतापर्यंत टॉपच्या २४ दिग्दर्शकांबरोबर नाटकांमध्ये काम केले आहे. दारव्हेकर मास्तर, विजया मेहता, अरविंद देशपांडे आणि पुढच्या पिढीतले चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली मी नाटक केले आहे. पुरुषोत्तम बेर्डेंकडे मात्र मी काम केले नव्हते. इच्छा फार होती, पण योग येत नव्हता. या नाटकाच्या निमित्ताने तोही जुळून आला. आता पुरुषोत्तम बेर्डे माझे पंचविसावे दिग्दर्शक ठरले आहेत”.

या नाटकात एक महत्त्वाची भूमिका रंगवणारे अभिनेते सुनील जाधव सांगतात, “मी या नाटकात सरकारी वकिलाची भूमिका करत आहे. थोडासा विसरभोळेपणा असलेला वकील मी यात सादर करतोय. हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरेल, असा मला विश्वास आहे. आमचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे कलाकारांना मोकळीक देत असतात; त्यामुळे आम्हाला हवे तसे आम्ही काम करतो. पण त्यांना काही पटले नाही, तर ते स्पष्टपणे सांगतात. आमच्या नाटकात बाळ धुरी यांच्यासारखे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करायला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे”.

Comments
Add Comment