
मुंबई : गायक सोनू निगम विरोधात आलेल्या तक्रारीआधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला आहे. कानडी लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार सोनू निगम विरोधात पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एका कार्यक्रमात सोनू निगम गाणी गात होता. यावेळी एका तरुणाने कानडी कानडी असं बोलायला सुरुवात केली. गायक सोनूने कानडी भाषेतले एखादे गाणे सादर करावे, अशी मागणी प्रेक्षकांमधून करण्यात आली होती. पण सोनूने वेगळाच अर्थ घेतला. यानंतर तो जे काही बोलला त्यामुळे कानडी नागरिकांच्या भावना दुखावल्या, अशी तक्रार कर्नाटक रक्षण वेदिके अर्थात केआरव्हीच्या बंगळुरू युनिटने पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला आहे.
वेळेत कार्यक्रम सादर करण्यासाठी निश्चित असे नियोजन असते. पण तरुण प्रेक्षकाने आयत्यावेळी कानडी गाण्याचा आग्रह धरला. यावर बोलताना तरुण ज्या पद्धतीने बोलत आहे ती पद्धत मला आवडलेली नाही, असे सांगत सोनू निगमने नाराजी व्यक्त केली. समोर कोण उभं आहे ते पहा. मला कनडी माणसं आवडतात. माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण हे असं वागू नका. मागणी करणाऱ्या प्रेक्षकाच्या जन्माच्या आधीपासूनच मी कानडी गाणी गात आहे. पण प्रेक्षकाचे हे वर्तन मला आवडलेले नाही. पहलगाममध्ये जे घडले त्याला हेच कारण आहे, असं सोनू निगम म्हणाला.
गायक सोनू निगमच्या या वक्तव्याच्या विरोधात पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. एका सांस्कृतिक मागणीला दहशतवादी घटनेशी जोडून गायक सोनू निगमने कानडी समाजाला असहिष्णु म्हटले आहे. या प्रकारांमुळेच भाषिक संघर्ष वाढत असल्याचे मत कर्नाटक रक्षण वेदिकेने व्यक्त केले आहे.