
मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरू येथे चाकूने भोसकून हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी मारेकरी शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलिसांनी मारेकरी शोधण्यासाठी पाच पथके तयार करुन तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी अटकेतील संशयितांची चौकशी सुरू आहे. ज्या भागात हत्या झाली त्या भागातील जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज मागवण्यात आले आहे. हे फूटेज तपासाचा भाग म्हणून तज्ज्ञांच्या उपस्थितीत बारकाईने बघितले जात आहे.
आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी सुहास शेट्टीला स्वतःसोबत शस्त्र बाळगू नकोस असे सांगितले होते. यानंततर सुहासने स्वतःसोबत शस्त्र बाळगणे थांबवले. या घटनेला आठवडा होत नाहीत तोच मारेकऱ्यांनी सुहास शेट्टीवर चाकूने हल्ला केला. जेव्हा घटना घडली त्यावेळी सुहास शेट्टी निःशस्त्र होता, असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पोलीस दलात तसेच सुहास शेट्टीच्या भोवताली त्याचे शत्रू आहेत का याचाही तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
केंद्र सरकारच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि मंगळुरूचे भाजप खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा यांनी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे अर्थात एनआयएकडे तपासाकरिता द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी सुहास शेट्टीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
पोलिसांनी सुहास शेट्टीच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही तर बदल्याच्या भावनेतून एकमेकांवर हल्ले करण्याचे आणि खून करण्याचे प्रकार वाढण्याचा धोका भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.