Friday, May 2, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

नाशिकमध्ये आज योग महोत्सव

नाशिकमध्ये आज योग महोत्सव
नाशिक : अध्यात्मिक शहर, द्राक्ष नगरी, कुंभमेळ्याचे शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये आज म्हणजेच शुक्रवार २ मे रोजी योग महोत्सव २०२५ होत आहे. हा कार्यक्रम अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पन्नास दिवस आधी होत आहे. दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेद्वारे योगासनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवस आधी २ मे रोजी योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंचवटीतील रामकुंड संकुलातील गौरी मैदान येथे कॉमन योगा प्रोटोकॉलच्या सामूहिक प्रात्यक्षिकाने सकाळी झाले. याप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, विविध मान्यवर आणि योगसाधक उपस्थित होते. स्थानिकांना या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी करुन घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केले. भारतासह जगभर उत्तम आरोग्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा केला जातो. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी नागरिकांना उत्सहाने नाशिकच्या योग महोत्सवात सहभागी होण्याचे तसेच २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment